सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 250
☆ हमराज… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
किती कठीण आहे ना….
आपण जसे नाही ,
तसे दाखविण्याचा प्रयत्न करणं!
एक अशी जागा हवी असते,
जिथे आपण सांगू शकू,
मनाच्या सप्तपाताळात,
लपवून ठेवलेलं,
सारं काही !
म्हणूनच हवी असते एक सखी,
काळाजातले दुखरे कोपरे,
आनंद, उत्सव,
गोड गुपिते,
सारंच सांगायचं असतं—-
खरंखुरं!
मुक्त चर्चाच करायची असते !
तशी प्रत्येकजण,
जपतच असते — आपली इमेज!
जगत असते एक
मस्त मुखवटा चढवून!
पण एक जलाशय हवं असतं,
ज्याच्या नितळ पाण्यात,
दिसावं स्वतःचं प्रतिबिंब,
एक बिलोरी आरसा,
हवा असतो,
स्वतःचा खरा चेहरा
दाखविणारा !
खरंच एक “हमराज”
हवा असतो,
ऐकवणारा आणि ऐकून घेणारा,
सखीच्या रूपात!
पण ऐकवणाऱ्या खूप भेटतात,
मी अशी ,मी अशी…
अहंकाराचे अनेक पापुद्रे…..
सूर्यप्रकाशा इतकं सत्यही नाकारणारे….
आपण आहोत तसे,
नवजात बालकासारखे,
स्वतःच्या सर्व खाणाखुणांसह….
नग्न सत्यासारखे…
जायचे असते सामोरे…
स्वतःतल्या स्वतःला!
आपण साऱ्याजणीच शोधात
असतो….
युगानुयुगे अस्तित्वात असलेल्या,
त्या स्त्री प्रतिमेच्या…..
प्रियंवदेच्या….अनसूयेच्या….
सत्यप्रियेच्या…होय ना ?
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈