सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 167
☆ धरणी – आकाश ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
डोक्यावरती गगन निळेसे
पाया खाली काळी धरती
झाडे ,पक्षी, मनुष्य ,प्राणी
इथे जन्मती आणिक मरती
☆
ईर्षा ,स्पर्धा अखंड चाले
एकेकाची एक कहाणी
असे अग्रणी अकरा वेळा
तोच ठरतसे मूर्खच कोणी
☆
दोन दिसांची मैफल सरते
अखेर पण असते एकाकी
चढाओढ ही अखंड चाले
नियती फासे उलटे फेकी
☆
हे जगण्याचे कोडे अवघड
काल हवे जे,आज नकोसे
गूढ मनीचे जाणवताना
प्राण घेतसे मूक उसासे
☆
गहन निळे नभ, मूक धरित्री
या दोघांची साथ जन्मभर
सगे सोबती निघून जाती
परी द्वैत हे असे निरंतर
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈