सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 212
☆ लहान अभंग ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
पंढरीच्या विठूराया
आले तुलाच भेटाया ।
देवा थकला हा देह
नाही आता माया मोह ॥१॥
☆
आयुष्याचा खेळ मोठा
खाच खळग्याच्या वाटा ।
तुझ्या कृपेने सरले
दिन थोडेच उरले ॥२॥
☆
माझा विठ्ठल साजिरा
माझ्या हृदयीचा हिरा।
जीव भक्तीत रंगला
पंढरीत विसावला ॥३॥
☆
तुझ्यावीण देवराया
कोण मार्ग दाखवाया ।
मोहमयी ही दुनिया
लाभो तुझी कृपा छाया॥४॥
☆
चंद्रभागा माझी आई
दूजी असे रूखुमाई ।
बाप विठ्ठल सावळा
माझा भाव साधाभोळा ॥५॥
☆
मी न जना, कान्होपात्रा
परी तूच माझा त्राता ।
जीव कुडीतून जावा
तुझ्या चरणी पडावा॥६॥
☆
“प्रभा” म्हणे विठ्ठला रे
असे घडेल का बरे ।
नाही पुण्यवान फार
तरी जीव हा स्वीकार ॥७॥
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈