डॉ. जयंत गुजराती
☆ कोमटण ☆ डॉ. जयंत गुजराती ☆
कधी नव्हत ते भई आज रागावले होते. भई म्हणजे माझे आजोबा. आईचे वडील. त्यांचे बंधू त्यांना भई म्हणत मग ते सर्वांचेच भई होऊन गेलेले! भई तसे फारसे कधी रागावत नसत. ते शांत व धोरणी स्वभावासाठी नावाजलेले. घरी वा बाहेर ही ते सदा हसतमुख राहत असलेले. क्वचितच ते रागे भरत व त्यास तसे ठोस कारण असले तरच ते विचलित होत. घरात ते तसे सर्वात वडील. घरात नाही नाहीतरी पंचवीसच्यावर माणसं, एकत्र कुटुंब. लहानथोर सर्वांना सांभाळून घेत, घरातील आपापसातले मतभेद, रूसवेफुगवे यातून समंजसपणे मार्ग काढण्याची जबाबदारी त्यांचीच. कितीही संकटं येवो त्याला तोंड देण्याची तयारी सदैव. मागचा पुढचा विचार करण्याचे कसब तसे उपजतच. त्यामुळे घरीदारी त्यांना आदराचे स्थान. पण आजचा दिवस तसा वेगळाच. त्याचे कारण म्हणजे आजोबांचे रागे भरण्याचे कारण तिघांनाच माहित, त्यात मी, आजी व आजोबा.
मी त्यावेळेस तिसरी चौथीत असेन. मे महिन्याची सुट्टी लागली की माझा मुक्काम आजोळीच हे ठरलेलेच. तसा मी आजीचा लाडका होतो. सुट्टीतले दिवस तिच्याबरोबर मजेत जात. ती पहाटे उठत. गंगागोदावरी वर पहाटेच स्नानास जात. खंडेरावाच्या कुंडात स्नान आटोपले की काळारामाच्या काकड आरतीला हजेरी लावे व आम्ही बच्चेकंपनी उठण्याच्या आत परतत सुद्धा असे. वर्षातून बऱ्याचदा ती पौर्णिमेपासून ते पौर्णिमेपर्यंत हेमंतातील कार्तिक स्नान, शिशिरातील हाडं गारठवणाऱ्या थंडीतही पौष स्नान, व माघ स्नान नेमाने करत. चैत्र, वैशाखातलं तसं पहाटेचं स्नान तेवढं सुसह्य असे. बाकीची स्नानं ती सोशिकपणे भक्तिभावाने करे. त्यामुळे तिच्याभोवती सात्विक वलय जाणवे.
सुट्टीत दिवसभर गल्लीत हुंदडून झालं की रात्री दमूनभागून आजीच्या कुशीत झोपण्याचे सुख तिच्या इतर नातवंडांपेक्षा माझ्या वाटेला जास्त आलंय. खरंतर आजी गोष्ट सांगते व मुलं ऐकतात असं घडत असतं, पण आमच्या बाबतीत वेगळं होतं. शाळेत व गीतेच्या वर्गात ऐकलेल्या महाभारताच्या गोष्टी मीच रंगवून रंगवून आजीला सांगत असे निजताना व ती आपली माझी पाठ थोपटत असे. “ जयू गोष्ट छान सांगतो! ” हे तिच्याकडून ऐकायला गोड वाटत असे. असं होतं तिचं अन् माझं नातं.
पूर्वी हातगाडीवर मीठ विकणारा गल्लीत येत असे. तसेच नारळाची करवंटी माप म्हणून माठात बुडवून दारोदारी दही विकणारा ही येत असे, आणिक “ सुयाऽऽ सागरगोटे” म्हणून मोठ्याने ओरडत कातकारी बाया ही येत. पाटा वरवंट्याला टोच्या मारून देणारे ही येत. तसेच दारासमोरच लहानसा खड्डा करून त्यात कोळसे टाकत अंगार फुलवून त्यावर पितळी भांड्यांना कल्हई लावून देणारे ही येत. या सगळ्यांमधे आगळी वेगळी येत ती कोमटण. कोमटण हा आमच्यातला खासगी शब्द, बाकी सर्वजण तिला बोहारीण म्हणत. ती ठेंगणी ठुसकी, काहीशी जाडेली, काळी कुळकुळीत, डोक्यावर नवी कोरी भांड्यांची पाटी घेऊन येई. ती आंध्रातली( हल्लीचे तेलंगणा) कोमटी जमातीतली म्हणून कोमटीण वा आम्ही म्हणत असू तशी कोमटण होती. ती शक्यतो दुपार उलटून गेल्यावर येई. तोपर्यंत बायकांचे स्वयंपाक घरातील झाकपाक झालेलं असायचं. आली एकदाची की किमान अर्धापाऊण तासतरी थांबे. आजीचं व तिचं विशेष सख्य होतं. ती दोन तीन महिन्यातून एकदा यायची, मग आजी जणू तिची वाटच पहात असल्यागत असायची. हे त्या कोमटिणीलाही ठाऊक असायचं. आजी ढीगभर कपडे अगोदर गाठोड्यातच बांधून ठेवायची. मग त्या बदल्यात हवी ती भांडी घ्यायची. आजोबांकडे भिक्षुकी होती. मुंबई व भारतातून कुठूनही श्राद्ध क्रियाकर्मासाठी माणसं यायची. ती कपडे देऊन जायची. आजी ते कपडे बाजूला ठेवत व त्यातून कोमटिणीशी व्यवहार करे. आजीने निम्माशिम्मा संसार अशाच कोमटिणीकडून घेतलेल्या भांडीकुंडीने रचला होता.
कोमटण उन्हातून आल्याने आजी अगोदर तिच्यासमोर पाण्याचा तांबा धरे. मग दोघी एकमेकींची, मुलाबाळांची ख्यालीखुशाली विचारपुस करत. एकमेकांच्या सुखदुःखांचीही देवाणघेवाण होत. प्रसंगी डोळ्याला पदर लावणं ही होई. “भाकरतुकडा असेल तर दे गं माई.” असं कधीकधी ती हक्कानं आजीकडून मागून घेई. तिचं चूळ भरून झालं की सावकाश मग आजी विचारे, “ हं, काय आणलंस दाखव बघू?” मग खरा अध्याय सुरू होत. ती कोमटीण कपड्यांचं गाठोडं उघडायचा आग्रह करे तर आजी भांडी पाहण्यात मश्गुल होत. दोन्हीत घासाघीस सुरू होई. हे नको, ते नको, माझ्याकडे आहेत सगळी. वेगळं काही दाखव. मग ती कोमटण पाटीच्या तळाला लपवून ठेवलेली ठेवणीतली भांडी काढे, मग आजीचा चेहेरा फुले. लहानमोठी पातेली, ताटवाट्या, चमचे, साणसी, तवे अगदी टिफीनही आजी निरखून निरखून पाही. पसंत असेल ते बाजूला ठेवे व मग गाठोडं उघडत असे. तसं त्या कोमटिणीच्या मागण्या सुरू होई, आणखी कपडे आण, हे तर जुनेपुराणे, फाटके आहेत. घालता येईल असे दाखव, मग आजी आणखी एक लहानसं गाठोडं आणे व दोघींचं समाधान होईपर्यंत बोलणी चाले. व्यवहार संपला की आजी चहा ठेवायला उभी होई. हक्काचा चहा घेऊनच कोमटण जात असे ते पुढच्या वेळेस नवी भांडीकुंडी घेऊन येण्याचे वचन देतच.
मला तो दिवस अजूनही लख्ख आठवतो. त्यादिवशी ती कोमटीण आपल्याबरोबर धाकट्या बहिणीलाही घेऊन आली होती दुपारचीच. त्यादिवशी भई गंगेवरची कामं आटोपून लवकर घरी आले होते. तसेच आजोबा आजी दुपारीच एका लग्नाला जाऊन आले होते. आल्यावर आजीने लुगडं बदललं, पण चोळी बदलायची राहून गेली घाईगडबडीत. दुपार नंतर कोमटण आल्यावर नेहेमीप्रमाणे नमस्कार, चमत्कार झाले, तसे त्या कोमटिणीची व तिच्या बहिणीची नजर आजीच्या चोळीवरच खिळली. ती चोळी तशी होती ही खासच. मखमली जांभळ्या रंगाची, त्यावर वेलबुट्टीची पांढरी कशिदाकारी व जरीचा काठ व सोनेरी अस्तर लावलेली. आजीनं भांडी पहायला सुरूवात केली पण दोघींचं मन सौद्यात रमेना. आजीच्या लक्षात आलं सगळं, तसं तिने गाठोडं उघडून कपडे दाखवायला सुरूवात केली. कोमटिणीनेही मग बोलायला सुरुवात केली. पण तिच्या बहिणीची नजर हटता हटेना. तिने सरळ सरळ त्या चोळीचीच मागणी केली. आजी म्हणाली, “अगं, मी ही दोनदाच तर घातलीय. शिवाय जर ही आहे त्यात, इतक्यात कशी देऊ? ” तर कोमटिणीच्या बहिणीने हट्टच धरला. नेहेमीच्या कोमटिणीने त्यांच्या भाषेत बहुधा तेलुगू असावी, सांगून पाहिलं, की “असं नेसलेलं वस्त्र मागू नये कधी.” पण तिची बहीण बधली नाही. दुसऱ्याच क्षणी आजीनं ती चोळी उतरवून कोमटिणीच्या हातात ठेवली. ती कोमटीण पहातच राहिली. मीही. आजीनं त्यादिवशी एकही भांडं घेतलं नाही. कोमटिणीला व तिच्या बहिणीला चहा पाजून बोळवण केली. त्या दोघी गेल्यावर मी वेड्यासारखं आजीला विचारलं. “ए, आजी तू ती इतकी छान व महागडी चोळी देऊन का टाकली? ” तसं आजीनं मला जवळ घेत शहाण्या माणसासारखं सांगितलं, “हे बघ जयू, तिची बहीण नादान होती, पण तिची नजर सारखी माझ्या चोळीवरच होती, तिचा जीव त्यात गुंतला गेला होता एका क्षणात. मी ते अगोदरच हेरलं. तिची नजर वाईट का चांगली हे मी नाही सांगू शकत, पण जर ती चोळी मी पुन्हा घातली असती तर ती मला साहली नसती. कुणाकडे असं एकटक पाहणं वाईटच, त्यातही त्यातून काही मागणं तर आणखी वाईट. असं घडलं तर देऊन टाकावं देण्यासारखं असेल तर, आपला मोह कमी होतो.” मी अवाक् होऊन आजीकडे पहातच राहिलो. तसं माझं वय लहानच होतं. हे सगळं कळण्या पलिकडचं. मी मात्र हे सगळं आजोबांना साग्रसंगीत सांगितलं तसं त्यांना कधी नव्हे तो राग आला. आजोबांनी आजीसाठी ते खास लुगडं घेतलं होतं महागाचं व त्यावरची चोळीही हौसेनं शिवून घे म्हणून सांगितलं होतं. सगळं घडून गेलं पण आजोबा आजींना काहीच बोलले नाही. मात्र राग त्यांच्या हालचालीतूनच जाणवत होता.
काय घडलं ते आजीच्या लक्षात आलं. आजोबांचा राग कसा घालवायचा हे आजीला ठाऊक होतं. गल्लीतल्या गोठ्यातूनच आलेल्या ताज्या खरवसात गूळ व केशर घालून वड्या केल्या भईंना आवडणाऱ्या, व माझ्याकरवीच भईंना देऊ केल्या.
© डॉ. जयंत गुजराती
नासिक
मो. ९८२२८५८९७५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈