डॉ गोपालकृष्ण गावडे

??

विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम !  भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(यानंतर श्रीकृष्णाने मूर्ख दुर्योधनाच्या अहंकाराला, त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या त्याच्या महत्वाकांक्षांना, आणि त्या महत्वाकांक्षापुढे अगतिक होऊन दुर्योधन करत असलेल्या अधर्माला आवर न घातल्याबद्दल संपूर्ण दरबाराला बोल लावला.) इथून पुढे —-

अहंकारीला अहंकारी म्हटल्यास त्याचा अहंकार दुखावला जातो. दुखावलेल्या अहंकारी मनात आत्मपरीक्षण करण्याची इच्छा निर्माण होण्याऐवजी राग उत्पन्न होतो. अहंकारावर टीका झाल्यास मूर्ख व्यक्ती हरप्रकारे आपल्या अहंकाराचे रक्षण करायचा प्रयत्न करतो. ते शक्य होत नसेल तर शेवटी तो अहंकारावर टीका करणाऱ्यावर शाब्दिक वा शारीरिक प्रतिहल्ला सुरू करतो. प्रतिहल्ला हा सर्वात चांगला बचाव असतो. दुर्योधनाचेही तसेच झाले. 

श्रीकृष्णाच्या बोलण्याने दुर्योधनाचा अहंकार दुखावला गेला. दुर्योधनाला श्रीकृष्णाचा प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने श्रीकृष्णाला बंदी बनवण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला. यावर श्रीकृष्णाने सर्व दरबाराला श्रीकृष्ण खरा कोण आहे त्याची जाणीव करून दिली. आपले प्रचंड विश्वरूप त्याने दरबाराला दाखवले. दुर्योधनाच्या आदेशाने श्रीकृष्णाला अटक करायला पुढे सरसावलेले हस्तिनापूरचे सैनिक मृत्यूच्या भीतीने जागीच खिळून राहिले. विश्वरूपाच्या तेजाने बहुतेकांचे डोळे दिपले. दरबारातील बहुतेक सान-थोर या विश्वरूपासमोर लीन होऊन हात जोडून उभे झाले. श्रीकृष्णाला हात लावण्याचेही धाडस कुणाला झाले नाही. तशात श्रीकृष्ण दरबार सोडून बाहेर पडला. 

श्रीकृष्णाने हरप्रकारे समजावल्यानंतर आणि विश्वरूप दाखवल्यानंतरही  दुर्योधनाने आपला हेका सोडला नाही. श्रीकृष्णाची शिष्टाई अयशस्वी ठरल्यावर दोन्ही पक्ष युद्धाला समोरासमोर ठाकले. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या मध्यभागी समोर कुलगुरू, गुरू, आजोबा आणि आप्त पाहून अर्जुनाला युद्ध न करण्याचा अधर्म सुचला. श्रीकृष्णाने त्याला गीतेच्या स्वरूपात धर्म समजावून सांगायला सुरुवात केली. गीतेच्या सुरुवातीलाच श्रीकृष्णाने अर्जुनाला अनार्य, षंढ, क्षुद्र म्हणून हिणवले. पण अर्जुन अहंकारी नव्हता. त्यामुळे त्याला श्रीकृष्णाच्या बोलण्याचा राग आला नाही. शांत डोक्याने विचार केल्याने अर्जुनाला जाणवले की श्रीकृष्ण आपल्या हिताचीच गोष्ट सांगतो आहे. मग अर्जुन अंतर्मुख झाला आणि शांत डोक्याने आत्मपरीक्षण करू लागला. पूर्ण श्रद्धेने तो श्रीकृष्णाला शरण गेला. श्रीकृष्णाने आपल्याला शिष्य करून घ्यावे आणि मार्गदर्शन करावे अशी विनंती अर्जुनाने केली. त्यामुळे श्रीकृष्णाने पुढील गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनाने दुर्योधनाप्रमाणे अहंकार फुगवून छोट्या छोट्या गोष्टींवरून तो दुखवून घेतला असता तर श्रीकृष्ण अर्जुनाला पुढील गीता सांगायच्या फंदात पडला नसता. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणाऱ्या गीतेच्या ज्ञानाला अर्जुन दुर्योधनाप्रमाणेच मुकला असता. पण अर्जुनाने अहंकार दूर ठेवण्याचे शहाणपण दाखवले आणि गीतेचे कल्याणकारी ज्ञान पदरी पाडून घेतले. शेवटी विश्वरूप दाखवून श्रीकृष्णाने अर्जुनाला पूर्णपणे धर्म मार्गावर परत आणले. अर्जुनाचे सकल कल्याण झाले. 

असाच प्रयत्न श्रीकृष्णाने दुर्योधनासोबत आधी केला होता. पण पालथ्या घड्यावर सर्व पाणी पडले. अहंकारी दुर्योधनाने आत्मपरीक्षण करण्याऐवजी श्रीकृष्णालाच अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुढील संवाद संपला. शेवटी श्रीकृष्णाने दुर्योधनालाही विश्वरूप दाखवून त्याला त्याची लायकी दाखवून दिली. मोठेपणाच्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या महत्वाकांक्षेपुढे दुर्योधन हतबल झालेला होता. त्याच्या धर्म-अधर्मात भेद करणाऱ्या विवेकबुद्धीला अहंकारातून उत्पन्न झालेल्या हावेचे ग्रहण लागलेले होते. त्यामुळे साक्षात परमेश्वराने त्याला धर्माच्या मार्गावर आणण्याचे प्रयत्न करूनही त्याने अधर्माची कास सोडली नाही. महाभारताच्या युद्धात दुर्योधनाने स्वतःसह कुळाचा नाश करून घेतला. त्यामुळेच कदाचित म्हण पडली असावी, “अहंकारी गाढवासमोर गीता वाचून उपयोग नसतो “ 

कुठलाही सल्ला मिळाल्यास लगेच त्याला इगोवर न घेता डोके शांत ठेवून आधी तो सल्ला नीट समजून घेतला पाहिजे. आपला अहंकार या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो. जितका मोठा अहंकार तितक्या लवकर तो दुखावला जाण्याची शक्यता असते. अशा अहंकाराला उपयोगी समजून त्याचे संगोपन करणे हे अज्ञान आहे. स्वतः ठेच खावून तोंडावर पडूनच सर्व धडे शिकायचे नसतात. पुढच्याला ठेच लागल्याचा अनुभव ऐकून जो मागचा शहाणा होतो तो खरा शहाणा. पण अहंकारी व्यक्तीला कुठलाही सल्ला दिला तरी तो सल्ला त्याला स्वतःच्या अहंकारावरील टीका वाटते. अहंकार दुखावल्याने तो चिडून दुर्योधनासारखा वागतो. अशा व्यक्तीला सल्ला देवून पोळलेला माणूस परत त्याला कधीही काहीही सांगायला जात नाही. कुणाचेही न ऐकणारा अहंकारी व्यक्ती ठेच खाऊन तोंडावर पडल्यास त्याबद्दल कुणालाही सहानुभूती वाटत नाही. उलट त्याचे हसे होते. तेव्हा स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी स्वतःचा अहंकार कमी ठेवण्याचे ज्ञान अंगी हवे. तसेच स्वतःच्या दूरोगामी हिताशी प्रामाणिक रहायची अक्कलही अंगी हवी. हा स्मार्टनेस आहे आणि तो फार थोड्या लोकांजवळ असतो. हा स्मार्टनेस अंगी नसेल तर प्रत्यक्ष परमेश्वराचेही आपल्यासमोर हात टेकलेले असतील. आपल्या अहंकारी स्वभावाची कल्पना असलेले सामान्य लोक तर आपल्याला सल्ला द्यायच्याही भानगडीत पडणार नाहीत. आपल्या आधी अनेकांनी ठेचा खावून जमा केलेल्या ज्ञानाला आपण मुकू. अहंकारामुळे अज्ञान हटणार नाही आणि अज्ञानामुळे अहंकार हटणार नाही. 

— समाप्त — 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments