सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
परिचय
शिक्षण: एम ए मराठी-
व्यवसाय: मैत्री गंधर्व फॅमिली रेस्टॉरंट, उमरगा-पार्टनर आणि गृहिणी. कॉलेज जीवनापासून लेखनाची आवड. कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेत सहभाग LR (लेडीज रिप्रेझेंटिटीव) पदाची मानकरी.
लेखन–
- मुरुड येथील साप्ताहिक गणतंत्र मध्ये पहिला लेख “एक शाम मस्तानी मदहोश किये जाय”. प्रकाशित. औसा येथील दर्पण मासिकातून कविता प्रकाशित… लातूर येथील “ब्रह्मसमर्पण”, मासिकातून 36 लेख प्रकाशित. फुलोराच्या पंधराव्या काव्य संमेलनात “फुलोरा रत्न” पुरस्काराने सन्मानित.
- फुलोरा साहित्य समूहाच्या सतराव्या काव्य संमेलनात विशेष साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शुभंकरोती साहित्य समुहाकडून.. नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित.
- शब्दवेधी बाणाक्षरी समूहाकडून मला साहित्य रागिणी पुरस्कार आणि काव्यरंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- “ काव्यरेणू “ हा पहिला काव्यसंग्रह १ फेब्रुवारी २०२४ धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात प्रकाशित झाला.
- धुळे येथील काव्य संमेलनात सांजवात कला साहित्य पुरस्काराने सन्मानित
- शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे महिला दिनी अष्टभुजा पुरस्काराने सन्मानित
सांजवात हा रांगोळी आणि चारोळी संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.
राहणार औसा.
मनमंजुषेतून
☆ “हिंदोळ्यावर…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
उंच झोका झाडावर
पाळण्याची सय आली
झोपाळा ओसरीवर
मंद मंद झोका घाली
*
हिंदोळ्यावर सुखदुःखाची
स्वप्ने सारी पाहिली
गतकाळाची आठव पूंजी
झोपाळ्यावर राहिली
*
झोपाळा म्हटलं की ओसरीवर अगदी मधोमध माळवदाच्या कड्यांना बांधलेला झोपाळा आणि त्यावर घातलेली गादी आणि लोड आठवतात. बालपणापासून कितीतरी रूपात हा झोका आपल्याला भेटतो नाही का. अगदी जन्मल्याबरोबर विधिवत बाळाला पाळण्यात घातलं जात. त्याला नामकरण म्हणतात. आणि तिथून हा झोक्याचा प्रवास सुरू होतो. माझ्या घरी अजूनही माझा सागवानी लाकडी पाळणा आहे ज्या पाळण्यामध्ये मी तर खेळलेच, पण माझी मुलं देखील त्याच पाळण्यात खेळली. पाळण्यापासून सुरू झालेला हा प्रवास मग झोक्यापाशी येऊन थांबतो.
माझ्या बालपणी तर आमच्या सरकारी वाड्यामध्ये उंच माळवदाला झोका बांधलेला असायचा आम्ही भावंड नेहमी नंबर लावून झोका खेळायचो.
कोण सर्वात उंच झोका घेऊन चौकटीला पाय लावतो त्याची स्पर्धा लागायची आमची. किती सुंदर काळ होता ना तो बालपणीचा!
झोका आठवला की बालपणीची आठवण येते. आणि
“एक झोका चुके काळजाचा ठोका”अशी काहीशी अवस्था माझी होते त्याला कारणही तसेच आहे. माझ्या माहेरी चिंचेचे मोठं बन आहे. त्याला चिंच मळा म्हणतात. चिंचेची झाडं इतकी जुनी आहेत, उंच आहेत की नागपंचमी आल्यानंतर त्याच उंच झाडांना झोके बांधले जातात. माझ्या शेजारी एक ताई राहायची आणि ती मला झोका खेळायला घेऊन जाण्यासाठी घरी आली.मी तेंव्हा जेमतेम पाचवी सहावीच्या वर्गात असेन. माझ्या आईला सांगून मला ती ताई घेऊन जात होती तेव्हा आई म्हणाली, “तिला जास्त मोठ्या झोक्यावर नको हो बसवूस.”त्या ताईने मला तिच्या पायामध्ये बसवले आणि ती त्या उंच झोक्यावर उभी राहिली झोका उंच उंच गेला. चार-पाच जणांनी दिलेला झोका तो खूपच उंच गेला आणि जणू काही आम्ही आकाशात गेलो की काय असे वाटून मी घाबरून गेले उंच गेलेल्या झोक्यावरून एकदम सटकले, डोळे पांढरे झालेले. मी सटकलेली पाहून खालची सर्व मुलं-मुली मग मोठ्यांनी ओरडू लागली. सर्वजण खूप घाबरले होते पण प्रसंगावधान राखून त्या ताईने झोका थांबेपर्यंत मला तिच्या पायामध्ये आवळून धरले व एका पायावर ती झोक्यावर उभी राहिली व मला खाली पडू दिले नाही. पण तेव्हापासून मी कधीच तितक्या उंच झोक्यावर बसले नाही… अशी ही झोक्याची काळजाचा ठोका चुकवणारी आठवण.
ओसरीवरचा चौफाळा अजून आमच्या घरामध्ये आहे. माझ्या चुलत्यांनी त्याचा फक्त आता पलंगा सारखा वापर सुरू केला आहे. किती आठवणी असतील ना या चौफळ्याच्या. किती जणांची सुखदुःख ऐकली असतील याने. सुखदुःख ऐकवणारी सर्व माणसं काळाच्या पडद्याआड गेली. पण या चौफाळ्याच्या मनात मात्र यांचा शब्द न शब्द रुंजी घालत असणार. खरंच याला जर बोलता आलं असतं ना तर याने पूर्ण घराण्याच्या कथा ऐकवल्या असत्या अगदी पानाचा डबा घेऊन करकर सुपारी कात्रत गावकीचा कारभार पाहणारे घराचे कारभारी झोपाळ्यावर बसूनच तर बोलत असणार. दोन-तीन माणसं आरामशीर बसू शकतील इतका मोठा हा चौफाळा आहे. दुपारच्या वेळेला पुरुष मंडळी नसताना स्त्रियांनी देखील याचा आस्वाद घेतला असणार. कारण पूर्वीच्या काळी पुरुष माणसे घरात असताना, स्त्रिया कधी ओसरीवर येत नसत. पण ते बाहेर गेल्यानंतर मात्र ह्या स्त्रिया चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी नक्की ओसरीवर आणि चौफळ्यावर बसत असणार. नुसतं कुठल्या हो गप्पा मारणार हातात वातीचा कापूस, संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी नीट करणे, अशी सवडीची काम घेऊन मगच त्या गप्पा मारणार. कितीतरी स्त्रियांची हितगुजं, ऐकली असतील नाही का या झोपाळ्यांने. नाही नाही तो जणू त्यांचा सांगातीच झाला असेल.
घरात कोणी नसताना एखादं तरुण जोडपं देखील नक्कीच विसावलं असणार झोपाळ्यावर. ओसरीवरून अंगणातलं टिपूर चांदणं आणि थंड वाऱ्याची झुळूक घेतली असणार त्यांनी अंगावर. कधी घरातल्या आजी आजोबाही पत्ते खेळत बसले असणार. किंवा त्या काळात सोंगट्या देखील खेळायचे, झोपाळ्यावर बसून.घरातली छोटी मुलं देखील या झोपाळ्यावर दंगामस्ती करायची, आणि मग एखादं डोहाळे जेवण जर घरामध्ये असेल तर मात्र काय थाट वर्णावा या झोपाळ्याचा. त्याच्याकड्यांना छान छान फुलांच्या माळा वेली पाने लावून सुरेख सजवले जायचे. त्या रुबाबदार झोपाळ्यावर बसवून मग त्या पहिलटकरणीचे सर्व लाडकोड करत सोहळे साजरे व्हायचे. घरात माणसांची खूप गर्दी झाली तर एखादं माणूस झोपून जायचं या झोपाळ्यावरचं. कितीतरी जणांच्या परसामध्ये हा चौफाळा असायचा. हिरव्यागार झाडीमध्ये या चौफाळ्यावर बसून मंद मंद झोके घेत सर्वजण आनंद घ्यायची. कितीतरी उपयोग होता या झोपाळ्याचा. आणि भल्या मोठ्या ओसरीची शान होता हा झोपाळा.
काळानुरूप झोपाळ्याचे स्वरूप बदलले. पितळी कडया जाऊन त्या जागी लोखंडी कड्या आल्या. काही ठिकाणी जाड सोल लावूनही झोपाळा बांधला जातो. त्यातही आजकाल आधुनिकीकरण आले आहे. खुर्ची वजा झुला बाल्कनी मध्ये आजकाल आढळतो. शहरांमध्ये मोठमोठ्या उद्यानात झोपाळे असतात.
काळ बदलला तरीही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये हा झोपाळा आपल्या आयुष्यात अजूनही त्याचे स्थान टिकवून आहे. म्हणून शेवटी झोपाळा, झुला, चौफाळा, झोळी, पाळणा, झोका या सर्व हिंदोळ्याच्या रूपांना उद्देशून मी म्हणेन-
बदललेल्या रूपातून
आजही झोपाळा दिसतो
हिंदोळा सुखाचा देतो
आणि गोड हसतो
हितगुज करतात
त्याच्या सवे वारे
झुल्यावर झुलताना
सुखावती सारे
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈