श्री सुहास सोहोनी
मनमंजुषेतून
☆ कोंकणी पोटोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
बघता बघता दोन हजार तेविसाव्व सरून दोन हजार चौविसाव्व्याला सुरवात होईल. तेविसाव्व्याच्या सुरवातीलाच घरातून घोषणा झाली की, मी आता थकले. या वर्षी मी काहीही पदार्थ करणार नाही. म्हणजे जेवणाच्या पानांतली वामांगी व्यंजने आणि इतर काही !
या घोषणेला सुरुवातीलाच हरताळ फासला गेला तो मे महिन्यांत. सोमेश्वरहून कोणीतरी दोन मोठमोठे भोपळी आंबे आणून दिले तेव्हा. इतके ताजे आंबे डोळ्यांसमोर फुकट कसे घालवायचे, या विचाराने हात कामाला लागले. मग काय? एका आंब्याचं गोडं लोणचं आणि दुसऱ्याचा मेथांबा! दोन्ही पदार्थ विलक्षण रुचकर! हे एवढंच कसं पुरणार, म्हणून आणखी भोपळी आंब्यासाठी शोभाची बाजारांत ट्रीप झाली. आंबे नाही मिळाले. पण …..
काळे गोल, गोड तीळ मिळाले. (कारळे नव्हेत) हा पदार्थ आजकाल रत्नागिरी बाजारातून दुर्लभ झाला आहे असं कळतं. एकेकाळी भारीवाल्या माम्यांकडे हे तीळ भरपूर असायचे. मग गोड्या तिळकुटाच्या संगतीत पुढचे काही दिवस छान गेले! याच माम्यांकडे कोकणचा मेवा म्हणजे करवंद, अटकं, अळू, तोरणं, हा रानमेवा मिळतो. त्याच्यावर स्वयंपाकघरात काही प्रक्रिया करायची नसते, त्यामुळे हा मेवा अनेक वेळा आणला जातो.
नाचण्याच्या सत्वाची किंवा पिठाची, गोडी किंवा ताकाची आंबटसर आंबिल अधूनमधून होतच असते. पण खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्यातून उरलेल्याची साबुदाण्याची गोड आणि आंबट लापशी सुद्धा अनपेक्षितपणे होऊन गेली! खूपच स्वादिष्ट लागते.
घावन-घाटलं हा कोंकणातला लोकप्रिय पदार्थ. घावन नाही, पण नाही नाही म्हणतांना घाटलं झालंच. सिंधुदुर्गात तर घावन घाटल्याशिवाय कोणताही सण होऊच शकत नाही. अगदी तेराव्याला सुद्धा घावन घाटलं केलच जातं. तसंच काकडीच्या पातोळ्यांचा बेत आमच्या घरी केलेलाच नव्हता. पण लीलाकडून तेही आले. त्यामुळे तीही रिकामी जागा भरली गेली. नक्की आठवत नाही पण बहुतेक लीलाकडूनच एक बरका फणस आला होता. त्यामुळे सांदणं झाली. मेच्या अखेरीला शोभा बाजारात गेली होती. तेव्हा तिला रायवळचे गोड चवीचे, मोठ्या आकाराचे आंबे मिळाले. कोयाड्यासाठी (आंब्याची पातळ रसाची भाजी – अनेकांना हा प्रकार माहीत नाहीये) अतिशय छान. मग घोषणा राहिली बाजूला आणि सुंदर, रुचकर कोयाड्याची भरती जेवणांत झाली!
खरं सांगू? कितीही ठरवलं आणि कितीही घोषणा केल्या गेल्या, तरी काही काही पदार्थ हे घरामध्ये केलेच जातात. आणलेला किंवा आलेला पदार्थ नासून फुकट जाऊ नये म्हणून तरी, किंवा काही विशिष्ट समयी, विशिष्ट संकेताने जेव्हा जिव्हालौल्य उफाळतं तेव्हा तरी !
असो. तुका म्हणे सुखी रहावे,
जे जे होईल ते ते खावे.
लेखक : सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈