सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 203
☆ पाऊस प्रतिक्षा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
ठरवलं होतं मनाशी,
यंदाच्या पावसात,
भिजायचं तुझ्या समवेत,
करायची पुन्हा एकदा उजळणी
त्या पावसाळी क्षणांची!
तारूण्यातली सारी हिरवाई
आणि पावसाची रिमझिम
दाटून राहिली मनभर…
आणि कितीतरी—
पावसाळी एस.एम.एस. पाठवले तुला!
तुझं प्रत्युत्तर–
“भेटू या ना , यंदाच्या पावसात!”
तेव्हापासून मी प्रतिक्षेत,
तुझ्या आणि पावसाच्याही!
तू ही पाठवलेस एस.एम. एस. …..
पहिल्या प्रेमाचे,पहिल्या पावसाचे,
पण पाऊस आलाच नाही !
यंदा पावसाने खूपच उशीर केला !
आता जाणवू लागली आहे,
त्याची रिमझिम…..
मी साधू पहातेय संवाद,
तुझ्याशी….पावसाशी….
आणि ऐकते आहे,
मोबाईल मधून येणारे….
नाॅट रिचेबल…नाॅट रिचेबल…
हे उत्तर….वारंवार!!!
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈