सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 264
☆ लावणी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी पारंपरिक, आकर्षक नृत्यप्रकार आहे, नर्तकीचे पदन्यास, हातांच्या हलचाली आणि मुद्राभिनय मोहक असतात, लावणी नृत्यात गीत आणि संगीताला फार महत्त्व आहे! पूर्वीच्या काळी लावणी, तमाशा ही उपेक्षित कला होती, पण नंतरच्या काळात तिला लोकमान्यता व लोकप्रियता मिळाली! सध्या लावणी महिला वर्गातही आवडीने पाहिली ऐकली जाते! )
☆
माझ्या पायात काटा रुतला बाभळीचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥धृ॥
*
पांदी पांदीनं चालले होते
पायी पैंजण घातले होते
नाद छुनुकछुन बाई घुंगरांचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥१॥
*
वय नुकतंच सरलंय सोळा
साऱ्या गावाचा माझ्यावर डोळा
जीव जळतोय साऱ्या पाखरांचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥२॥
*
शेळ्या घेऊन गेले शेतात
चुडा राजवर्खी हातात
किणकिण आवाज झाला कांकणाचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा॥३॥
*
माझी चाहूल त्याला गं लागली
शेरडं रानात साऱ्या पांगली
लांडगा झालाय आता त्यांच्या ओळखीचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा॥४॥
*
माझ्या बांधाला त्याचा बांध
चार एकरात केल्यात कांदं
खिसा भरलाय नोटांनी सदऱ्याचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥५॥
*
त्याच्या बाभळीशी गेले नादात
काटा कचकन रुतला पायात
काटा काढताना डोळा लवला द्वाडाचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥६॥
*
छेडाछेडीत विपरीत घडलं
अन काळीज असं धडधडलं
मी वायदा केलाय रोज भेटण्याचा
त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥७॥
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈