सुश्री सुलू साबणे जोशी
☆ “प्रत्यक्ष अनुभवलेले एक थरारनाट्य” ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
आपल्या घराघरात आणि मनामनात चंदनाला एक अढळपद आहे. आमच्या गृहसंकुलात आपोआप उगवून आलेली चंदनाची झाडे आहेत. या भागात पक्षी खूप आहेत, बहुधा त्यांच्या शिटातून हे बीजारोपण झाले असावे.
चंदन हे नेहमी मोठ्या वृक्षांच्या जवळच जोमाने वाढते, कारण त्याचे अंशिक परावलंबित्व ! हा अर्धपरोपजीवी वृक्ष समजला जातो, कारण हा वृक्ष स्वतःचे अन्न पूर्णपणे तयार करू शकत नाही. तेव्हा तो दुस-या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या सहाय्याने अन्नशोषण करतो. (उदा. त्याला डाळिंब, कढीलिंब, काळा कुडा, करंज, अशा काही यजमानवृक्षांची सोबत मानवते.)
गेली वीस वर्षे अशा दोन चंदनवृक्षांचा सहवास आम्हाला लाभला. हे वृक्ष सदैव मण्याएवढ्या आकाराच्या फुला-फळांनी बहरलेले असतात. त्यावर सदैव मधमाशा असतात. ही फळे कोकीळ-कोकीळा, बुलबुल, फुलचुके, खारूताई आवडीने खातात.
काल ११ ऑक्टोबर २०२३/ बुधवार, रात्री बाराचा सुमार – इथे प्रगाढ शांतता होती. एकाएकी खालून आलेल्या एका विचित्र कर्णकटू कर्कश्श आवाजाने एकदम धडकीच भरली. या बाजूला अधूनमधून गाड्यांचे अपघात होतात. अति वेगात येणारी दुचाकी घसरून घसटत जावी, असे काहीसे वाटले. भराभरा गच्चीचे दार उघडून खाली डोकावले आणि पायाखालची जमीनच सरकली. आवाज रस्त्यावरून नव्हे तर चक्क संकुलाच्या आतूनच येत होता – यांत्रिक करवतीने एका चंदनवृक्षाचा बुंधा कापण्याचे काम चार माणसे मन लावून करत होती. मी आत येऊन खिडकीकडे धाव घेतली आणि सुरक्षारक्षकाला हाका मारल्या, ‘चोर, चोर’ म्हणून पुकारा केला. तोवर घरातील सर्व मंडळी आणि संकुलातीलही सर्वजण या विचित्र आवाजाने जागे होऊन या आरड्याओरड्यात सामील झाले. भराभर ब-याच मंडळींनी खाली धाव घेतली. पण, त्यांनी इमारतीचे प्रवेशद्वार उघडून बाहेर येऊ नये म्हणून पाऊस पडावा तसा दगडगोट्यांचा मारा करायला सुरुवात केली. दहा मिनिटात झाडाचा बुंधा कापून खांद्यावर टाकून चौघेही शांतपणे चालत मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून निघून गेले.
तशातही संकुलातील काही धाडसी तरूणांनी बाहेर धाव घेतली. टेकडीवरून दगडांचा मारा चालूच होता. तिथे चोरांचे चार-पाच साथीदार दडलेले असावेत. संकुलातील पाच-सहाजण दगडांच्या मा-याने रक्तबंबाळ झाले. सुरक्षारक्षकाने हाकेला ‘ओ ‘ का दिली नाही, तर त्याच्या गळ्याला सुरा लावून त्याला दोघा चोरांनी दाबून धरले होते आणि मारहाण करून जखमी केले होते. काही सदस्यांनी गाड्या काढून या सर्वांना तातडीने दवाखान्यात नेले. सुरक्षारक्षक आणि आणखी एकाला टाके घालावे लागले. याचा अर्थ – ती ८-१० चोरांची टोळी होती. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे संकुलाची आणि झाडाच्या जागेची माहिती काढलेली होती.
हे एक मोठे बंगला-संकुल आहे. त्यात टेकडीच्या पायथ्याला आमच्यासारखी सदनिकांची संकुले आहेत. बंगलेवाल्यांनी टेकडीवर त्यांच्या बाजूपुरती आठ फूट उंचीची संरक्षक-भिंत घातली आहे. पण आम्हा सदनिकाधारकांच्या बाजूला फक्त दीड-दोन फूट उंचीची भिंत आहे, जी आरामात ढांग टाकून ओलांडता येईल. त्यावर काटेरी कुंपण आहे. पण ते कापून ये-जा करता येईल, अशी वाट चोरांनी काढली आणि मांजरपावलांनी संकुलात येऊन झाडापर्यंत पोहोचले. टेकडीवर चार चोर दगडगोटे, गलोल घेऊन दबून बसले होते, दोन चोरांनी सुरक्षारक्षकाची गठडी वळली होती आणि चारजण झाड कापून आरामात चालत निघून गेले. ८-१० जण एकूण नक्कीच होते.
हा रस्ता उताराचा आहे, आणि उताराच्या टोकाला एका विद्यमान माननीय मंत्रीमहोदयांचा बंगला आहे. तिथे एक छोटीशी पोलिसांची छावणीच आहे. हे थरारनाट्य अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात संपले. आमचा हाकांचा सपाटा ऐकून पोलीस आले, तोवर चोरांचा कारभार संपला होता. मग येथील विभागीय पोलीस येऊन पहाणी करून त्यांनी तक्रार नोंदवून घेतली.
या विषयाने आणि चर्चेने रात्री किती तरी वेळ झोप येईना. मृत्युमुखी पडलेल्या चंदनवृक्षाने जीवाला चांगलाच चटका लावला. तेव्हा जाणीव झाली की, हा परिसर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि कुणीतरी विश्वासघाताने त्यातला एक भाग कापून काढला आहे.
थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसूंनी सप्रमाण सिद्ध केले होते की, वृक्षसंपदा सजीव आहे आणि भावभावनांनी युक्त आहे. त्या वृक्षाच्या आणि अवतीभोवतीच्या त्याच्या सहचरांच्या मूक आक्रंदनाने मन विषण्ण होऊन गेले. कालची काळरात्र संपली. सकाळ झाली. नेहमीसारखे पक्ष्यांचे कलरव ऐकू येईनात. गच्चीकडे धाव घेतली – एक वेडी आशा की कालची घटना हे स्वप्न असावे. पण कुठले काय? त्या सुंदर हिरव्या विणीला भले मोठे भगदाड पडले होते आणि त्यातून भक्क आभाळ भगभगीत नजर वटारून थेट समोर ठाकले होते….
© सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈