सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
म्हणता म्हणता चोरपावलांनी २०२३ सरत चालले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले. बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गत वर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात.
व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे, ” आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते..” शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते, ते म्हणजे आपले कोण, परके कोण, ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही? एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.
नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणींमुळे ते पुर्णत्वास जात नाही, विशेष करून स्त्रियांसाठी. कारण, घरची जबाबदारी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात. वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. कारण, पुन्हा व.पु. म्हणतात तसं, ” समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..” मला असे वाटते, वर्ष कधीच खराब नसते तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण या आधी कधी घेतलेले नाही. म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच.
असो, सुर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतच, तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या.. गुरू ठाकूर यांच्या दोन ओळी फारच सुंदर आहेत,
“आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे
ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे…”
लेखक : अज्ञात
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈