श्री सुनील काळे
मनमंजुषेतून
☆ चित्रकारांच्या व्यथा… भाग-२ ☆ श्री सुनील काळे ☆
पाचगणी फेस्टिवल निमित्त तीन दिवस आलेल्या गणेश कोकरे व सिद्धांत पिसाळ यांचे अनुभव — पाचगणी या ठिकाणी लाईव्ह पेन्सिल स्केच करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले गेले होते. फेस्टिवल तीन तारखेला संपला व चार तारखेला सकाळी आम्ही महाबळेश्वर फिरण्याचे ठरविले. नऊच्या सुमारास आम्ही आमचे निसर्ग चित्रणाचे साहित्य बरोबर घेऊन मोटरसायकल वरून निघालो निसर्गाचा आनंद घेत घेत श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी पोहोचलो. गाडी पार्क केली व पायी चालत चालत कृष्णामाई मंदिर या ठिकाणी पोहोचलो. समोरचे निसर्ग सौंदर्य पाहून भारावून गेलो. माझा विषय ‘वारसा’ असल्यामुळे कृष्णामाई मंदिर मला खूपच आवडले. त्यामुळे लगेचच मी माझे निसर्गाचित्रणाचे साहित्य काढून एका कोपऱ्यामध्ये मंदिराचे स्केच करायला सुरुवात केली. कोणत्याही पर्यटकांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊन मंदिर पूर्ण दिसेल अशा ठिकाणी बसलो. चित्र काढण्यात मग्न झालो सुंदर असा ठेवा समोर असल्यामुळे त्याचे चित्र रेखाटण्यात खूप आनंद होत होता माझ्याबरोबर सिद्धांत होता तो ही एका कोपऱ्यात बसून चित्र काढत बसला होता जवळजवळ वीस मिनिटे आम्हा दोघांनीही मंदिराचे पेन्सिल स्केच केले माझे स्केच पूर्ण झाल्यामुळे मी जलरंगात रंगविण्यासाठी माझी पॅलेट व रंग बाहेर काढले रंगाला सुरुवात करणार तेवढ्यात लोंढे मॅडम आल्या व म्हणाल्या तुम्हाला या ठिकाणी चित्र काढता येणार नाही त्यांनी बंद करण्यास सांगितले काढलेले स्केच पुसून टाका असी तंबी दिली. मी छान चित्र झाल्यामुळे त्यांना विनंती केली चित्र काढायला कुठेही बंदी नसते पर्यटक सुद्धा फोटो काढत आहेत चित्र काढणे हा गुन्हा नाही. त्या खूपच भडकल्या चित्र पुसता येत नाही बहुतेक तुम्हाला म्हणून त्यांनी स्वतः खोडरबर हातात घेतला व चित्र खोडून काढले .मग चित्र पुसल्यावर तुम्ही इथे थांबू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे धमकावले व आम्हाला हाकलून दिले आम्ही त्यांना विनंती करत होतो तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवर परवानगी मिळवून द्या त्यांना आमचे कार्डही दिले मी कास पठार परिसरातील रहिवासी आहे ओळखपत्रही दाखवले फोन मधील मंदिरांची चित्रही दाखविली त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. चित्र काढू नका असा बोर्डही नाही म्हणाल्यावर त्यांनी आम्हाला तिथे थांबूच नका असे सांगितले मुंबईवरून परवानगी आणा असे सांगितले आम्ही त्यांच्याकडून लोंढे सरांचा नंबर घेतला त्यांनाही फोन केला परंतु त्यांनीही उलट सुलट उत्तरे देऊन फोन बंद केला आम्ही आमचे साहित्य गोळा केले पुसलेले स्केच घेऊन त्या ठिकाणाहून निघून गेलो.
. . . .
क्षेत्र महाबळेश्वर (कृष्णामाई मंदिर) या ठिकाणी चित्र काढत असताना आलेला एक अनुभव
— गणेश तुकाराम कोकरे
शिक्षण : G.D.Art
व्यवसाय : चित्रकार (सातारा)
(प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्य अतिथी शोधायचे त्या कार्यक्रमांची तयारी करायची.)
– इथून पुढे.
मग वाई ते मुंबई ट्रान्सपोर्टसाठी ट्रक शोधायचा . त्याला मुंबईची माहीती नसते म्हणून ट्रकमध्येच बसून जायचे .हमाली आपणच करायची कारण सोबत माणूस नेले तर त्याची व आपली राहण्याची सोय नसते . आठ दहा दिवस लॉज किंवा हॉटेल बुकिंग करायचे . प्रतिदिवशी चार पाच हजार रुपये त्याचा खर्च + GST चार्ज भरायचा . लॉजच्या ठिकाणापासून प्रवास , जेवण , खाणे ह्या रोजच्या त्रासाविषयी मुंबईत तर बोलायचेच नाही , निमूटपणे ते सगळे सहन करायचे .
त्यानंतर चित्र भिंतीवर टांगणे त्यासाठी सहा सात हजार रुपये ठरवून द्यायचे ते दिले नाहीतर तुमचा डिस्पेला लावलाच जात नाही . एकदा 2002 साली जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन होते . माझी खूपच वाईट परिस्थिती होती , त्यावेळी माझा शाळेचा कलाशिक्षकाचा पगार चारहजार सहाशे रुपये होता . सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत शाळेत वेळ द्यावा लागायचा . प्रदर्शनाची चित्रे लावण्यासाठी दाजी व मोरे नावाचे शिपाई होते . त्यांनी चित्र गॅलरीत लावायचे सात हजार रुपये मागितले . मी घासाघीस करून पैसे कमी करत होतो . सगळेच चित्रकार पैसेवाले नसतात हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो . ते म्हणाले ठिक आहे तुमची चित्रे तुम्हीच लावा . मी चित्र लावण्यासाठी स्टूल किंवा उंच ॲल्यूनियमचा घोडा मागितला तर म्हणाले तो तुमचा तुम्ही आणायचा . आम्ही देणार नाही .आता मोठा प्रश्न पडला . माघार घेतली , नाईलाज होता . शेवटी पैसे द्यायला तयार झालो . प्रदर्शनाच्या सात दिवसात चित्रांच्या विक्रीनंतर देतो म्हणालो . दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता उद्घाटन होते , बाकीची तयारी करून प्रवास करून जहाँगीर आर्ट गॅलरीत हॉलमध्ये पोहचलो तर चित्र जमीनीवर होती तशीच पडलेली . शेवटी मी , माझी पत्नी स्वाती आलेले मुख्य पाहुणे त्यांचे सुटाबुटातील सगळे मित्र व पाहुणे आमची पेंटींग्ज भिंतीवर लावत बसलो .नंतर उद्घाटन झाले . त्या दिवशी घामाने थबथबलो होतो ,चित्रकाराचा सारा संघर्ष सर्वांनी पाहीला .जीव नकोसा झाला त्यादिवशी . पण तरीही सहा हजार रुपये त्यांनी घेतले ते कायमचे डोक्यात लक्षात राहीले .
[मला मात्र गॅलरीत चित्र टांगायचा जॉब करावे असे वाटू लागले तो जॉब आवडला . कलाशिक्षक म्हणून पाचगणीच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत आर्ट टिचरचा जॉब करून साडेचार हजार रुपये पगार मिळविण्यापेक्षा जहाँगीरमध्ये वॉचमनचा पगार तर मिळतोच शिवाय एका रात्रीत एका हॉलचे चित्र टांगायचे पाच सहा हजार मिळाले तर उत्तमच आणि आता तर प्रत्येक आठवडयाला जहाँगीरमध्येच सहा गॅलरी आहेत . एका महिन्यात चार आठवडे येतात]
कलाकार कलानिर्मिती करतो तोच तेवढा आनंदाचा क्षण असतो . कारण तो वेडा असतो . त्याला कलानिर्मितीच्यानंतरची व्यावसायिक गणिते जमत नाहीत. प्रदर्शनाच्या उत्सवाची तयारी करणे इतके सोपे काम नसते . त्यामूळे इच्छा असूनही चित्रांच्या किंमती कमी लावता येत नाहीत . कारण या चित्रांची चांगल्या किमंतीत विक्री होईल अशी त्याला आशा असते . त्यानंतर त्याला त्याचे कुटूंब , दैनंदीन घरखर्च , दुखणी , आजारपणे , वीजबील ,पाणीबील टॅक्सेस भरायचे असतात . शिवाय राजकीय नेत्यांसारखे , नोकरदारांसारखा नियमित पगार नसतो . राजकीय नेते पाच वर्षांनंतर निवृत्त झाले की त्यानां कायमस्वरूपी कुटूंबाला मोठ्या रकमेचे उतारवयात पेन्शन मिळते. याउलट आयुष्यभर कलाकार टेन्शनमध्येच जगत असतो . कारण या देशात कलाकार म्हणून जगणे मोठा शाप आहे . कलाकारांची आठवण राजकीय पुढाऱ्यानां, आयोजकानां त्यांचे कार्यक्रम पार पाडताना ॲक्टीव्हॅटीची शोभा वाढविण्यापुरती दाखवण्यापुरते असते . चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी एखादे प्रदर्शन भरवायचे त्यानंतर कलाकारांची आठवणही येत नाही . ती आठवण जेव्हा पुढच्या वर्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळीच येतो .
प्रत्येक चित्र काढण्याची कथा , त्या चित्राची अनुभूती जशी वेगळी असते तसाच प्रत्येक प्रदर्शनाचा एक मोठा अनुभव असतो . प्रत्येक वेळी नवी माणसे भेटतात एक नवा अनुभव देऊन जातात . या अशा अनुभवातून थोडे थोडे शहाणपण येते त्या सुधारणा करत परत नवा अनुभव घेत जीवनचा प्रवास करत राहायचे.
पूर्वी माधव इमारते , श्रीराम खाडीलकर यांच्यासारखे कलासमीक्षक नियमित प्रदर्शन पाहायला यायचे , गप्पा मारायचे व माहीती घेऊन सुंदर लेख वृत्तपत्रांमध्ये छापून यायचे . ते वाचून अनेक कलारसिक गॅलरीत प्रदर्शन बघायला यायचे . एकदा तर दूरदर्शनच्या रत्ना चटर्जी यांनी चांगली मोठी मुलाखत घेऊन चित्रप्रदर्शनाला मोठी प्रसिद्धी दिली याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे कसलीही पैशांची दक्षिणा मागितली नाही . पण आता प्रिंट मिडीया व टिव्ही मिडीया कलाकारांवर नाराज झाला आहे . या कलांकारांचे लेख लिहून आम्हाला काय फायदा ? मग अर्थकारण , राजकारण सगळे आले . भरपूर पैसे दिले तर मोठी बातमी येते .कलाकार सक्षम असला की तो सगळे करतो . पण छोट्या कलाकारांच्या प्रदर्शनाची दखल कोणी घेत नसते . करीना कपूरचे बाळ (तैमूर )आता रांगत चालतो . काल त्याला दोनदा शी झाली अमक्या तमक्या नटाचा नटीचा ब्रेकअप झाला . कोणाचा डिवोर्स झाला या बातम्यांसाठी त्यांच्याकडे जागा असते पण चित्रकलेचे किंवा इतर कलाकारांच्या इव्हेन्टसची दोन ओळीची साधी बातमी छापण्यासाठी त्यांच्या वृत्तपत्रात जागा नसते .
आमच्या सातारा जिल्हयात तर एकही कलादालन नसल्याने कलाकार जिवंत आहेत का नाहीत हेच माहीती पडत नाही . आम्ही फक्त औंधच्या राजांचे कौतूक करून भवानी संग्रहालय साताऱ्यात आहेत याचा अभिमान बाळगणार . पण देशाच्या पच्च्यांहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यात एकही आर्ट गॅलरी निर्माण न करणाऱ्या राजे व नेत्यांविषयी काय बोलावे व कोण बोलणार ? सगळं अवघड प्रकरण आहे .मग कलाकारच निर्माण होत नाहीत .कलाप्रदर्शने होत नाहीत व कलारसिकही निर्माण होत नाहीत . सगळे कलाकार मग पुण्यामुंबईत प्रदर्शन करायला धावतात त्यानां पर्यायच नसतो दुसरा .
त्यामूळे प्रदर्शन करणे हे एक दिव्यसंकट असते . ते पार पाडताना अनंत अडचणी येत असतात . प्रदर्शनाच्या काळात मोर्चे , आंदोलने , दंगली , बॉम्बस्फोट , रास्तारोकोसारखे प्रकार आले की प्रदर्शन संपूर्ण आर्थिकदृष्टया झोपते व कलाकारही कायमचा संपतो . म्हणून मी नेहमी म्हणतो हे माझे शेवटचे प्रदर्शन आहे .
पण सच्चे खरे कलाकार कधी संपत नसतात . कलानिर्मितीची आस त्यानां संपून देत नाही . ते सतत नव्या विषयांचा , नव्या प्रदर्शनाचा ध्यास घेऊन नव्या दिवसाची सुरवात करतात . कारण कला हेच त्यांचे जीवन असते . एक चित्रप्रदर्शन पाहणे म्हणजे त्या चित्रकाराचा विचार , त्याचा दृष्टीकोन , त्याचा ध्यास, त्याचे संपूर्ण जीवन , त्याचे व्यक्तिमत्व त्याची कलासाधना समजून घेणे असते .
– समाप्त –
(स्वाती व सुनील काळे यांच्या पाचगणी , वाई व महाबळेश्वर परिसरांतील ” व्हॅलीज अँन्ड फ्लॉवर्स ” या शीर्षकाखाली भरणाऱ्या चित्र प्रदर्शनाला सर्व कलाकार व कलारसिकानां सप्रेम निमंत्रण !)
© श्री सुनील काळे
संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३.
मोब. 9423966486, 9518527566