सौ कुंदा कुलकर्णी
वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया
☆ शतरूपा ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
नैमिषारण्यात मनु शतरूपा तपस्थली असे एक ठिकाण पाहिले. आणि हे दोघे कोण याची उत्सुकता वाढली. तेव्हा कळले की मनूचे वंशज म्हणजे आपण सगळे मानव आहोत व शतरुपा त्यांची पत्नी. म्हणजे मनू आपले आद्य पिता आणि शतरूपा आद्यमाता.
शेषशायी भगवान श्रीविष्णू यांच्या नाभीतून एक कमळ उदयाला आले. त्यातून ब्रह्मदेव प्रगट झाले. श्री विष्णू यांनी ब्रह्मदेवाला आज्ञा केली की तू आता सृष्टी निर्माण कर. ब्रह्मदेवाने आपल्या उजव्या खांद्यातून या विश्वातील प्रथम पुत्र म्हणून मनूची निर्मिती केली. डाव्या खांद्यातून या विश्वातील प्रथम कन्या शतरूपा हिची निर्मिती केली. हे दोघे अतिशय सदाचारी होते. त्यांनी खूप वर्ष राज्य केले. त्यांच्याकडे अनेक शास्त्रे व अनेक विद्या होत्या. त्यांचा उपयोग करून त्यांनी या विश्वामध्ये असलेले अनंत भोग शोधून काढले. त्यांचा पुरेपूर उपभोग घेतला. त्यांना सात पुत्र व तीन कन्या झाल्या. त्यातला सर्वात मोठा पुत्र उत्तानपाद.
आपण आकाशात ध्रुव नावाचा तारा पहातो. अवकाशात असे आढळपद मिळवणारा ध्रुव हा उत्तानपाद राजा चा मुलगा. शतरूपा त्याची आजी. शतरूपा ही पहिली महिला जिला मार्गदर्शन करण्यासाठी आई, आजी, मैत्रीण, शिक्षिका कोणीच नव्हते. ती जन्मजात हुशार होती. गरोदरपण, बाळंतपण हे आज किती अवघड झाले आहे हे आपण पहातो पण कोणत्याही साधनांशिवाय शतरूपाने दहा अपत्यांना जन्म देऊन ती वाढवली. त्यांना योग्य शिक्षण दिले. तिची संध्या, ब्राम्ही, सरस्वती अशीही नावे आहेत.
शतरूपा महान पतिव्रता होती. पतीबरोबर तिने अनेक वर्षे राज्य केले पण त्या नंतर दोघांना असे वाटू लागले की आपण आता राज्यत्याग करून मनुष्य जन्माची परम माहिती प्राप्त करून घ्यावी. आपला मोठा मुलगा उत्तानपाद याच्याकडे राज्यकारभार सोपवून शतरूपा मनु बरोबर साधना करण्यासाठी नैमिषारण्यात गेली. एवढ्या विश्वाची राणी पण सर्वसंगपरित्याग करून नैमिषारण्यात व्रतस्थ जीवन जगू लागली. फक्त पालेभाज्या फळे आणि कंदमुळे खाऊन हे दोघे उपजीविका करू लागले. पुराणात असा उल्लेख आहे की दोघांनी सहा हजार वर्षे फक्त पाणी पिऊन काढली. त्यानंतर सात हजार वर्षे त्यांनी हवा घेणेही सोडले. एका पायावर उभे राहून कठोर तप केले. तेवीस हजार वर्षांच्या या निरासक्त उग्र तपामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले व त्यांनी दोघांना सगुण रुपात दर्शन दिले .वर मागण्यास सांगितले .या दोघांनी भगवंतांना मनोभावे प्रार्थना केली की, जे रूप महादेवाने आपल्या हृदयात खोलवर दडवून ठेवलेले आहे त्या रूपाला आम्ही याची देही याची डोळा पाहू इच्छितो. भगवान विष्णू आपल्या निळसर स्वरुपात त्यांच्यासमोर प्रगट झाले. गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस या ग्रंथात या भेटीचे वर्णन अत्यंत रसाळ पणाने केले आहे.
भगवंतांनी वर माग असे म्हणताच दोघांना धैर्य आले व त्यांनी आम्हाला तुमच्यासारखा पुत्र मिळावा असा वर मागितला. भगवान म्हणाले “तथास्तु”. पुढच्या जन्मी हेच दोघे दशरथ कौसल्या होऊन आयोध्या येथे राज्य करू लागले व भगवान विष्णू श्रीराम म्हणून त्यांच्या पोटी अवतरले. या मनु व शतरूपाची संतती म्हणजे आपण सारे मानव. अशी ही आपली आद्य माता शतरूपा. हिला शतशः वंदन.
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈