सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 140
☆ आता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
आता सगळ्या कविता….
बासनात बांधून माळ्यावर टाकल्या….
किंवा अडगळीत फेकल्या…
काय फरक पडणार आहे?
कधीतरी वाटायचं आपल्याला सुचते कविता….
काहीतरी उगवतंय मेंदूत..
आणि उतरतंय कागदावर…
किती तरी वेगळे आहोत
आपण
इतरांहून !
….जे उगवतंय…ते अव्वल नसलं
तरी सुमार ही नाही…..
पण ही ओळख स्वतःची स्वतःला…!!
कुणी म्हटलं कुत्सितपणे,
एवढे कागद आणि शाई
खर्च करून काय उपयोग?
ज्ञानपीठ मिळणार आहे का ??
तर कुणी म्हटलं ….
“तुझं जगणं हीच कविता आहे.”
आणि मी लिहीत गेले कविता…
त्या सा-या अलवार क्षणांवर…..!!
आता भूतकाळाचं फुलपाखरू भुर्र्कन उडून गेलं…..
कविता म्हातारी झाली
की आऊट डेटेड माहित नाही…..
आता झाडं बोलत नाहीत….
पक्षी गात ,
माझ्या कवितेच्या प्रदेशातले ….
कविता संपली आहे माझ्यातली….की माझ्यातून ??
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
khup chan