सुश्री वर्षा बालगोपाल
☆ “मराठी” च्या काही व्याख्या… — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
मराठी कशी आहे.. म्हणजे मराठी म्हणजे काय असे मला वाटते .. ते या काही व्याख्यांमधून मांडण्याचा प्रयत्न… मराठी भाषादिनानिमित्त…
☆
मनामनात प्रत्येकाच्या
राहणारी अशी
ठीपक्या ठीपक्यांची सुंदर रांगोळी…… ती मराठी.
मन्जूळ नादाने
रात्रंदिवस जी
ठीबकते मन पिंडीवर…… ती मराठी.
मशाल चंद्राची पेटलेली असताना
रात्रीच्या त्या रम्य आकाशात
ठीणग्या चांदण्यांच्या सांडते…… ती मराठी
महाल शब्दांचा सजवून
राग विविध छेडून
ठीकठिकाणी रसाळता शिंपडणारी …… ती मराठी
मधुर मिलनाची ओढ मनात ठेउन
राजीव अंतरंगी फुलवत
ठीय्या मनाचा घेऊन क्षणात अंगी भिनते …… ती मराठी
महान लेणीमध्ये
राष्ट्रीयतेचा झेंडा हाती फडकवत
ठीक-या न उडालेला शीलालेख ……. ती मराठी
मनगाभा-यात जळणारी कापराची लडी जी
रानावनातून भरून वाहणारी दुथडी जी
ठीगळे जोडून ऊब देणारी गोधडी जी ……ती माय मराठी
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈