सौ. मंजुषा सुनीत मुळे
☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मी आणि आजार ह्यांची ‘दोस्ती ‘ऐन तिशीतली.
‘दोस्ती’ शब्दाने चमकलात? आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं कि दोस्ती होते. .
वयाच्या अडतिसाव्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेऱ्या मारत असताना मला ह्रृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला. माझा भाऊ डाॅक्टर प्रकाश संझगिरीने मला वाचवलं. मी आठवड्याने दक्षिण कोरियातल्या ‘सोल’ ला ऑलिंपिक कव्हर करायला जाणार होतो. तो थेट आयसीसीयूत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथे बदललं. पण आधुनिक औषध, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्र्वास, मित्रांचा आधार, सकारात्मक विचार, एन्जियोप्लास्टी आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही वृत्ती त्यामुळे मी जवळपास नाॅर्मल झालो.
त्यानंतर ३४ वर्ष भूरर्कन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती. पण मनाचा इतर भाग मध्यान्हासारखा उजळला होता. विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती. नवा मोहर येत होता.
इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला.
ती तारीख होती २२ ऑक्टोबर २०२२. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला, टी २० विश्वकपासाठी. त्यावेळची दिवाळी संपता संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुराने गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत, किडणीच्या चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं.
मी हादरलो. पण स्वतःला सावरलं. सर्व विसरून तीन दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रड रड रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती, अश्रुतून बाहेर फेकून दिलं. अश्रु पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले. “सर, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.” आणि लढायला सज्ज झालो.
डॉक्टर स्मृतीच्या इम्युनो थेरपिने ८ सेंटिमीटरची गाठ, वर्षभरात ५.४ सेंटिमीटर वर आली. त्याकाळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले.
कधी कधी वाटायचं, “बस झाले उपचार. थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं.”
कधी अतिसार, कधी बध्दकोष्ट, त्यामुळे भगंदरचा त्रास. त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं.
भूक नाही, खाणं कमी, त्यामुळे वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होतं.
डॉक्टर स्मृतीचं म्हणणं होतं, “आता ऑपरेशन करून ट्युमरग्रस्त किडनी काढून टाकावी” पण माझ्या हृदयरोग तज्ञ भावाने ती कल्पना स्वीकारली नाही. माझी ३५ वर्षाची हृदय रोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती. ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो ३५ वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही.
पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानेच बोटं धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं.
पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं. आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं. आणि निदान झालं. माझ्या पित्ताशयात खडे आहेत.:
मी स्वतःशी हसलो. कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. काय काय आजारांनी ३५ वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतलाय! तुम्ही नाव सुध्धा ऐकली नसतील.
‘पायलोनायडल सायनस’ ऐकलंय?
एपिडीडीमायटीस, आय टीपी, वगैरे… सर्जन, डॉ हितेश मेहतांनी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायलाच हवं. म्हणजे ऑपरेशन आलं.
पित्ताशय नाही काढलं तर….
तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुदा “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा.” ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती.
माझा भाऊ डॉ. प्रकाश संझगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौध्दीक चक्र फिरायला लागली. पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची मग त्याच वेळी उजवी, ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे.? त्याने विचार मांडला.
पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं. तो सर्जीकल स्ट्रायिक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेने आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं.
डॉ प्रकाशने त्याचा उत्कृष्ठ संघ निवडला. ॲनेस्थेटिस्ट सर्वात महत्वाचा. बदलत्या परीस्थितिनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉ प्रकाशने त्याच्या विश्र्वासातला निवडला. डॉ फाल्गुनीची टीम होती. डॉ हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते. डॉ हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती. आधी पित्ताशय काढायचं. आणि त्यावेळेला इतर महत्वाची (vital) प्यारामिटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची.
ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून सामने पाहत होतो. लिहित होतो. ऑपरेशन पासून मन दुसरीकडे नेत होतो.
पण एकाक्षणी मी भाऊक झालो. मी भावाला म्हटलं, “दिवाळी नंतर ऑपरेशन करूया का?”
तो म्हणाला, “ऑपरेशन शिवाय मी तुला लीलावती बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही.”
मी म्हटलं, “बरं मला तीन तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, व्हि जे टी आय, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती (गणेश उद्यान) सिध्दीविनायक, वानखेडे, आणि माउंट मेरीलां जाऊन येतो.” लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं.
तो म्हणाला, “तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायाने जाशील.” ह्या शब्दांनी मला धीर दिला. मनातली ऑपरेशन थिएटर मध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली.
ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी आ य सी सी यू मध्ये झाली. लग्नापूर्वी वधूला नटवतात, तसं माझं नटणं झालं.
वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या. माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सरकवून आत आली आणि म्हणाली, “बाबा, काय ऐकायचंय?”
मी म्हटलं, “माझा सी रामचंद्र ह्यांचा कार्यक्रम ऐकव.”
मी संगीतात त्या ‘नटण्याच्या’ वेदना विसरून गेलो. नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो.
आठ तास ती मंगलाष्टकं चालली. शेवटच्या शुभ मंगल सावधानने सर्वांनी निःश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठयावरचं माप मी ओलांडलं होतं.
पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता.
जवळचे नातेवाईक, आणि मित्र ह्यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना, त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवत होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो. आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होतं. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते.
युरोलॉजिस्ट डॉ हेमंत पाठक, अनेस्थेटिस्ट डॉ फाल्गुनी, आणि गॅसस्ट्रो इंटेस्टाईनल सर्जन डॉ हितेश मेहता, यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलले, माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली, आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप, ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या, जेंव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेंव्हा मधल्या आठ तासातलं काहीही आठवत नव्हतं. मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट ॲटॅकच्या वेळी मला माॅर्फिंनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा.
माझ्या ऑपरेशनचं वैद्यकीय भाषेतल वर्णन Laparoscopic cholecystectomy and right radical nephrectomy असं होतं. डॉ मेहतांनी जेंव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँगरीन झाल्याचं लक्षण होतं. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटलं होतं.
चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉ मेहतांनी हा गुंता, अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान, अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉ पाठकांनी त्यांना मदत केली.
त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही. पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता, हे मला कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता.
आणि मग माझ्या भावाने मास्टर स्ट्रोक मारला. माझा भाऊ आणि दोन सर्जन ह्यात चर्चा झाली. पुढे जायचं आणि किडनी काढायची का? माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावाने ताडलं, आणि निर्णय घेतला, जायचं पुढे.
हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता.
मग डॉ पाठकना डॉ मेहतांनी किडनी काढायला मदत केली. ऑपरेशन थिएटर मध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती, देवाचा धावा करत होती. आणि मी शांतपणे दोन जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो.
त्याच वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाचा सामना अटीतटीने खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जिवाच्या आकांताने खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले. आणि जिंकलें. दोघंही जवळपास एकाचवेळी जिंकले.
डॉ स्नेहाने मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला. पण शुध्दी आली नव्हती. नीट शुध्द मी पुन्हा आय सी सी यू त आल्यावर आली. तेंव्हा पाहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली, “ऑपरेशन चांगलं झालं. पित्ताशय, किडनी दोन्ही काढलं.”
भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला.
माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉ प्रकाश संझगिरी ह्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सारखं नेतृत्त्व केलं.
देवाने आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला. लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी.
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈