डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(बरोबर दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी घडलेला हा प्रसंग… आज आठवण्याचे कारण म्हणजे मागील दिवाळीत ती नव्हती… या दिवाळीत सुद्धा नव्हती आणि पुढेही कधी नसणार…!)
ती मला भेटली होती साधारण चार वर्षांपूर्वी…. वय असावं साधारण साठीच्या आसपास…
ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथला एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची…
येता जाता मी तिला पाहायचो…मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो पण ती कधी दाद द्यायची नाही….
तिला अंधुक दिसायचं… जवळपास नाहीच….. वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे, परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली…. वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं….
मी तिच्या यजमानांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही दाद दिली नाही. मला याचं काहीच कारण कळत नव्हतं…. असंच वर्ष निघून गेलं…
पावसाळा सुरू झाला. एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो, माझ्या अंगावर रेनकोट होता…. सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं, ते दोघे भिजत होते… पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते…. ! सगळ्यांनीच छळलं होतं…. पाऊस बरा यांना सोडेल? खूप वाईट वाटलं.. परंतु ते दोघेही सहकार्य करायला तयार नव्हते… मी तरी काय करणार ?
तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली…. पाऊस धो धो कोसळत होता… ते भिजत होतेच…ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिकची ताडपत्री टाकून छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला….
तिला दिसत नव्हते… तिने शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारले, “ एवढ्या जोरात पाऊस पडत होता अचानक कसा थांबला ?” … यजमानांनी तिच्या कानात काहीतरी सांगितले.
मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीने मला हाक मारली…. ए बाबा… हिकडं ये….
मी छताखाली गेलो, मला म्हणाली, “ तू हायस तरी कोण? आनी आमच्या मागं का लागला हायस? तुला काय पाहिजेन…. जगू दे ना बाबा हितं तरी सुखानं…”
घरातून बाहेर पडलेले हे दोघे….. जगाने यांना, या ना त्या कारणाने खूप फसवले होते, आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता…. . अनेकांनी यांना धोका दिला होता….
… खरंच, विश्वास किंमती असेलही.. पण धोका खूप महाग असतो…!
पुढे तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो. मी नेमकं काय करतो आणि कशासाठी हे त्यांना समजेल अशा भाषेत यांना समजावून सांगितलं…. माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही, झाली तर मदतच होईल याची मी त्यांना खात्री दिली…! मी निघालो. जाताना या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं…
यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो, जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो…. बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या.
तिचं माझ्याविषयीचं मत आता बदलत चाललं… मी तिला फसवणार नाही, याची तिची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला…. यानंतर तिला माझ्या गाडीवर बसवून तीन ते चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केली आणि … शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं….
एका पायान ती अधू होती…. तिला मग एक व्हीलचेअर पण घेवून दिली….
आता नाती घट्ट झाली होती….
मी तिला गमतीने, प्रेमाने नेहमी “ए म्हातारे” असं म्हणूनच हाक मारायचो.
तिला बाकी कशाचा नाही, पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा. बस एवढ्या एकाच गोष्टीने ती चिडायची….
दरवेळी ती मला म्हणायची, ‘ म्हातारे नको ना म्हणू…. ताई म्हणत जा की मला ‘
मी तिचं ऐकायचो नाही….. मी तिला ‘ ए म्हातारे ‘च म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची, तोंडातून शिव्या यायच्या, मला मस्त गंमत वाटायची.. .. वर अजून म्हणायचो , ‘ म्हातारीच तर आहेस…. तुला काय ताई म्हणायचं गं ? ‘ यावर चिडून ती चप्पल दाखवायची….
लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट साड्या पैसे असं बरंच काही द्यायचे….
दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तिला भिकेमध्ये मिळालेल्या शर्ट पॅन्ट बूट अशा अनेक वस्तू ती मला भेट म्हणून द्यायची….बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही हे ती माझ्या अंगाला लावून बघायची…. तिला मिळालेले फाटके बूट….. त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची…. ‘ होतील गं.. दे मी घालतो ‘ असं म्हणून, गुपचूप मी त्या गोष्टी घ्यायचो….
‘ व्वा…मला असाच शर्ट हवा होता ‘ असं मी तिला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा….
‘ मला असाच बूट हवा होता आणि तू नेमका आज तसाच दिलास ‘ म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं….
भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ….’ शर्ट आणि बूट घाल बरं का….. न्हायी बसला तर फूडल्या बारीला देते ‘ हे पण ती आठवणीने सांगायची…
अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे….
ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अशा वस्तूंची संग्रहालयं उभारली….आठवणीसाठी स्मारकं बांधली…
खूप नंतर कळलं….. स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही….
स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात….!
मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं…
भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं…!
तू डॉक्टर मी अडाणी, तू जरा बऱ्या घरातला मी रस्त्यावर राहणारी, असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे…. तिला मी म्हणजे तिच्या कुटुंबाचाच एक भाग वाटतो.. ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही…. ती मला तिच्याचसारखा समजते…. तिने मला तिच्याचसारखं समजणं, हा मी माझा विजय मानतो.
मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती आणि मी अनुभवत होतो…
अद्वैत ही संकल्पना नुसती वाचली होती … तिच्यामुळे मला अनुभवायला मिळाली
लोक बाहेर सर म्हणतात, ही मला मूडद्या म्हणते…
एरव्ही, ‘ आपणास कधी वेळ असतो ? कधी आपणास फोन करू ? ‘ लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात…
ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते, ‘ मुडद्या मेलास का जिवंत हायेस ? भयनीची काय आटवण हाय का नाय ?’ म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते….
मी हसत तिला म्हणतो, “ बहीण कसली तू कैदाशीण आहेस, हडळ आहेस म्हातारे …”
मग काय …. यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो…. त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो…. !
… वजन फुलाचं होत असेलही…. सुगंधाचं करता येत नाही….
… अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा, परंतु त्या अगरबत्तीपासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ….?
ती तशीच होती … काटेरी फणसासारखी… बहीण म्हणून ती करत असलेली “माया” मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही….
तिला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता, त्या झोपड्याला तिने घर म्हणून रूप दिलं होतं. मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.
लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती. परंतु माझी बहीण भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता…
.. .. आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती….
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈