श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
अपघातामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.प्रचंड बोर झालेलो पण नाईलाज.मित्राचा फोन आला “काय रे,काय उद्योग करून घेतला.”
“विशेष नाही.छोटासा अक्सीडेंट झाला”
“काही सीरियस नाही ना”
“अं हं,मुका मार जास्त लागलाय.”
“नक्की काय झालं.”
“पिवळ्या विमानानं धावती भेट घेतली.”
“कुठल्या विमानानं??”
“पिवळ्या.रोज सकाळी लेकीला शाळेत सोडायला जातोस तेव्हा पाहिलं असशीलच की….”
“कशाला डोक्याची मंडई करतोस.नीट सांग नाहीतर फोन ठेवतो”मित्र वैतागला.
“अरे स्कूल व्हॅनची धडक बसली”
“असं स्पष्ट बोल की,उगीच विमान वगैरे कशाला??”
“बस,व्हॅन,रिक्षा रस्त्यावर सकाळी विमानाच्या स्पीडनं तर पळतात.”
“हो रे,कशाही गाड्या चालवतात.भीतीच वाटते.खरंच रस्त्यावरची विमानच.काहीतरी करायला पाहिजे.”
“एक कल्पना आहे.तुझी मदत पाहिजे”
“नक्की!!काय करायचे ते बोल.”
“व्हिडिओ शूट करायचयं.कुठं,कधी,कसं ते सांगतो.आपल्या भागातील प्रसिद्ध शाळेच्या प्रिन्सिपलची अपॉईटमेंट मिळालीय.सोबत येतोस का”
“डन,काळजी हे”मित्राने फोन ठेवला.ठरल्याप्रमाणं प्रिन्सिपलांना भेटलो.उपक्रमाची माहिती दिली.त्यांनीसुद्धा लगेचच सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि कार्यक्रम ठरला.
—
रविवारी सकाळी शाळेच्या हॉलमध्ये प्रिन्सिपल,शिक्षक,पालक प्रतिनिधी आणि सुमारे पंचवीस स्कूल बस,व्हॅन,रिक्षाचे ड्रायव्हर जमले होते.नक्की कसला कार्यक्रम आहे याविषयी सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.“पिवळं विमान” व्हाटसप ग्रुपमध्ये ऍड केल्याचं प्रत्येकाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यावर आपसात चर्चा सुरू झाल्या.तितक्यात प्रिन्सिपल मॅडमनी बोलायला सुरवात केली.“आज सुट्टी असूनही आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार.एका चांगल्या कारणासाठी ग्रुप तयार केलाय.कृपया कोणीही ग्रुपमधून बाहेर पडू नये.आज इथं का जमलोय,काय करायचं सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.जास्त वेळ घेणार नाही.”प्रिन्सिपल मॅडमनी थोडक्यात प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सूत्र माझ्याकडं दिली.वॉकरच्या आधारानं उभं राहत बोलायला सुरवात केली. “पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद!!नवीन ग्रुपवर शॉर्ट व्हिडिओज पाठवलेत ते आधी पहा.नंतर बोलू” व्हिडिओ बघितल्यावर चूळबुळ सुरू झाली.
“हे काय आहे”वैतागलेल्या एकानं विचारलं.
“आपल्याच शाळेच्या गाड्यांचे गेल्या आठ दिवसातले व्हीडिओज.” माझ्या उत्तरावर एकदम गदारोळ सुरू झाला. काही ड्रायव्हर तावातावानं,ओरडून बोलायला लागले.
“आम्ही आमचं काम प्रामाणिक पणे करतो आहोत.उगीच चुकीची माहिती पसरवू नका.”
“बदनामी करण्यासाठी बोलावलंयं का?तसं असेल तर आम्ही पण गप्प बसणार नाही.”
“सगळी पोरं सेफ आहेत.तरी सुद्धा असले विडिओ कशाला दाखवता”
“रस्ता म्हटल्यावर किरकोळ गोष्टी होणारच.आम्ही व्यवस्थितच गाड्या चालवतो.”
“पोटच्या पोरांइतकीच गाडीतल्या मुलांची काळजी घेतो.”
“उगीच शाळेच्या आणि पालकांच्या मनात काहीबाही भरून देऊ नका”
“तुम्ही कोण कुठले.शाळेशी काय संबंध” चिडलेले ड्रायव्हर संतापून बोलत होते.प्रिन्सिपल मॅडमनी विंनती केल्यावर सगळे शांत झाले.मी पुन्हा बोलायला सुरवात केली“सर्वप्रथम एक गोष्ट क्लियर करतो की इथं कोणाला दोष देण्यासाठी किवा जाब विचारण्यासाठी हा कार्यक्रम नाहीये.”
“मग हे व्हिडिओ कशासाठी?.मुलांची काळजी घेतो.त्यांचे लाड करतो ते दिसलं नाही का?”एकाच्या बोलण्यावर बाकीच्यांनी ‘बरोबरयं’ म्हणत माना डोलावल्या.
“तुमच्याविषयी तक्रार नाही परंतु हे व्हिडिओज सुद्धा वस्तुस्थिती आहे.”
“आधी तुम्ही कोण ते सांगा.”
“पंधरा दिवसांपूर्वी सकाळी स्कूल व्हॅननं मला उडवलं. नशीब बलवत्तर म्हणून पायावर निभावलं.”
“रस्त्यावर अपघात होणारच.नेहमी दोष ड्रायव्हरचा नसतो”
“शंभर टक्के मान्य.माझ्या केसमध्ये ड्रायव्हर खूप घाईत,मोबाइलवर बोलत गाडी चालवत होता.”
“मग त्याच्यावर कारवाई करायची.”
“पण त्यानं मूळ प्रश्न सुटणार नाहीये.”
“एकानं चूक केली म्हणून सगळे वाईट नसतात.”
“रोज रिस्क घेऊन ओव्हरटेक करता,गरज नसताना कट मारता,रॉंग साइडनं गाडी घुसवता,गाडी सोबत फोनही चालूच असतो.हे खूप धोक्याचं आहे.आतापर्यंत काही गंभीर घटना झाली नाही परंतु यापुढे कधीच होणार नाही ही खात्री नाही.त्यात गाडीत लहान मुलं असतात.बेफाम गाडी चालवून त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवत आहोत.याचा जरा विचार करा.सर्वांना विनंती आहे की विनाकारण जीव धोक्यात घालू नका.”
“पुढे काय होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही.”
“करेक्ट पण काळजी घेणं तर आपल्या हातात आहे.वेळ गाठण्याससाठी म्हणून मन मानेल तशी गाडी चालवणं बरोबर नाही.स्वतःबरोबर अनेक पालकांचा काळजाचा तुकडा तुमच्यासोबत असतो त्याचाही जीव पणाला लावता.” बोलण्याचा परिणाम तात्काळ दिसला.हॉलमध्ये चिडिचूप शांतता पसरली.
“माफ करा.साहेब.तुमचं बोलणं ऐकून डोळे उघडले.”एकजण हात जोडत म्हणाला.
“तुम्ही माफी मागावी म्हणून नाही तर बेदरकारपणे सुसाट वेगानं जाणाऱ्या गाड्या पाहून पोटात गोळा येतो.तसंही आता घराबाहेर पडलं की जीव मुठीत घेऊनच फिरावं लागतं.हे अनेकांचं मत आहे.मला ठेच लागल्यावर लक्षात आलं की नुसती चडफड करण्यापेक्षा तुमच्याशी एकदा संवाद साधावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही.कृपया गैरसमज करून घेऊ नये, ही नम्र विनंती आणि मनपूर्वक धन्यवाद!!”
“साहेब,आजपासून आम्ही काळजी घेऊ.हा ग्रुप आता आम्ही चालवू.आमच्या गाड्यांना तुम्ही दिलेलं “पिवळं विमान” नाव भारीयं.आता गाडीचा स्पीड वाढला की हे नाव नक्की आठवेल आणि आपसूकच कंट्रोल होईल.”ड्रायव्हरच्या दिलखुलास बोलण्यावर ‘हो, हो’ म्हणत सगळे मोठ्यानं हसले.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈