सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 179
सखी… सुश्री प्रभा सोनवणे ☆
(अनिकेत मधून…….१९९७ नोव्हेंबर)
☆
आयुष्याचं पुस्तक उघडलं की,
पहिल्यांदा तू सामोरी येतेस!
तुझा नितळ सावळा रंग,
दाटलेल्या मेघासारखा
बरसत रहातो पुस्तकभर!
तू नायिका की सहनायिका?
नेमकी कोणती तुझी भूमिका ?
तुझ्या आठवणी पानोपानी,
बहरलेल्या वृक्षासारख्या !
शाळेसमोरच शिरीषाचं झाड,
तुझ्या माझ्यातल्या नात्याचं साक्षीदार!
सारं कसं निर्मळ,निखळ,
उमलत जाणारं कृष्णकमळ!
गणिताच्या पेपराच्या आदल्या रात्री
पाहिलेला,देव आनंद चा ‘गाईड’
तरीही तुला मिळालेले साठ
आणि
माझ्या पेपरावरचे आठ,
अजूनही आठवतात,
आणि आठवणींचं झाड बोलू लागतं ,
कधी मीनाकुमारीची शायरी,
तर कधी अमीन सयानी चा आवाज,
बुधवारची “बिनाका गीत माला”
न चुकता ऐकलेली!
इतिहासाच्या वहीत ठेवलेला,
जितेंद्रचा फोटो आणि
अंगणात खेळलेला,
साही सुट्ट्यो !
बोरीच्या झाडाखाली वाचलेली,
काकोडकरांची कादंबरी,
आणि “मेल्याहून मेल्यासारखं होणं “
म्हणजे काय?
हे न उलगडणारं कोडं!
सारं कसं स्वच्छ वाचता येतंय!
आपल्या वर्गातली मी गीता बाली,
तर तू माला सिन्हा होतीस!
मला मात्र तू नीटशी कळली नाहीस !
आयुष्याचा सिनेमा झाला,
तेव्हाही तू सहीसलामत सुटलीस,
सहनायिके सारखी !
पण मला नायिका व्हायचंच नव्हतं गं !
“ओ मेरे हमराही, मेरी बाह थामे चलना “
म्हणणारी तू–
अर्ध्या वाटेवरच गेलीस निघून,
परतीचे दोर कापून!
तरीही सगळं आयुष्य तू टाकलंयस व्यापून !
हातावर,भाळावर,
मनामनावर,पानापानावर,
कोरलंय तुझ्या आठवणीचं गोंदण!
जन्मभरची व्यथाही तूच दिलीस ना आंदण?
तूच कविता आहेस,तूच कादंबरी !
मी शोधते आहे अजूनही–
तुझ्यातली शकुंतला ,
माझ्यातली प्रियंवदा मात्र,
समजलीच नाही कोणाला !
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈