सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 175
झाडे… सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
झाडे दिसतात सर्वदूर
जाऊ तिथे जिकडे तिकडे,
माहेरच्या वाड्याभोवती,
पिंपर्णीची पाच झाडे,
त्यांच्या फांदी फांदीवर
आपसुकच जीव जडे !
आजोळच्या बंगल्याजवळ
गुलमोहराचे लाल सडे
दारापुढच्याआंब्याखाली,
माझे बालपण झुले !
शाळेसमोर शिरीषवृक्ष,
त्याच्या आठवणी लक्ष लक्ष !
सासरच्या इमारतीपाशी
पांगारा आणि सोनमोहर
खिडकीतून देत असतात,
मूक पहारा अष्टौप्रहर!
कितीतरी झाडे अशी
आयुष्याशी नाते जोडतात,
प्रवासात, वळणावर,
झाडे पुन्हा पुन्हा भेटतात,
निश्चल असली तरीही,
आठवणींचा झिम्मा खेळतात!
झाडे कधीच भांडत नाहीत
ती फक्त माया करतात,
आयुष्यभर माणसांवर
आपली गर्द छाया धरतात!
☆
© प्रभा सोनवणे
१६ मार्च २०२३
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈