सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 149
☆ कैफियत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
कधी वाटते करावीच का वणवण नुसती
अखेरीस जर होतो आपण अडचण नुसती
तरूण असते तेव्हा असते सोशिक,साधी
पण पैशाची भासे तेव्हा चणचण नुसती
खस्ता खाते,पोरासाठी,घर सांभाळी
जळत रहाते ,असते ती ही सरपण नुसती
सुखात आहे म्हणायची ती ज्याला त्याला
अनवाणी ती,पायाखाली रणरण नुसती
उडून गेले पिल्लू आता घरट्या मधले
वाट पाहते डोळ्यामधली झणझण नुसती
खात्या मध्ये पैसाअडका पडून आहे
परी एकाकी मरते आहे कणकण नुसती
म्हातारीला काय पाहिजे कळले नाही
रात्रंदिन ती करत राहिली फणफण नुसती
© प्रभा सोनवणे
७ सप्टेंबर २०२२
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद सर🙏