सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 151
☆ दोन अश्रू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
पहाटे मोबाईल वाजला…..
“अरूणा मुखर्जी”
नाव वाचलं….
आणि काळजात धस्स !
नव्वदी ओलांडलेल्या ,
मावशींचं काही बरंवाईट??
क्वचितच कधीतरी
फोन करणा-या
या मावसबहिणीनं –
सांगितलं,
“अगं दादा चा अॅक्सिडेंट झाला”
पुन्हा..
कधी??
इतकं च बोलले मी….
पुढचं वाक्य होतं–
“आणि त्यात तो गेला…
सव्वा महिन्यापूर्वी…
तुला कळवायचं राहून गेलं!”
” अं…
अहो, दोन महिन्यांपूर्वी
येऊन गेले माझ्या कडे
अचानकच !”
“हो,असं ब-याचजणांना
भेटून गेला तो-
कोण कोण सांगत होते”
” विना हेल्मेट बाईक वरून
जात असताना ,
उडवलं कोणीतरी…
डोक्याला मार लागला. “
……
मला दादांची शेवटची भेट
आठवत राहिली……
एका मोठ्या अपघातातून
बरे होऊन ते
माझ्या घरी आले होते!
“मी आता
व्यवस्थित बरा झालो,
वाॅकर, काठी शिवाय
चालू शकतो!
जिना ही चढू शकतो!”
जिना चढून, उत्साहाने पाहिली त्यांनी,
टेरेस वरची बाग !
खाद्यपदार्थांची
आणि चहाची तारीफ करत,
मनसोक्त गप्पा…
हास्य विनोद…
प्राध्यापक….
जवळचा नातेवाईक…
मावसभाऊ….
कोण गेलं??
वयाच्या शहात्तराव्या वर्षी
विना हेल्मेट बाईक वरून
जाताना अपघाती मृत्यू…..
इतकीच नोंद,
संपलं एक अस्तित्व!
नाती दूर जातात..
नाहीशी होतात…
“सारे घडीचे प्रवासी!”
हीच तर जगरहाटी!
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हृदयस्पर्शी एवं मार्मिक रचना
धन्यवाद भाईसाब 🙏