श्री सुहास रघुनाथ पंडित
मनमंजुषेतून
☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!
त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!
तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.
कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.
कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.
तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’
ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..
‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’
हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???
त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!
लेखक : श्री धनंजय देशपांडे
लातूर
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈