सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 147
☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
(वृत्त-मंजुघोषा)
(गालगागा गालगागा गालगागा)
आज आला अंगणी हा धुंद श्रावण
वेड लावी साजणी हा धुंद श्रावण
पैठणीचा रंग माझ्या खास होता
भासला की बैंगणी हा धुंद श्रावण
अंग माझे चिंब भिजले पावसाने
पाहिला मी दर्पणी हा धुंद श्रावण
साजणाची याद आली चांदराती
पौर्णिमेच्या पैंजणी हा धुंद श्रावण
चालताना तोल गेला ऐनवेळी
काच पिचता काकणी हा धुंद श्रावण
नीज आली सूर्य येता तावदानी
घेत आहे चाचणी हा धुंद श्रावण
रात्रभर मी जागले त्याच्याच साठी
आज झाला पापणी हा धुंद श्रावण
या विजेने बांधले की चाळ पायी
गात आहे लावणी हा धुंद श्रावण
का “प्रभा” नाराज तू आहेस येथे
करतसे वाखाणणी हा धुंद श्रावण
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद हेमंत सर आणि संपादक मंडठ