सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

माझी दत्तोपासना

आपण एखाद्या दैवताची उपासना का करतो याचं कारण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण दत्तगुरूंच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इथे सांगावीशी वाटते. अर्थात प्रत्येकाची  यामागची भूमिका वेगळी असू शकेल आणि तिचे स्वागत आहे. पण मला भावलेलं हे दत्ततत्व या प्रकारचं आहे. 

दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचं एकत्रित सात्विक रूप. आणि ही तिन्ही दैवतं म्हणजे उत्पत्ति, स्थिती(जतन) आणि विलय या तिन्हीचं प्रतीक.

हे प्रतीक… म्हणजे ह्या तीन अवस्था आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतात. 

आपल्या शरीराची निर्मिती होते, मग आपण त्याचं पालनपोषण करतो आणि नंतर ते शरीर विलीनही होतं. पृथ्वीवरील कुठल्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टीलादेखील या तीन अवस्थांमधून जावंच लागतं. हे झालं शारीरिक, भौतिक पातळीवर.

विचारांच्या बाबतीतसुद्धा हाच क्रम लागू होतो. बुद्धीने विचार निर्माण होतात. ते आपल्या मनात स्थिरावतात. आणि कालांतराने विशिष्ट कृती करून किंवा न करताही आपोआप नाहीसे होतात, किंवा त्यांचं दुसऱ्या विचारांमध्ये रूपांतर होतं…..  पण विचारांच्या बाबतीत आणखी काही घडतं. एखादा विचार आपल्या मनात निर्माण झाला आणि तो जर चांगला, सद्विचार असेल तर आपली स्थितीही चांगली राहते. आपण त्या विचाराला धरून ठेवल्यावर आपली प्रगतीच होते. आणि आपला तो विचार नष्ट झाला तर सद्विचारांच्या अभावामुळे लवकरच सगळ्याचा नाशही होतो. 

कोणत्याही प्रतिभावान/ कलाकार माणसाचा तर दत्ततत्वाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. 

त्याच्या मनात कल्पनेची, विचारांची निर्मिती होते. ती धरून ठेवल्यावर उत्तम कलाकृती साकार होते आणि जर ती कल्पना धरून ठेवली नाही तर ती निघून जाते. म्हणजे काहीच घडत नाही. इथं घडण्याची शक्यता असतानासुद्धा काही न घडणं म्हणजेही एक प्रकारे विलयच. किंवा विचारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे म्हणजे त्या कलाकृतीचा एक प्रकारे विलयच.

त्यामुळे हे असं दत्ततत्त्व आपला रोजच्या जगण्यात आपण हरेक वेळी अनुभवतो. म्हणून दत्तगुरूंची उपासना सर्वसामान्य माणूस म्हणून मला जास्त जवळची वाटते. 

निर्मिती कशी असली पाहिजे , दृढता, स्थिरता कशी असली पाहिजे आणि योग्य वेळ येताक्षणीच त्या निर्मितीपासून स्वतःला अलिप्त कसे ठेवता यायला पाहिजे…… कारण कधी कधी विलय हासुद्धा नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा असतो. म्हणून तोही महत्त्वाचा. हे सगळं सहजतेने, सरळ सोप्या पद्धतीने आणि सगुण रूपातून सांगणाऱ्या दत्तगुरूंचे महत्त्व, त्यांची उपासना, ही माझ्यासाठी महत्त्वाची…

या दत्ततत्वाचं कायम स्मरण रहावं ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना !!! 

तुम्ही एखाद्या दैवताची उपासना करत असाल तर त्यामागे तुमची स्वतःची अशी काय भूमिका आहे ती या निमित्ताने जाणून घेणं मला आवडेल. 

||श्री गुरुदेव दत्त||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments