सुश्री प्रभा सोनवणे
साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 122
☆ सोनेरी क्षण ☆
तसे कुणालाच नको असते
आपल्या आयुष्यात कुणी विनाकारण डोकावणे!
आपण दाखवतोही एकमेकांना
आपली आयुष्ये थोडीफार उलगडून!
तरीही प्रयेकाचे असते,
स्वतःचे असे एक सुंदर विश्व!
प्रत्येकाच्या आयुष्यात,
असते अशी वेळ—-
आपण मध्यबिंदू असताना,
घड्याळाच्या काट्यासारखे
टिकटिकत असतात भोवती,
तास काटे, मिनिट काटे, सेकंद काटे!
प्रत्येकाने हे समजूनच घ्यायचे असते….
कालचे सोनेरी क्षण आपले होते,
आजचे याचे तर परवाचे त्याचे असणार आहेत !
म्हणूनच डोकावू नये उगाचच,
कुणाच्याही आयुष्यात,
आणि करू नये अट्टाहास,
दुस-यांचेही सोनेरी क्षण…सतत स्वतःच ओरबाडण्याचा!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈