सौ. सुनीता पाटणकर
मनमंजुषेतून
☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆
धागेदोरे तीनशे पासष्ट दिवसांचे, विणतो आपण ….
सुख दुःखाचे, प्रेमाचे, आनंदाचे,
मैत्र जोडतो, कधी फटकारतो, रुसतो, भुलतो,
कधी ताणतात, कधी सैलावतात, बंध नात्याचे,
पौष घेऊन येतो संक्रांत,
” तिळगुळ घ्या अन् गोड बोला म्हणत.”……..
हळदीकुंकू वाण, दागिने हलव्याचे, आणि रथसप्तमी सूर्याची आराधना,
येई फाल्गुन .. … प्रेमरंगात रंगे रंगपंचमी,
भलेबुरे जाळायला होळी,
चैत्राची पालवी फुटली, गुढीपाडव्याला गुढी उभारली,
गुढी ऐक्याची, सद् भावाची, देशभक्तीची,
सुरु होतं हिंदू नववर्ष,
चैत्रागौर, हळदीकुंकू, डाळ, पन्ह, उसळ हरभऱ्याची,
हापूस, पायरीचे आगमन, घरोघरी आमरस पुरीचे जेवण,
वैशाखाचे रणरण ऊन,
परीक्षा,अभ्यास, सुट्टी, निकाल, धामधुम,
पावसाची चाहूल, रिमझिम, रिपरिप,
कृषीवलांची लगबग, नांगरणी, पेरणी,
मुलांची सुट्टी संपली, शाळा, कॉलेज, रेनकोट,छत्री, पुस्तक,वह्या, गणवेश,
जेष्ठाचे आगमन,… ललनांची वटसावित्री,
आषाढस्य प्रथम दिवसे म्हणत, येणारा मेघदूत,
निसर्गपूजा, बैलांचे कौतुक बैलपोळा..
श्रावण आला, पूजा नागोबाला….
सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौरी,
बृहस्पति पूजा बुधवारी, शुक्रवारी लक्ष्मी येई घरी,
शनिवारी मुंज मुलांना जेवण, रविवारी आदित्यांचे पूजन,
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, भावाबहीणीच गठबंधन,
रोज गोडधोड … खीर, दींड, पुरणपोळी, नारळीभात, खांतोळी, पेढे,बर्फी, मेवामिठाई,
मसालेभात, कटाची आमटी, भजी, वडे डाव्या बाजूला,
पाठोपाठ गणराया आला … सुशोभन, रांगोळी
गणेशाचे आगमन …. पूजा आरती,मंत्रपुष्पांजली … आली,आली मोदकांची थाळी,
अश्विनात विजयादशमी … लगेचच येणार दिवाळी,
आकाशकंदील, किल्ला… फराळाचा हल्लगुल्ला,
वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज,
पाहुण्यांची लगबग, तुळशीच लग्न, घरच्या लग्नांचे मुहूर्त, “शुभमंगल सावधान”,
मार्गशीर्षातल्या गुरुवारी श्रद्धेने पूजन, उपवास करिती महिला,
म्हणेतो,येतो नाताळ, तो साहेबाचा … परिणाम थोडा गुलामीचा,
असे संपतात बारा महिने, संकल्प राहतात अधुरे,
पुन्हा नववर्ष, नित्य,नवा हर्ष, उभारी, नवे संकल्प, उत्साहाचे वारे
जीवनाचं हेच असे सार …
इंग्रजी महिन्यातच जगतो, तरी मराठे महिने जगवूया,
ते पाठ करण्याचा संकल्प करुया,
इतकीच छोटीशी इच्छा,
….. नववर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा……
© सौ. सुनीता पाटणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈