सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 182
जगणे… सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
आयुष्याचे सिंहावलोकन करताना,
किती सुंदर भासतंय सारंच,
जन्म चांदीचा चमचा घेऊन,
लाडाकोडातलं बालपण,
मंतरलेली किशोरावस्था….
भारावलेलं तरूणपण!
समंजस प्रौढत्व
साठी कधीची उलटून गेली,
तरी आताशी लागलेली,
वृद्धत्वाची चाहूल!
सुंदर,सुखवस्तू,आरामशीर आयुष्य !
किंचित वाईट ही वाटतं,
काहीच कष्ट न केल्याचं,
वाळूतून तेल न काढल्याचं !
पदरात पडलेलं प्रतिभेचं,
अल्प स्वल्प दान…आणि
त्यासाठीच भाळावर लिहिलेल्या,
चार दोन व्यथा!
आणि कुणाविषयी कुठलीच ईर्षा
न बाळगताही,
स्वतःचं सामान्यत्व स्वीकारूनही,
स्वयंघोषितांकडून,
या कवितेच्या प्रांगणातही,
अनुभवलेली कुरघोडी,
निंदानालस्ती …..या वयातही !
पण हल्ली सुखदुःख,
समानच वाटायला लागलंय!
अखेर पर्यंत….
जगावं की मनःपूत,
मस्त कलंदरीत….
“उनको खुदा मिले,
खुदाकी है जिन्हे तलाश”..म्हणत !
मरेपर्यंत जिवंतच रहावे !
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Thanks a lot 🙏