सौ कुंदा कुलकर्णी
वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया
☆ महाभारतातील अंबा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
एक सूडाचा प्रवास महाभारतातील अंबेचे जीवन हा स्त्रीत्वाचा हुंकार आहे. दोन महापराक्रमी पुरुषांच्या अहंकारात तिच्या आयुष्याची माती झाली तिच्या जीवाची प्रचंड तगमग झाली आणि सूडा कडे प्रवास सुरू झाला.
खरंतर ती काशीराजाची प्रेमळ सुस्वरूप हुशार कन्या. तिला अंबिका आणि अंबालिका नावाच्या दोन बहिणी होत्या.तिघी वयात येताच काशीराजाने त्यांचे स्वयंवर मांडले. त्यात भीष्म व त्यांचा सावत्रभाऊ विचित्रवीर्य यांना जुन्या वितुष्टामुळे आमंत्रण नव्हते. भीष्मांना खूप राग आला आणि ते स्वयंवर स्थळी आले. त्याच वेळी सौबल चा राजा शाल्व याला अंबेने माळ घातली. चिडलेल्या भीष्माने तिथे सर्व राज्यांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि अंबा ,अंबालिका, आणि अंबिका या तिघींचे हरण करून, रथात घालून ते आपल्या नगरीत परत आले. व आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य यांच्याशी लग्न करण्यास सांगितले. साहसी अंबेने स्पष्ट सांगितले मला शाल्वाशीच लग्न करायचे आहे मी त्याला तन-मन-धनाने वरले आहे. तिच्या इच्छेनुसार भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला ” भीष्माने तुझे हरण केले. परपुरुषाच्या स्पर्शाने तू भ्रष्ट, पतित झाली आहेस. तुझा कौमार्य भंग झाला आहे.” असहनीय उपेक्षा आणि प्रेम भंगाचे दारुण दुःख घेऊन ती भीष्मा कडे परत आली. “तुम्ही मला पळवून आणलेत, आता लग्न करा. ज्या स्त्रीचे हरण झाले त्या स्त्रीला वडिलांचे दरवाजे बंद असतात.” असे म्हणाली. भीष्म म्हणाले “मी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे “. बाणेदार आंबा म्हणाली,” मला तेच हवे. तुमची प्रतिज्ञा मोडण्यासाठीच मी आले आहे. प्रतिज्ञा मोडलेल्या व्यक्तीला जीवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतात तीच पीडा मला तुम्हाला द्यायची आहे.”भीष्माने नकार दिला. आणि सूडाने पेटलेल्या अंबेने त्यांना धमकी दिली,” तुमच्या मृत्युचे कारण मीच असेन.” आणि वैफल्यग्रस्त होऊन ती जंगलात भटकत राहिली. तिथे तिला परशुराम ऋषींचा शिष्य होत्रवाहण भेटला. त्यांनी सांगितले भीष्माला किंवा शाल्वाला योग्य धडा शिकवण्याचे काम माझे गुरु करतील. त्याच्याबरोबर ती परशुराम ऋषींकडे आली व त्यांना म्हणाली,” मला न्याय हवाय. केवळ स्पर्शाने कौमार्य बाधीत होते तर आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेल्या भीष्माने कोणत्या अधिकाराने मला स्पर्श केला? परपुरुषाबद्दल अनुराग ठेवणारी स्त्री सर्पिणी प्रमाणे विषारी असते आणि ती पूर्ण कुटुंबाचा घात करते असे म्हणून त्याने मला परत पाठवले याचा अर्थ काय? परशुराम खरं तर तिची समजूत घालत होते पण तिचा युक्तिवाद त्यांना पटला. तिला मदत करण्यासाठी त्यांनी भीष्माला बोलावले पण भीष्म आले नाहीत. परशुराम ऋषी खूप संतापले आणि तेच भिष्मा वर चाल करून गेले. दोघेही तुल्यबळ योद्धे. तेवीस दिवस घनघोर युद्ध झाले. दोघांनी महाभयंकर अस्त्रांचा मारा सुरू केला. आता पृथ्वीचा विनाश होईल या भयाने नारदादी देवांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवले. परशुरामाने तिला सांगितले आता मी तुला न्याय देऊ शकत नाही पण माझे गुरु आणि आराध्यदैवत भगवान महादेव यांच्याकडे तू जा. ते नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. अंबेने अरण्यात घोर तपश्चर्या सुरू केली. गंगामातेने स्वतः तिची खूप समजूत घातली. पण अंबे ने जिद्द सोडली नाही. शेवटी शंकर प्रसन्न झाले पण ते म्हणाले या जन्मी त्यांचा मृत्यु करता येणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्यामुळेच त्यांचा मृत्यू होईल. अंबेने स्वतःच लाकडी चिता रचून त्यात उडी घेतली व आत्मसमर्पण केले.
पुढच्या जन्मी शिखंडी च्या रूपाने तिने द्रुपद राजाच्या घरी जन्म घेतला. महाभारताचे घनघोर युद्ध सुरू झाले. शिखंडी अर्जुनाचा सारथी होता. 18 दिवस घनघोर युद्ध झाले. पितामह भीष्मांनी पांडवांच्या सैन्याची धूळधाण उडवली. शिखंडीच्या आड लपून अर्जुनाचा रथ त्यांच्या समोर आला. शिखंडी ला पाहून मी महिलेविरुद्ध शस्त्र उचलत नाही असे सांगून भीष्मांनी आपली शस्त्रे खाली ठेवली ती संधी साधून अर्जुनाने मर्मी घाव घातला आणि भीष्म धारातीर्थी पडले.
महाभारतातील सर्वात दाहक मृत्यू होता. अशाप्रकारे अंबेने आपला पण पूर्ण केला. अपमान आणि विटंबना असह्य झालेली एक स्त्री एका महानायकाच्या मृत्यूचे कारण बनली. जन्मजन्मांतरीच्या सूडाची कहाणी तिथली संपली पण तुमच्या आमच्या मनात ती सदैव घोळ तच राहणार. तिचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा, मनपसंत पती निवडण्याच्या स्त्री अधिकाराचा लढा आणि अन्यायाविरुद्ध सर्वस्व झोकून दिलेला लढा.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈