डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
आज 31 डिसेंबर 2023, उद्या एक जानेवारी 2024… दोन दिवसातलं अंतर फक्त 24 तासंच…. या दिवसापासून त्या दिवसाकडे पोहोचायला मात्र वर्षभर वाट पहावी लागली… !
शिखरावर जाऊन झेंडा रोवायचं काम फक्त एक मिनिटाचं… पण त्यासाठी जीव धोक्यात घालून अख्खा डोंगर चढायला लागतो, तसंच काहीसं हे…!
झेंडा रोवण्यापेक्षा जीव धोक्यात घालून तुम्ही कसे चाललात हे जास्त महत्त्वाचं….!
किनाऱ्याशी आल्यावर, किनारा आणि नाव यामध्ये अंतर फक्त एका पावलाचं असतं… पण त्या अगोदर अख्खी नदी पालथी घालताना; वल्ही मारून धाप लागलेली असताना, तुम्ही कसे तरलात हे जास्त महत्त्वाचं…!!
एखाद्या ठिकाणी पोचण्यापेक्षा, पोचण्यासाठी केलेला प्रवास, वाटेत आलेल्या अडचणींचा सामना म्हणजे आयुष्य…!
आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? तर ज्ञान आणि भान…
कोणत्या वेळी काय करावं, याचं “भान”म्हणजे “ज्ञान”…
आणि कोणत्या वेळी काय करू नये, याचं “ज्ञान” म्हणजे “भान”…!
गाडी जोरात पळवायची असेल तर काय महत्त्वाचं ?एक्सीलेटर ??…मुळीच नाही…!
गाडी जोरात पळवायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा असतो तो ब्रेक…!
निष्णात ड्रायव्हर, गाडी सुरू केल्यानंतर पहिल्यांदा चेक करतो तो ब्रेक…
थांबण्याची खात्री असेल, तरच त्या जोरात पळण्याला अर्थ आहे… ब्रेकच नसेल तर पुढे जाऊन आदळणार हे नक्की…
गाडी चालवणं हे झालं “ज्ञान” आणि योग्य वेळी ब्रेक दाबून थांबणं हे झालं “भान”…!
ज्ञान आणि भानाचं समीकरण एकदा कळलं की आयुष्यातलं गणित सोपं होवुन जातं….
ज्ञान असूनही भान हरवलेली किंवा भान असूनही ज्ञान नसलेली अनेक मंडळी या वर्षभरात मला भेटली… अनेक भले बुरे अनुभव आले आणि मी त्यातून समृद्ध होत गेलो.
अनेक भल्या भुऱ्या गोष्टी या वर्षाने माझ्या झोळीत घेत गेलो….
डिसेंबर महिन्यात आपल्या साथीने घडलेल्या घटनांचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…
भिक्षेकरी ते कष्टकरी
- थंडीसाठी स्वेटर विणायला घ्यावं आणि थंडी निघून गेली तरीही काही कारणानं ते अपूर्णच राहावं… अशी अनेक अपूर्ण आयुष्यं आजूबाजूला दिसतात…
अशीच एक प्रौढ महिला….
बालपण आणि तरुणपण काबाडकष्ट करून आई-वडिलांना जगवण्यात गेलं…. कालांतराने आई वडील गेले; पुढे हिला अपंगत्व आलं.
कुणी नोकरी देईना आणि स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी भांडवल नाही…. शेवटी नाईलाजाने जगण्यासाठी शनिवार वाडा परिसरात भीक मागायला सुरुवात केली.
28 डिसेंबर रोजी छप्पर असलेली एक हातगाडी आणि विक्री योग्य सामान तिला घेऊन दिले आहे, ती आता त्या गाडीत बसून व्यवसाय करुन सन्मानानं जगते आहे.
चला, बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वेटर आज तुम्हा सर्वांच्या साथीने या थंडीत विणून पूर्ण झालं….!
- चार अंध ताईं आणि एक दादा यांना या महिन्यात नवीन वर्षाचे कॅलेंडर विकायला दिले. यांचं”न्यू इयर”…” हॅप्पी” करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न…!
- सध्या जातीवरून”राजकारण” सुरू आहे, आम्ही जातींचा उपयोग करुन”समाजकारण” करत आहोत…
चर्मकार समाजाचे एक आजोबा रस्त्यात भीक मागत आयुष्य जगत होते, त्यांना चप्पल विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे….
नाभिक समाजाचे दुसरे आजोबा रस्त्यावर भीक मागत होते, त्यांना केश कर्तन आणि दाढी कटिंगचा व्यवसाय टाकून दिला आहे….
ज्या ठिकाणी हे लोक भीक मागतात…. शक्यतो त्याच ठिकाणी मी त्यांना व्यवसाय टाकून देतो….
ज्या मातीत हजारदा आयुष्याची कुस्ती हरलो…. त्याच मातीत, त्याच जागेवर जिंकण्याची नशा काही और असते…!
जमिनीला पाठ लागली म्हणुन कुणी हरत नसतं… पडूनही न उठणं म्हणजे हरणं….!
वरील आठही व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं समाधान घेवून आम्ही 31 डिसेंबर साजरा करत आहोत.
आयुष्यातलं आणखी एक वर्ष संपलं…. ??? संपू दे…. . पर्वा कुणाला….?
आठ नवीन आयुष्यं उभी राहिली या नशेत आम्ही अजून झुलतो आहोत…!
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈