सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 243
☆ अभिमंत्रित वाटा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
आयुष्य काजळते अन्
हृदयाशी सलतो काटा
तेव्हाच भेटती सखये
सृजनाच्या अभिमंत्रित वाटा…१
*
दाटते मनात काहूर
भोवती भयाण सन्नाटा
तेव्हाच भेटती सखये
सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….२
*
सागरी नाव वल्हवता
ग्रासती भयंकर लाटा
तेव्हाच भेटती सखये
सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….३
*
घडलेले नसता काही
भलताच होई बोभाटा
तेव्हाच भेटती सखये
सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….४
*
वेगळेपणा जाणवता
ऐहिकास मिळतो फाटा
तेव्हाच भेटती सखये
सृजनाच्या अभिमंत्रित वाटा….५
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈