सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 171
☆ मी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
स्वतःस पुसते हळूच कोण कोण कोण मी ?
जळात दिसते मलाच, एक दीप द्रोण मी
☆
कुठून वाहे तरंगिणी ? कशास आस ही ?
असाच लागे जिवास, जो उदात्त ध्यास मी
☆
मला न समजे कधीच, कोणता तरंग मी
नभात विहरे मजेत जो, तसा पतंग मी
☆
अफाट वक्ते असोत, भोवती महंत ही
नसेन कोणासारखी परि जातिवंत मी
☆
नगण्य मी धूळ ही, असेन अल्प स्वल्पही
तुला कधी झेपला नसेल, तो प्रकल्प मी
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈