डॉ. शैलजा करोडे
परिचय
नांवः डॉ. शैलजा शंकर करोडे (साहित्य भूषण), दलितमित्र, कामगार भूषण, गुणवंत कामगार — महाराष्ट्र शासन
शिक्षणः एम.ए. (अर्थशास्र)
व्यवसायः पंजाब नॅशनल बँकेतून Dy Manager पदी सेवानिवृत्त
प्रकाशित पुस्तकेः कथासंग्रहः आठ, कवितासंग्रहः तीन, चारोळी संग्रह :दोन, कृपाप्रसादः भक्तिगीत संग्रह, कादंबरीः चार, संदर्भग्रंथः खान्देशची लोकसंस्कृती व लोकधारा (उत्तर महाराष्र्ट विद्यापीठ जळगांवने लोकसाहित्य एम.ए. भाग 1 साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे), काॅलम लेखनः तरुण भारत, दै. गांवकरी
कामगार साहित्य संमेलन औरंगाबाद, अमरावती, नांदेड, नाशिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली, सत्य शोधकीय साहित्य संमेलन, जळगाव, परीवर्तन साहित्य संमेलन जळगाव, फुले आंबेडकर साहित्य संमेलन, भुसावळ, समरसता साहित्य संमेलन, जळगाव, बोली भाषा साहित्य संमेलन, भुसावळ, अस्मितादर्श साहित्य संमेलन, जळगाव, औरंगाबाद, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल, जळगाव, म. युवा साहित्य संमेलन, जालना, ओबीसी साहित्य संमेलन, जळगाव, साहित्य कला मंच कुडूस भिवंडी—साहित्य संमेलन, जळगाव जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, अशा अनेक ठिकाणी निमंत्रित कवी, कवी संमेलनाध्यक्ष, कथासत्र अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष. तसेच Online संमेलनांचे अध्यक्ष पद भूषविले आहे.
सन्मानप्राप्ती
1) महाराष्र्ट शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक
2) मराठी काव्यकोषातील महान ग्रंथ poetry mile stone या ग्रंथात “सामना” कवितेचा समावेश
3) महाराष्र्ट हिन्दी साहित्य अकादमीतर्फे “अभंग——महाराष्ट्र के हिन्दी कवी प्रातिनिधीक रचनाये” या ग्रंथात दोन कविता समाविष्ट
4) विश्व हिन्दी संमेलनसे संलग्न संस्था, महाराष्ट्र हिन्दी सेवी संस्थान द्वारा प्रकाशित “महाराष्ट्र के जिवंत हिंदी कवियोंकी रचनाये” या ग्रंथात ५ कवितांचा समावेश
5) ठाणे येथे आयोजित पोएट्री मॅरेथान या सलग 85 तास चाललेल्या व गिनीज रेकाॅर्ड तयार करणार्या कवी संमेलनात कविता सादर
6) आम्ही लेखिका गृप (ठाणे, मुंबई, नवी मुंबई) यांचेद्वारे आयोजित संमेलनात जेष्ठ साहित्यिक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव सहभाग इत्यादी.
पुरस्कार प्राप्ती
१) दलितमित्र, गुणवंत कामगार, कामगार भूषण हे महाराष्र्ट शासनाचे पुरस्कार प्राप्त
२) दै.लोकमतचा “सखी” पुरस्कार, दै.सकाळचा “तेजःस्विनी” पुरस्कार, अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभेचा “जीवन गौरव” पुरस्कार
अन्य पुरस्कार – ग्लोबल एकाँनामिक्स कौंन्सिल नवी दिल्ली चा “राष्ट्रीय रतन” पुरस्कार, कथासंग्रह “अग्निपरीक्षा” यास पंजाब नॅशनल बँकेचे राष्ट्रिय स्तरावरील पुरस्कार, एल्गार साहित्य रत्न पुरस्कार, भारतीय साहित्य अकादमीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा बहीणाबाई काव्य पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा प्रा. राजा महाजन स्मृती पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परीषद पर्यावरण संमेलन पुणे यांचा “जीवन गौरव पुरस्कार अकोला “साहित्यरत्न” पुरस्कार, “साहित्य भूषण” पुरस्कार, पंजाब नॅशनल बँकेचे कथा, कविता, निबंध लेखन “पीएनबी दर्पण व पीएनबी स्टाफ जर्नल मधील उत्कृष्ठ लेखन, तसेच हिन्दीचे सर्वश्रेष्ठ योगदान असे विविध 50 पुरस्कार प्राप्त, स्टेट बँक, महाराष्र्ट बँक, सेंट्रल बँक, विजया बँक, कॅनरा बँक यांचेही पुरस्कार प्राप्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष समाजसेवा पुरस्कार ——अनोखा विश्वास इंदौर म प्र., कामगार रत्न पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, नेरूल हिरकणी पुरस्कार, जलगाव हिरकणी पुरस्कार, “कर्तव्य योगिनी सन्मान” प्राप्त, आम्ही लेखिका, ठाणे जिल्हा द्वारा “नवदुर्गा सन्मान” प्राप्त, कोरोना योध्दा सन्मान, कवयित्री बहिणाबाई विशेष सन्मान, साहित्यभूषण पुरस्कार, नारी गौरव पुरस्कार
मनमंजुषेतून
☆ प्रेरणा… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
चला सायंकाळचा स्वयंपाक आटोपला एकदाचा म्हणत मी थोडंस हुश्श केलं. मसालेदार खिचडी व स्वादिष्ट कढीचा छोटासा मेनू होता पण तेवढ्यानंही दमछाक होते आजकाल. “अगं वयपरत्वे होतं असं” मैत्रिणींचं अनुमान. “घाबरुन जाऊ नकोस, पण काळजी घे स्वतःची”.
मला हे सगळं आठवलं आणि चेहर्यावर स्मित पसरलं. चला आता थोडासा टीं व्ही लावून सह्याद्री वाहिनीवरील बातम्या पाहू असं म्हणताच, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मी काॅल रिसिव्ह केला. “नमस्कार मॅडम, मी नितिन महाशब्दे बोलतोय.”
“बोला सर, तुमचा नंबर सेव्ह आहे माझेकडे.”
“मॅडम आपण जाणतातच, आपल्या अक्षर मंच प्रतिष्ठानद्वारे ‘अखंड वाचन यज्ञ’ उपक्रम आपण राबवित आहोत. उद्या, म्हणजे 13 ऑक्टोबरला गावदेवी विद्या मंदिर, डोंबिवली येथे या वाचन यज्ञाचा आपण प्रारंभ करीत आहोत. शाळेतील विद्यार्थी सलग दोन तास अखंड वाचन करतील आणि ते ही प्रत्येक वर्गात. त्यानंतर बक्षीस वितरण आपल्या हस्ते होईल. संस्थेने पन्नास प्रमाणपत्र व पुस्तकं पाठवली आहेत बक्षीस म्हणून. आपल्यासारख्या जेष्ठ लेखिकेकडून या अखंड वाचन यज्ञाचा प्रारभ व्हावा व बक्षीस वितरण व्हावं ही अक्षर मंचसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण जाणार ना मॅडम.”
“होय नितिनजी, जाईन मी. मला तुम्ही शाळेचा पूर्ण पत्ता पाठवा.”
“मॅडम, मी शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन नंबर पाठवतो, आपण त्यांना फोन करा. सर सविस्तर सगळं सांगतील. बरं मॅडम, रजा घेतो आपली. पुढचेही अनेक नियोजन आहेत. धावपळ होतेय खूप.”
“ओ के सर, धावपळ करत असतांना स्वतःची ही काळजी घ्या.”
“ओ. के. मॅडम, शुभरात्री.” नितिन महाशब्देंनी फोन ठेवला.
चला अजून एक नवीन काम करायचंय. वाचन प्रेरणेवर उद्या बोलायचंय.. तयारी करावी लागेल थोडीफार.
मी शाळेत बरोबर 12.15 ला पोहोचले. शाळा 12.30 ला सुरू होते. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा चिवचिवाट सुरू होता. सोबत पालक आलेले होते आपल्या पाल्याला सोडायला. अशा या ज्ञानमंदिरात बालकांच्या किलबिलाटात मन एकदम प्रसन्न झाले. संस्थेचे जेष्ठ शिक्षक पाटील सरांनी माझे स्वागत केले व मला एका वर्गात छानपैकी पंख्याखाली बसवले.
शाळेची घंटा झाली. राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रतिज्ञा संपन्न झाली. एव्हाना मुख्याध्यापक सरही आले व आम्ही त्यांच्या रूममध्ये बसलो.
शाळा छोटीशी होती. पूर्व प्राथमिक व प्राथमिक इयत्ता 7 वी पर्यंत. पण विद्यार्थी संख्या चांगली होती 418. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी झाकोळून जात असतांना या शाळेने मराठी बाणा जपला होता. शिक्षकवृंद चांगला व मेहनती होता.
थोड्याच वेळात ‘अखंड वाचन यज्ञा’ला सुरूवात झाली. “मॅडम चला, जाऊया प्रत्येक वर्गावर, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”
मी वर्गावर जाताच सगळे विद्यार्थी उठून उभे राहिले व गुड माॅर्निंग टिचर, आपलं स्वागत आहे,” एका तालासुरात सगळ्यांनी म्हणत टाळ्यांचा कडकडाट केला. फळ्यावर आजचा उपक्रम व प्रमुख पाहुणे म्हणून माझे नाव लिहिलेले होते. मी सगळ्याच वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे वाचन ऐकले, वीर सावरकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम… छान वाचन सुरू होते.
शाळेच्या प्रांगणातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या फोटोंचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे प्रास्ताविक व विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला जात होता आणि मी भूतकाळात शिरले होते, माझ्या शालेय जीवनात रमले होते.
“बरं का मीनाक्षी, उद्या जागतिक पुस्तक दिन आहे. आपल्या शाळेत कार्यक्रम आहे आणि प्रसिद्ध लेखक
उमाकांत नार्वेकर येणार आहेत. तुला उद्या भाषण करायचंय.;चांगली तयारी करुन ये. तशी तू प्रत्येकवेळी छानच भाषण करतेस. उद्याही करशील.”
सर्व शिक्षकवृंद व प्रमुख पाहुण्यांसमोर मी वाचन आणि पुस्तकाचे महत्व विषद करीत होते
“पुस्तकानेच होतो माणूस ज्ञानी,
ज्ञानानेच मिळतसे जीवनाला गती….”
” वाह, सुंदर, तू तर कविताही छान करतेस ” प्रमुख पाहुणे उस्फूर्तपणे बोलले. मला मिळालेली ही कौतुकाची पावती पुढे माझ्या लेखन यज्ञाला प्रेरक ठरली व कविता, कथा, कादंबरी, ललित, नाट्य, निबंध विविध अंगांनी फुलत गेली.
“आता आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीनाक्षी परांजपे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो”.
मी तंद्रीतून बाहेर आले. माईक हाती घेतला.
“आदरणीय अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद आणि माझ्या देशाचे भविष्य घडविणारे आधारस्तंभ असणार्या विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्ही अखंड वाचन यज्ञात सहभागी झालात. विविध ज्ञानोपासकांच्या पुस्तकांचं अभिवाचन केलंत. फार सुंदर. पण विद्यार्थी मित्रांनो, वाचनासाठी शिक्षणाचा गंध लागतो. आणि पूर्वीच्या काळी जनसामान्य व स्त्री वर्गाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षण नसल्याने जनसामान्यांचे जीवन दुःखी होते. गुलामगिरीत खितपत पडल्यासारखे होते. ही बाब महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लक्षात आली.
विद्येविना मती गेली
मतीविना निती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
इतके सारे अनर्थ
एका अविद्येने केले
…म्हणून ज्योतिबा व सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रोवला. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीमाई होत्या म्हणूनच आज मी तुमच्यासमोर भाषण करू शकतेय. त्यांनी दिलेला शिक्षणाचा वसा वसतेय.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेच आहे ‘वाचाल तर वाचाल’. स्वतः बाबासाहेब खूप वाचन करीत. परदेशातून भारतात येतांना त्यांनी 37400 पुस्तकांचं भांडारच जणू बोटीने भारतासाठी रवाना केले. पण बोट दुर्घटनेत ती सगळी पुस्तके गेली. यावरून लक्षात येईल की बाबासाहेबांना वाचनाचा केवढा व्यासंग होता. या व्यासंगातूनच जगातील सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करुन भारतासाठी समाजातील सर्व घटकांसाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वावर आधारित परिपूर्ण संविधान त्यांनी लिहिले. बाबासाहेब म्हणायचे एक मंदिर बांधून 100 भिकारी निर्माण करण्यापेक्षा एक ग्रंथालय बांधा व 1000 विचारवंत तयार करा.
होय मित्रांनो, वाचनामध्ये खूप शक्ती असते. कारण पुस्तक वाचतांना पुस्तक व आपल्यात एक नातं निर्माण होतं. आपण पुस्तकाशी तादात्म्य पावतो. ते वाचन, ते विचार आपल्या काळजात घर करतात आणि यातूनच प्रेरणा मिळून आपल्या विचाराला, भावनेला गती मिळते, लेखनास आपणही प्रवृत्त होतो.
माझ्या शालेय जीवनात चांगले गुरूजन मला लाभले. कविताही खूप समजावून सांगायचे, ‘बेलाग दुर्ग जंजिरा’, ‘वसईचा किल्ला असला’, ‘ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी ‘, ‘ पोर खाटेवर मत्यृच्याच दारा ‘, ‘ बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा ‘ या कविता वाचतांना, अभ्यासतांना तर माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वहात असत. कवितेशी जोडली गेलेली मनाची ही तार मलाही कविता करण्यास सहाय्यक ठरली.
विद्यार्थी मित्रांनो, परवा भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो.
डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.
जसे शरीराला अन्नाची गरज असते तसे आपल्या मेंदूला वाचनाची गरज असते. कारण त्यातूनच नव विचारांची ऊर्जा मिळते. विद्यार्थी मित्रांनो वाचनाचे पाच सहा फायदे आपणास सांगते.
- वाचनामुळे मनाचा व्यायाम होतो.
- वाचनामुळे विचार कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता सुधारते.
- वाचन भाषेवर प्रभुत्व व प्रेरणेचा उत्तम स्रोत आहे.
- वाचन मन आणि शरीरास ऊर्जा देते.
- वाचनामुळे लक्ष आणि एकाग्रता सुधारते.
- पण विद्यार्थी मित्रांनो आजच्या टी. व्ही. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या व संघर्षाच्या युगात वाचनासाठी कोणाजवळ वेळच नाही. आजची शिक्षण पद्धती व गळेकापू स्पर्धा यामुळे विद्यार्थी वर्गाजवळही अवांतर वाचनाला वेळ नाही. तो विद्यार्थ्यांनी काढावा व आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण व्हावे म्हणून हा आजचा ‘अखंड वाचन यज्ञ’ प्रपंच.
आपण यात सहभागी झालात, मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलंत, आपल्याशी मला हितगूज करता आलं, भरुन पावले मी. आपल्या व आयोजकांच्या ऋणात राहून इथेच थांबते.
धन्यवाद.”
एकेकाळी प्रेरणेतून घडत जाणारी मी आज एक प्रेरक ठरले होते. एक वर्तुळ पूर्ण झाले होते .
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]