सौ उज्ज्वला केळकर
☆ परतीच्या वाटेवर… लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, वर्ष सरत आलेलं पाहून, परतीच्या वाटेवरच्या प्रवासातलं एक “स्टेशन “मागे पडलं ही भावना मनात येतेच.
सत्तरी पर्यंतच्या प्रवासात, गंतव्य स्थान ठरवून केलेल्या प्रवासाच्या मिश्र आठवणी बरोबर असताना अटळ अशा गंतव्य स्थानाकडे परतीचा प्रवास सुरु झालाय.
यात कुठेही दुःख, खास करून नैराश्य याचा लवलेश ही नाही.
जन्माला आलेला प्रत्येक जण हे मनापासून स्वीकारतो.
तरीही परतीचा प्रवास कसा असावा याचे आडाखे बांधतोच.
वयपरत्वे कमी झालेली शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती ही इंधनं परतीच्या प्रवासातली गाडी थोडी धिमी करतात. हे हसत मान्य केलं तरी ही इंधनं शेवटपर्यंत संपू नयेत ही प्रार्थना मनोमन सतत बरोबरीने चालत असते.
परतीच्या प्रवासात आपली ही “कुडी “derail “(अपंगत्व ) होऊ नये ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते.
आपल्या मुलांची गाडी सुसाट धावत असते. कौतुक भरल्या अभिमानाने त्या कडे बघत असलो तरी तरी मनात चटकन येऊन जातंच की आपली गाडी त्यांनी “siding “ला टाकू नये.
त्यांचा वेग झेपणारा नाहीये तर आपल्या वेगाशी कुठे तरी जुळवून घेत मधे मधे अशी स्थानक दोघांनी निर्माण करावीत की तिथे ऊर्जा भरून घेता येईल अशी क्षणभर विश्रांती अनुभवता येईल.
या वाटेवरची विधिलिखित स्टेशन्स तर टाळता येणार नाहीच आहेत. पण प्रवास सुखकर होण्यासाठी ची आगाऊ आरक्षणं तर करूच शकतो.जसे की….
साठी नंतर तब्बेतीविषयी अधिक जागरूक राहून स्वतः ला fit ठेवणं गरजेचं आहे.
आर्थिक नियोजन चोख करावं…. छंद जोपासत आपला स्वतः चा समवयस्क गोतावळा, मैत्रीचं कोंडाळ असावं.
नवीन गोष्टींचं मनापासून स्वागत करावं. पुढच्या पिढी बरोबर कमीत कमी संघर्षाची वेळ यावी या साठी आपली आणि त्यांची मानसिकता प्रयत्न पूर्वक, जाणीव पूर्वक जोपासावी.
मुलांच्या संसाराच्या जबाबदाऱ्या अट्टाहासाने आपल्यावर ओढवून घेणं टाळावं.
“आपल्या ” “स्वतः साठी जगण्याच्या महत्वाच्या junction ला आलोय. … आनंदाने राहू या.
आगाऊ आरक्षणाची ही शिदोरी बरोबर घेतलीय, झालाच आत्ता परतीचा प्रवास “सुखकर”,
असं तर म्हणणंच नाहीये.पण सह्य नक्कीच होऊ शकतो.
शेवटी हा प्रवास ज्याचा त्याचा, ज्याला वाटेल तसा करायचा असतो. शाश्वत आणि इच्छित ही स्टेशन्स बिन थांब्याची निघू शकतात.
तरीही बा भ बोरकर यांच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे …
‘दिवस “जरेचे “आले “जरी “त्या काठ जरीचा ” लावू सुखे ‘ .. म्हणत परतीचा प्रवास आनंदाने, समाधानाने करण्याचा मानस ठेवूच शकतो आपण…
लेखिका : सुश्री नीलिमा जोशी
प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈