सौ राधिका भांडारकर

??

☆ “नकार…” ☆ सौ राधिका भांडारकर 

नकार ही एक प्रतिक्रिया आहे. ‘हो’ म्हणजे होकार आणि ‘नाही’ म्हणजे नकार  इतकी साधी या शब्दांची व्याख्या असली तरी या एका शब्दाने होणारे परिणाम हे खूप व्यापक आहेत. नाही, नको म्हणण्याने कदाचित संपूर्ण जीवनाच्या वाटाही बदलू शकतात. कधी त्या सकारात्मक असू शकतात तर कधी कडवट, बोचऱ्या, दुःखदही असू शकतात.

काही वेळा नाही म्हणणं फारसं कठीण नसतं पण आयुष्यात अशा काही प्रसंगांना सामोरे जावं लागतं की त्यावेळी नकार देण्यासाठी हवं असतं बळ, एक ठामपणा, निश्चित भूमिका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामासाठी लागणारी जबरदस्त सहनशीलता, खंबीरपणा आणि तितकाच तटस्थपणाही.  विचलित होणारं मन अथवा द्विधा मनस्थितीत घेतलेल्या निर्णयाची फलश्रुती ‘आपण चुकलो, आपण उगीच नाही म्हणालो’ या मानसिकतेतही घेऊन जाऊ शकते. म्हणूनच नकार द्यायला बळ लागतं.

नकार द्यायची वेळ वेगवेगळ्या आघाड्यांवर येऊ शकते. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय. आपल्या भोवताली वावरणाऱ्या जवळच्या, दूरच्या नात्यांतल्या, मैत्रीतल्या माणसांच्या बाबतीतही ही वेळ येऊ शकते.

सर्वप्रथम ‘नकार’ हा शब्द उच्चारल्यावर मनात येते ते म्हणजे विवाह ठरण्यापूर्वी मुलीने मुलाला अथवा मुलाने मुलीला दिलेला नकार.  बऱ्याच वेळा नापसंतीचे खरे कारण देणं अवघड असतं. अशावेळी पत्रिका जमत नाही किंवा आपण एकमेकांना कंपॅटीबल नाही होऊ शकत, थोडक्यात आपली क्षेत्र वेगळी आहेत, स्वभाव वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहेत वगैरे वगैरे पण आडवळणाने दिलेला,समोरच्या व्यक्तीला न दुखावता दिलेला  हा नकारच असतो. या ठिकाणी दिलेला नकार म्हणजे वेळीच घेतलेला योग्य निर्णय ठरू शकतो. नाहीतर आई-वडिलांच्या, इतरांच्या दबावाखाली येऊन जर कुठला निर्णय घेतला गेला तर “आयुष्यात दुःखाचे दार उघडले” असेच होऊ शकते.

माझ्या एका मैत्रिणीचं लग्न जमत नव्हतं. पाच मुलींचे आई वडील फार चिंतेत होते. धाकट्या बहिणीही रांगेत होत्या. त्यामुळे आई-वडिलांना हीचं लग्न जमवण्याची अत्यंत घाई झाली होती. अखेर एका मुलासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी माझ्या मैत्रिणीकडून होकार मिळवला. पण मनातून माझी मैत्रीण नाराज होती.

पहिल्याच भेटीत त्या मुलाने तिला विचारले होते,” तुला मच्छरदाणीत झोपायला आवडते का?”

हा काय प्रश्न झाला? तोही एकमेकांशी अजिबात ओळख नसताना… माझ्या मैत्रिणीजवळ  लग्नाळू भांडवल नसेल कदाचित पण तिची योग्यता सर्वसाधारण पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त होती. तिने जेव्हां मला हे सांगितले तेव्हा मी तिला म्हणाले,” तू ठाम रहा. कुठल्याच दबावाखाली मुळीच येऊ नकोस. फार तर काय होईल थोडे दिवस तुझ्या कुटुंबात अशांती राहील पण तू या मुलाला नकारच दे. तुझं आयुष्य तू असं पणाला लावू नकोस.”

आणि शेवटी तिने त्या मुलाला नकार दिला. वादळ झाले. त्या वादळात मी तिची मैत्रीण म्हणूनही भरडले गेले पण कालांतराने झाले सारे शांत. आज माझी मैत्रीण एक सन्मानित सुखी जीवन जगत आहे याचा मला अभिमान आहे.

बँक गॅरंटी  हा एक अत्यंत धोक्याचा प्रकार आहे. मी ४० वर्षे बँकेत नोकरी केली. कर्ज खात्यात काम करत असताना मला अनेक अनुभव आले. कित्येक गॅरंटीयरना मी उध्वस्त झालेले पाहिले आहे.  त्यामुळे कर्जाचे फॉर्म भरून घेताना मी कर्जासाठी गॅरंटी देणाऱ्या प्रत्येकाला सावध करत असे.

“ही व्यक्ती  कोण लागते तुमची?   तुम्हाला खरोखरच भरवसा आहे का यांच्याविषयी? कुठल्याही कारणाने ही व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर कायद्याने बँक तुमच्याकडून कर्जाची वसुली करून घेऊ शकते. तेव्हा विचार करा. नकार द्यायला मुळीच घाबरू नका.”

माझ्या या चांगुलपणाचे बक्षीस म्हणून काही दिवसांनी माझी या खात्यातून हकालपट्टी झाली.  मुळातच कर्ज वाटपामध्ये अनेक राजकीय संबंध गुंतलेले असतात. माझ्या या,आणि इतर गैरवर्तणुकीच्या  नकारात्मक भूमिकेमुळे मला डावलण्यात  आले अर्थात त्याचे मला अजिबात दुःख नाही. 

नकार आणि व्यवहार याचा खूप जवळचा संबंध आहे.” ताट द्यावे पण पाट देऊ नये” असे म्हणतात. बाप आणि मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होतात. मुलांवरील प्रेमासाठी आई-बाप मुलांना सर्वस्व देऊन टाकतात. सगळीच मुले वाईट नसतात पण बहुतांशी अशा आई-वडिलांची झालेली दुर्दशा आपण पाहतोच की.  वेळीच नाही म्हणणे हे म्हणून गरजेचे असते.

“नाही कशी म्हणू तुला”  या भावनेपायी अनेकांना खूप सोसावं लागलंय. फार जवळचं नातं असतं. केवळ एका नकारापायी मैत्रीचं अगदी रक्ताचं नातंही तुटण्याचा संभव असतो.

कधी कधी समोरचा माणूस इतका लाचार असतो की दयेपोटी किंवा एक संधी याला देऊन बघूया या भावनेने “नाही” म्हणायला मन धजावत नाही पण अशावेळी भविष्यात “उगीच मदत केली” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जसे पूजेत आपण जे अर्पण करतो त्यावर पाणी सोडतो तद्वत, केलेल्या शारीरिक, आर्थिक कुठल्याही मदतीवर पाणी सोडण्याची वृत्ती जरूर बाळगावी. जेणेकरून नंतरचे मन:स्ताप  टळू शकतात.

दान देणं, देणाऱ्याचे हातच  घ्यावेत, अडचणीत सापडलेल्यास  सहकार्य करावे,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले” ही आपली संस्कृती आहे. आपला धर्म. आहे तो पाळणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे नेहमीच नकार देणं हे योग्य नाही. तो आत्मकेंद्रीपणा ठरू शकतो. स्वतःपुरतं जगणं,” बाकी जगाचं काहीही होऊ दे’ ही भावना मात्र जोपासली जाऊ नये. कधीकधी आपलं बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते अशावेळी माघार घेणं हा मात्र पुरुषार्थ नाही.

मात्र आपली शेजारीण, जिच्याशी आपले संबंध खूप चांगले आहेत, मैत्रीचे आहेत पण रोज रोज ती हातात वाटी घेऊन काही ना काही मागायला आपल्या दारी येते. कधी साखर, कधी चहा पावडर, कधी कोथिंबीर आणि असेच काही बाही.. पण कधीतरी आपण तिला नाही म्हणावे ते  याकरिता की त्यातूनच तिला तिचा स्वाभिमान टिकवण्याची शिकवण मिळावी अथवा स्वावलंबनाचा धडा मिळावा.

मला एक प्रसंग आठवतो. माझ्या एका जिवलग मैत्रिणीने माझ्याकडे एक दिवस माझ्या सासूने मला  दिलेली सोन्याची बोरमाळ मागितली. त्याचे कारण तिने असे सांगितले की,” या लग्नात मला सर्वांसमोर चांगलेच नाकावर टिच्चून मिरवायचे आहे”

ती माझी इतकी जवळची मैत्रीण होती की तिला मी नाही म्हणणं म्हणजे तिच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होण्यासारखं होतं. तिच्यापेक्षा जास्त मीच निर्णय न घेऊ शकल्यामुळे बेचैन झाले होते.  तेव्हा मला माझ्या नवऱ्याने मदत केली. तो म्हणाला,” तुला नक्की कशाची भीती वाटत आहे? तुझी आणि  तिची तू नाही म्हटल्यामुळे मैत्री तुटेल की इतकी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती सोपवण्याचे भय तुला वाटत आहे? कारणं काहीही असू दे पण तू यावेळी ठामपणे नकारच द्यायला हवा आहेस. तू तिला फार तर अशा बेगडी देखाव्यापासून परावृत्त करण्याचा मैत्रीच्या माध्यमातून समंजसपणे प्रयत्न करावास म्हणजे ती ही दुखावली जाणार नाही.”

थोडक्यात नकार देऊ नये आणि नकार देता आला पाहिजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र केव्हां नकार द्यावा आणि केव्हां देऊ नये हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. केवळ भिडस्तपणा, मुखदुर्बलपणा अथवा संकोचाने चुकीचा  निर्णय कधीही घेऊ नये. योग्य वेळी नकार देण्याचा निर्णय हा फायद्याचा ठरतो असे म्हणण्यापेक्षा तो बरोबर असतो असे मी म्हणेन.

माझ्या मनात नेहमी येतं युधिष्ठराने त्याच वेळी द्युत खेळण्यास प्रतिस्पर्ध्याला नकार दिला असता तर …

कैकयीने  मंथरेचा कपटी उपदेश डावलला असता  तर…

सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडण्यास नकार दिला असता तर….

तर कितीतरी अनर्थ टळले असते ना. आपली पुराणे, आपला इतिहास वाचताना वेळोवेळी हा प्रश्न मनात येतो. त्यावेळी मात्र आपण म्हणतो जे व्हायचे ते होतेच. या ईश्वरी योजना असतात, विधीलिखित असते. पण तरीही एक संधी आपल्याजवळ असते. डावलण्याची, वेळीच नकार देण्याची. आणि तो देता आला पाहिजे इतकं मात्र मनापासून वाटतं…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments