प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडमध्ये मुलीकडे दोन महिने होतो.यावर्षी सहा महिने होतो.पण यावर्षी घरातली अनेक कामं, मुलीची धावपळ यामुळे घर सोडून फारसं फिरायला गेलो नव्हतो.तसे आम्ही इंग्लंडला पर्यटन म्हणून न जाता मुलीला तिच्या कामात मदत करायलाच जातो. त्यामुळे त्याचं आम्हाला काहीच वाटलं नाही. तरीपण एक दिवस रात्रीची जेवणं आटोपून आम्ही निवांत बसलो होतो तर मुलगी तिथं आली, ” आईपप्पा, उद्या पाऊस नसला तर, आपण ऑक्सफर्डला फिरायला जाऊ”.

सकाळीच आटोपून दहाच्या सुमारास ट्रेनने फॅरिंग्टन, पॅडिंग्टनमार्गे आम्ही ऑक्सफर्डला पोहोचलो. स्टेशनवरून हाॅप ऑन हाॅप ऑफ .. या बसने शहराचा आधी फेरफटका घेतला.गेल्या वर्षी अशाच केंब्रिज या शहराला भेट दिल्याची आठवण जागी झाली. सुमारे तासभराच्या बस प्रवासात शहरातील जगप्रसिद्ध बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये आणि विख्यात महाविद्यालयांना धावती भेट दिली.

जगभरातील १४ वेगवेगळया भाषांतून माहीती दिली जात होती. इथे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी मला जाणवल्या ;

– इथली अनेक महाविद्यालये कित्येक शतकांपासूनची आहेत. जगातील अनेक विख्यात व्यक्तींनी इथून शिक्षण घेतल्याचा इतिहास आहे.

– आजही ह्या महाविद्यालयांच्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.

– आपल्याकडे शिक्षण १९ व्या शतकापासून सुरू झाल्याचा उल्लेख आढळतो, मात्र स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा विकास अधिक गतीने झाला.

– मात्र आपल्याकडच्या इमारतींची आजची अवस्था, स्वच्छता आणि तिथले वातावरण यात खूप फरक जाणवला. आपल्याकडे विद्यार्थी निवडणूका, विविध युवक महोत्सव अशा बाबतीत झालेल्या अप्रिय घटनांमुळे शिक्षणाबरोबरच गलिच्छ राजकारण, पैसा आणि इतर साधनांचा गैरप्रकार यामुळे आपल्याकडच्या शिक्षणाला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे.

– इंग्लंडमधील विशेषत: ऑक्सफर्डमधील अनेक जुन्या, नव्या महाविद्यालयांतून दिले जाणारे शिक्षण आणि एकूणच वातावरण पहाता आपली स्थिती नक्कीच शोचनीय वाटते.

– महाविद्यालये, बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये पहाताना, स्वच्छ रस्ते, लोकांनी पाळलेली स्वयंशिस्त, वातावरणातील शांतता पाहून अशा बाबी आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहेत ह्याची जाणीव झाली.

दिवसभरात जगातील एक सुंदर शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध शहराचा प्रवास संपल्यावर सायंकाळी हलकासा पाऊस पडून गेला होता, हवेत खूप गारठा जाणवत होता. म्हणून तिथल्या, डोसा पार्क नावाच्या दक्षिण भारतीय हाॅटेलात गेलो.तिथले सगळे वातावरण दक्षिण भारतीय होते. मोठ्या कागदी कपातून चहा पीत असताना भिंतीवर कृष्णाचे एक लहानसेच पण अतिशय सुंदर चित्र पहायला मिळाले.

लहानपणापासून मी कृष्णाची अनेक चित्रं पाहिली.पण ते चित्र मला खूपच भावले. आजवर कृष्ण म्हटला की, सोबतीला राधा असलेला बासरी वाजवणारा कृष्ण किंवा फार फार झालं तर, महाभारत युद्धात अर्जुनाच्या रथावर आरूढ किंवा अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण मी पाहिला होता. अनेक ठिकाणी कृष्णाची देव स्वरूपातली चित्रं पाहिली. मागे आपल्याकडचे एक अतिशय अभ्यासू, पुरोगामी विचारवंतांचे भाषण मी युट्यूबवर ऐकले होते.त्यांच्यामते कृष्ण हा भारतीय संस्कृतीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. त्याला बदनाम करण्यासाठी ‘पाण्यात कपडे काढून अंघोळ करणाऱ्या गोपींची वस्त्रं पळवून गंमत करणारा खोडकर ‘ अशी त्याची प्रतिमा निर्माण केली. खरंतर अगदी आपल्या देशात असं कोणतं गाव असेल जिथं सार्वजनिक जलाशयावर गावातील स्त्रिया कपडे काढून अंघोळ करतात? आणि क्षणभर ते गृहीत धरलं तरी त्यांची वस्त्रं पळवून नेणा-याला लोकांनी काय केलं असतं ? अशा माणसाला लोकप्रियता मिळाली असती का ? त्या विद्वानांच्या मते राधा हे पात्रही कवींची कल्पना आहे. इंद्राला नैवेद्य देण्याऐवजी तो नैवेद्य आपल्या सर्वसामान्य गुराखी मित्रांना देणारा कृष्ण ही घटना कृष्णाची सर्वसमावेशकता दाखवून देते.या दृष्टिकोनातून डोक्याला साधा फेटा बांधलेला कृष्ण मी या चित्रात पहात होतो. कृष्णाची एका बाजूला देव अशी प्रतिमा निर्माण करायची आणि दुसरीकडे काही कथा त्याच्या नावावर खपवायच्या (ज्यातून त्याचे नकारात्मक चित्र डोळ्यासमोर उभे रहाते) या दोन्हीपेक्षा सर्वसामान्यांचा लाडका आणि बलिष्ठांच्या मुजोरीला भीक न घालणारा कृष्ण मला जवळचा वाटतो.

येताना पॅडिंग्टन रेल्वेस्टेशनवर उतरलो तर काही सुंदर संगीताचे स्वर कानावर पडले.

एका प्लॅटफॉर्मवर काही वादकांच्या वाद्यांतून संगीत सुरेल संगीत ऐकू येत होते. रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे येणा-या जाणा-या रेल्वेगाडयांचा धडधडाट, मधूनच येणारे अनेक कर्णकर्कश आवाज, त्यात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, रेल्वेतून सांडणारी माणसं, लोकांची धावपळ अशा बाबींपेक्षा हे वेगळंच होतं. आमची परतीची ट्रेन येईपर्यंत मी हे पहात होतो.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments