सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 236
☆ कामिनी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(कामिनी ची फुलं !)
आज खूप दिवसानंतर…
टेरेसवरच्या झाडांना भेटले,
मदनबाण बहरलाय…दरवळ सर्वदूर!
चाफा, कण्हेर, सदाफुली, झेंडू, बोगनवेलही…
स्वतःचं अस्तित्व टिकवून!
गवतीचहा, कढीपत्ता, लिंबुही हिरवीगार!
अंब्याची कलमंही तग धरून!
कोरफड, तुळशीचं स्वतंत्र अस्तित्व!
दोन वड कुंडीत आपोआपच बोन्साय झालेले !
जुई इवल्या इवल्या कळ्या सावरत !
रातराणी आणि कामिनी,
मोठ्या हौसेने लावलेले….दिसेनात कुठेच!
जीव लावल्याशिवाय काही
झाडं जगत नाहीत,
रातराणी सुकून गेली असावी,
तिच्या मुक्या कळ्या उमलल्याच
नाहीत कधी!
पण कामिनी दिसली ,
आणि हायसं वाटलं,
कामिनीला दुर्लक्षून कसं चालेल ?
सुंदरीच ती ,
या झाडाझुडपातली,
काहीशी दुर्मिळ,
म्हणून अप्रुपही तिचं !
कामिनीचा धुंद गंध
अनुभवायला तरी….
जगायला हवं तिचा मोसम
येईपर्यंत!
© प्रभा सोनवणे
२३ जून २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈