सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 233
☆ तू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(स्मृति शेष स्व अनिता निकम (न्यूयॉर्क) – 1 जून 2024))
☆
अचानक गेलीस निघून पैलतीरावर,
आणि मनात खूप खळबळ,
असं का व्हावं?
तशी तू अलिप्तच,
पण कधी जुळले सूर,
तुझे माझे ?
अगदी लहानपणापासून–
आवडायचीसच,
खूपच गोड होतीस,
कुरळ्या केसाचं साम्य,
तुझ्यामाझ्यात!
आत्तेमामे भावंडांत असतंच,
तसं थोडं बहुत साम्य!
तू वेगळीच होतीस
लहानपणापासून….
तुला शोभून दिसायचा..
तो अंगभूत अॅटिट्युड!
खूप फिरलो,
सिनेमे पाहिले…
वाचली पुस्तकं, ऐकली गाणी !
खूप लाभली तुझी संगत,
सात -आठ वर्षाचं
अंतर असूनही,
जुळले विचार,
वाचलं होतं कुठेतरी,
वृषभ-मकर मित्र राशी !
म्हणूनही असेल,
लग्नानंतर गेलीस दूरदेशी…..
तरीही भेटत होतो,
पत्रातून, भेटकार्डातून…
नंतर…
फोन..मोबाईल…व्हाॅटस अॅप वर !
ऐकतेय तुझे व्हाॅईस मेसेज,
वाचतेय वारंवार,
काय सांगत होतीस ते !
तुझ्या बरोबरचे हॉस्पिटल मधले
दिवस आठवतेय ….
बरी झालीस..असं वाटलं फक्त!
गेले तीन महिने,
भासवलंस …
बरी असल्याचं!
मोबाईलवर बोलत होतीस
भरभरून!
निघालीस परत आत्मविश्वासाने एकटीच….न्यूयॉर्कला !
आणि त्याच दिवशी संपली ईहलोकीची यात्रा ,
“डिसेंबर मधे परत भेटू”
म्हणाली होतीस!
नेमकं कोणतं दुःख, वेदना, आजार ??
घेऊन गेला तुला ?
सारं गुढ ,अनाकलनीयच!
गुडबाय, स्वीट प्रिन्सेस,
तिथेही याच दिमाखात रहा —
पण दुःख, वेदना विरहित!!
☆
© प्रभा सोनवणे
३ जून २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈