श्री अमोल अनंत केळकर
☆ अयोध्या डायरी भाग-१– लेखक : श्री विश्वास चितळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
अयोध्या वरून परत येत आहे . सर्व चितळे परिवार कडून श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला जाता आले, रीप्रेझेन्ट करता आले. संपूर्ण कार्यक्रमात खूप ऊर्जा जाणवली. आपल्या सर्वांकडून श्रीरामाला वंदन करून आता परत येत आहे.
पुष्करने ही यात्रा छान घडवून आणली.
कार्यक्रम संघ परिवाराने खूप आखीव घडविला.
मी सकाळी ९:३० वाजता गेलो व आसनस्थ झालो . शेजारी तंजावर चे राजे भोसले बसले होते . मी मराठीत सायली बरोबर बोलत होतो . ते पाहून राजांनी मराठी मध्ये माझ्याशी सवांद साधला व विचारले आपण कोठून आलात . तंजावर मध्ये अजून हि २०० मराठी कुटुंब राहत आहेत . त्यांनी व राजेंनी अजूनही मराठीची नाळ सोडली नाही व त्यांनी मला तंजावर चे निमंत्रण दिले .
आणखी थोड्या वेळात हेमामालिनी यांचे आगमन झाले . संयोजक त्यांना प्रथम रांगेंत बसण्यासाठी सांगत होते पण त्यांनी, मी आपल्या जावया बरोबर आले आहे असे म्हणत, माझ्या शेजारी असलेल्या खुर्ची वर बसणं पसंत केले .मी त्यांना माझी जागा देवूं केली ती त्यांनी न स्वीकारतां
सांगितले की मी इथेच बसेन .
आम्ही सर्व स्थिरस्थावर होत असताना सोनू निगम ,शंकर महादेवन यांच्या जय श्री रामाच्या गीतांनी वातावरण भक्तीमय झाले .सर्व आसमंत जय श्रीरामांच्या उद्घोषांनी प्रफुल्लीत झाला.
संघाचे स्वयंसेवक सर्वांची अंत्यत अदबीने विचारपूस करत होते.
समोरील कलात्मक रामलल्लाचे निवासस्थान इतक्या सुंदर पानाफुलांनी सुशोभीत केले होती कि ती भव्य वास्तू , जणू स्वर्गातुन अवतरली आहे असा भास होत होता.
संपूर्ण अयोध्या नगरी आणि भारत ह्या मूहूर्ताची वाट पाहत होते, तो क्षण आला .मा.प्रधानमंत्री मोदीजी पूजा साहित्य घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढून गर्भ गृहःमध्ये गेले .
गणेश स्तुती सुरु झाली . संकल्प गुरुजी सांगू लागले .सनई चवघड्यांचा मंगल स्वर मंदिरातून येवू लागला .
मंत्र घोषात पूजा सुरु झाली. आम्हा सर्वांना स्वयंसवेकांनी घंटा दिल्या .घंटा वाजू लागल्या .जय श्री रामांचा उद्घोष टिपेला पोचला .
आर्मीच्या दोन हेलिकॉप्टरांनी बरोबर प्राणप्रतिष्ठे च्या क्षणी गुलाब पाकळ्यांचा वर्षाव सुरु केला
आणी समोर असलेल्या स्क्रीन वर श्री राम लल्लांचे दर्शन झाले .
क्रमशः…….
लेखक : श्री विश्वास चितळे
प्रस्तुती : श्री अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com