सुश्री मंजुषा सुनीत मुळे
☆ मनमंजुषेतून ☆ अव्यक्त आत्मवृत्त ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
“कित्ती सुंदर दिसतोय ना हा? पहातच राहावंसं वाटतंय—” जरा लांबूनच हे वाक्य मला ऐकू आलं आणि नेहेमीसारखंच मी खुद्कन हसलो…. कारण मला बघणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून हेच वाक्य मी ऐकतो आणि या वाक्याचा मला अजून तरी कंटाळा आलेला नाहीये. उलट ते ऐकतांना दरवेळी मला प्रचंड आनंद होतो. त्यांच्यापैकी कुणीच सहसा माझ्या जवळ येत नसलं, प्रेमाने मला कुरवाळत नसलं, तरी याची मला अगदी पहिल्यापासूनच सवय झाली आहे. मोकळी आणि स्वच्छ हवा, आजूबाजूला प्रसन्न हिरवाई असणाऱ्या या सुंदर जागी मी माझ्या मनाचा राजा असतो. मुळात मला एकटं असायला आवडतं—मग कुणाचंच कसलंच बंधन नसतं मला हुंदडायला. आसपास दोन-पाच भावंडं असतात बरेचदा– पण सगळे स्वतःतच गर्क– तसं शिकवलंच जातं आम्हाला लहानपणापासून– कुणाच्या पायात पाय अडकवायचे नाहीत. स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा आणि हीच माझी वृत्ती झालीये. माझं कुणावाचूनही काहीही अडत नाही. आणि तशी आई सतत असतेच ना माझ्याबरोबर. आईला ना, उन्हाळा अजिबातच सोसत नाही. थंडी सुरु झाली कीच तिला अशक्तपणा जाणवायला लागतो. आणि उन्हाळ्यात ती खूपच हडकुळी दिसायला लागते. बरं आजारी आहे म्हणून ती माहेरीही जाऊ शकत नाही. कारण ते खूप खूप लांब आहे म्हणे. एकदा माहेरघर सोडलं, की पुन्हा कधीच ती तिथे जाऊ शकणार नाही, इतकं लांब–म्हणजे असं तीच म्हणते.
माझे वडील म्हणजे खूप मोठा माणूस आहे म्हणे पण तेही खूप लांब रहातात. मी तर अजून पाहिलेलंही नाही त्यांना. पण त्यांचं सतत आईकडे, तिच्या प्रकृतीकडे लक्ष असतं म्हणे. ती रोडावलेली दिसताच ते काहीही करून तिच्यासाठी औषध पाठवतात.– ते नुसतं पाहिलं तरी बरं वाटायला लागतं तिला आणि ते औषध घेताच ती एकदम ठणठणीत बरी होते–. बाबांची खूप आठवण यायला लागते तिला आणि त्यांच्याकडे जायचं म्हणून लगबग-धावपळच सुरु होते तिची — मग काय, आम्हा भावंडांची चंगळ सुरु होते. अशावेळी आम्ही कुठे किती हुंदडतो याकडे ती लक्षही देत नाही आधी सहा-आठ महिने आम्ही शहाण्यासारखे वागलेलो असतो, घराबाहेर पळण्याचा हट्ट करत नाही, म्हणून असेल बहुतेक–
तसं आमचं कुटुंब–म्हणजे आजोळचं कुटुंब खूप मोठं आहे. मला कित्तीतरी मावश्या आहेत–माम्या आहेत, त्यामुळे मला भावंडेही खूपच आहेत… आणि चुलत-मावस-मामे-आत्ये असे किती आजोबा असतील, ते मोजण्याच्या फंदात मी पडतच नाही कधी. कारण ते सगळेजण जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत म्हणे आणि आमच्यातला सर्वात मोठा भाऊ अमेरिकेत आहे-आफ्रिकेत आहे- की आणि कुठे, हे एकाही नातेवाईकाला नेमकं सांगता येत नाही, याचं आश्चर्यच वाटतं मला. पण आम्हा भावंडातला प्रत्येकजणच अगदी देखणा, प्रसन्न, कुणालाही आवडावा असाच आहे, असं आई सांगत असते. पहाताक्षणीच कुणीही प्रेमातच पडतो म्हणे त्याच्या. मला तर खात्री आहे की तुम्ही माझा एक तरी भाऊ कुठे ना कुठे बागडतांना नक्कीच पाहिला असेल—तो लहान असो, मोठा असो–बघत रहावा इतका देखणा असतोच असतो.
काय? अजून पाहिला नाहीत? नक्की?– कमाल आहे खरंच तुमची— मग एक काम करा– तुमच्या त्या सिमेंटच्या खुराड्यातून बाहेर पडा—गावाच्याही बाहेर पडा—डोंगर-दऱ्यात जा. आमच्यापैकी कुणी ना कुणी भेटेलच आणि तुमची चक्कर वाया जायला नको असेल, तर मग पावसाळ्यातच जा. आम्हाला सगळ्यांनाच पावसाळा आवडतो, त्यामुळे अशा ठिकाणी आमच्यापैकी कुणीतरी तिथे पावसात भिजत मनसोक्त हुंदडतांना— अवखळपणे बिनधास्त धडाधडा उडया मारतांना दिसेलच नक्की तुम्हाला आणि खात्रीने सांगतो, रेनकोट- छत्री टाकून देऊन तुम्हीही तो आनंद हमखास अनुभवाल.——- विचारत-विचारत यावं लागेल म्हणता? अहो, माझं नुसतं नाव सांगितलंत तरी जवळपासचं कुणीही सांगेल तुम्हाला—- काय?—माझं नाव काय सांगायचं? आता हद्द झाली तुमच्यापुढे— अहो मी धबधबा—डोळ्यावरची झापडं काढलीत ना, तर पावसाळ्यात डोंगर-दऱ्यात ,आमच्यापैकी कुणीतरी नक्कीच भेटेल तुम्हाला–आणि नावात काय आहे? तुम्हाला हवं ते नाव देऊन टाका की. —मग येताय ना? वाट पहातो –
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈