श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का!’  पुष्पा घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन.’

आण्णांनी `ठीक आहे.’ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय,  तो बाप-लेकीतला,किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो,  गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने,  इतकेच नव्हे,  तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या  उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले.  स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही,  अशा असहाय्य,  परित्यक्ता,  विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली,  तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम,  पाठ्यपुस्तके,  प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या  आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार,  उमेद,  उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

—- क्रमश:

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments