डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
ऑक्टोबर महिना…. ! अर्थात भाद्रपद अश्विन…,,!!
या महिन्यात देवीची प्रतिष्ठापना झाली…. !
तिथून पुढे नऊ दिवस देवीच्या पूजनाचे नवरात्र म्हणून मनापासून स्वागत केले जाते…. !
आपली आजी, आई, बहीण, मुलगी, सुन, नात, आत्या, मावशी आणि पत्नी…. ! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या याच त्या दुर्गा माता…. !!!
यांच्यापुढे ताट घेऊन आरती करणे, उदबत्ती लावणे, कापूर लावणे, नारळ फोडणे आणि साडी अर्पण करणे म्हणजेच यांची पूजा…. असं नाही…. !
या माता भगिनींना आनंद वाटेल, समाधान वाटेल, मुख्य म्हणजे सन्मान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तिची पुजा…. !!!
आईचा खरबरीत हात हातात घेऊन, तिच्या पदराला हात पुसत, दुसऱ्या हाताने तिच्यापुढे जेवणाचं ताट ठेवत, पायाशी बसून तिची चौकशी करणे ही त्या आईची पूजा….!
काय म्हातारे जेवलीस का ? म्हणत काशाच्या वाटीने खोबऱ्याचं तेल भेगाळलेल्या पायावर चोळून लावणं… ही त्या आजीची पूजा… !
येडी का खुळी? इतकं कामं कुटं एकटीनं करायचं असतात होय येडे…. ! मी कशासाठी आहे… ? मला पण सांगत जा की गं बाय म्हणत, तिच्या खांद्यावर हात ठेवणे ही त्या बायकोची पूजा…. !!
अय झीपरे, हितं आमच्या फरशीवर नको उड्या मारू…. तिथं आभाळात जाऊन झेप घे… तिथं काय अडचण आली तर मला हाक मार… मोठया भावाची ही दोन वाक्य, म्हणजेच बहिणीची केलेली पूजा…. !!!
आम्ही नवरात्री साजऱ्या केल्या नाहीत… पण अक्षरशः आम्ही “नव रात्री” जगलो…. !
पहिला दिवा –
अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याकडेला पडलेल्या “निराधार” आईंच्या हातात जेवणाचं ताट ठेवलं… … यांना निराधार तरी कसं म्हणावं ? यांना मुलं बाळं सुना नातवंडं सर्व आहेत…. पण, जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही….!
बरोबर आहे, आंबा खावून, कुणी कोय जपून ठेवतो का ?
आयुष्यभर आई बापाचा गोडवा पातेल्यात खरवडून घेतल्यावर शेवटी उरतंच काय ? कोयच ना ??
…. असो, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या या कोयी आम्ही साफ करून परत जमिनीत रुजवत आहोत… खत पाणी घालत आहोत….
…. आम्हाला फळं नकोच आहेत. एक झाड जगलं, हेच आमच्यासाठी खूप आहे….!
दुसरा दिवा –
फाटक्या साडीत, रोज नवं आयुष्य जगणाऱ्या आज्ज्यांना आणि महिलांना नव्या कोऱ्या साड्या दिल्या… एक? दोन ?? तीन??? नाही… तब्बल १३४१ …!!!
पूर्वी भीक मागणाऱ्या ज्या माता भगिनींनी भीक मागणे सोडून आता काम करण्याची तयारी दाखवली आहे, अशा माता भगिनीचे पाय धुवून… पूजन करून त्यांना साड्या दिल्या आहेत.
या उपक्रमातून त्यांचे मनोबळ आणखी वाढेल… त्यांचे समाजात कौतुक होईल आणि भीक मागणाऱ्या इतर माता भगिनीना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे.
या उपक्रमात आम्हाला अनेकांनी मदत केली, पण मला कौतुक वाटले ते सौ.अनुश्रीताई भिडे आणि भिडे काका यांचे …. ज्यांच्या दहा फुटावर सुद्धा कोणी उभे राहणार नाही, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांचे पाय यांनी तबकात घेऊन धुतले…
… कुठुन येतं हे…? कसं येतं…?? आणि का ??? काय मिळत असेल यांना…????
या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवण्यापेक्षा, मी अनुश्री ताई आणि भिडे काका यांचे पाय धुऊन तीर्थ प्राशन केले…!
तिसरा दिवा –
भीक मागणे सोडलेल्या, परंतु शिक्षणाची वाट धरलेल्या “कुमारिकांचे” या नवरात्रात पाय धुवून पूजन केले. पूजन करण्यामागे, या मुलींचे कौतुक करणे आणि इतर मुलींना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा हेतु होता.
सौ सुप्रियाताई दामले, हिंदु महिला सभा, पुणे यांची ही संकल्पना होती…!
आम्ही या सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन सरस्वती पूजन केले.
संस्थेने माझ्या मुलींना ड्राय फ्रूटस दिले, मनोभावे त्यांचे कौतुक केले.
…… मी आणि मनीषा बाजूला फक्त उभे राहून, आमच्या लेकींचे होणारे कौतुक पाहत होतो…!
आई आणि बापाला अजून काय हवं ?
माझ्या पोरींना ड्राय फ्रूट मिळाल्यावर, त्या पोरींनी तो पुडा फोडून मला आणि मनीषाला ड्राय फ्रूटचे घास भरवले…. आणि काय सांगू राव…. हे “ड्राय” फ्रूट अश्रुंनी “ओले” होवून गेले… !!!
चौथा दिवा –
ज्या ताईंना कोणाचाही आधार नाही, अशा ४ ताईंना याच काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करून दिले… !
गणेश हॉटेल समोर, शिवाजीनगर कोर्ट पुणे, येथे यातील अनेक ताई रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत…!!!
घुसमटलेल्या चार भिंती मधून या महिला बाहेर येऊन स्वतःच्या पायावर सन्मानानं उभ्या आहेत.
हरलेल्या या माता परिस्थितीच्या नरड्यावर पाय देऊन पुन्हा उभ्या राहिल्या आहेत, आणि आमच्यासाठी त्यादिवशीच विजयादशमी होती!!!
— क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈