सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️

रात्री अकराच्या बसने टोकियोला जायचे होते. आमचा जपान रेल्वे पास या बससाठी चालत होता. तीस जणांची झोपायची सोय असलेली डबल डेकर मोठी बस होती. बसण्याच्या जागेचे आरामदायी झोपण्याच्या जागेत रूपांतर केले आणि छान झोपून गेलो. पहाटे साडेपाच-सहाला जाग आली. सहज बाहेर पाहिले. अरे व्वा! बसमधून दूरवर फुजियामा पर्वत दिसत होता. निळसर राखाडी रंगाच्या त्या भव्य पर्वताच्या माथ्यावर बर्फाचा मुकुट चकाकत होता. सारे खूश झाले. ट्रॅफिक जॅममुळे टोक्यो स्टेशनला पोहोचायला नऊ वाजले. स्टेशनवरच सारे आवरले. आज आम्ही फुजियामाला जाणार होतो व उद्याची टोक्यो दर्शनची तिकीटं काढली होती. आजची रात्र आम्ही टोक्योचे एक उपनगर असलेल्या कावासकी इथे सीमा आणि संदीप लेले यांच्याकडे राहणार होतो. त्यामुळे जवळ थोडे सामान होते.

फुजियामाला जाताना हे सामान नाचवायला नको म्हणून आम्ही ते टोक्यो स्टेशनवरील लॉकरमध्ये ठेवायचे ठरविले. जपानमध्ये सर्व रेल्वे स्टेशन्सवर लॉकर्सची व्यवस्था आहे. आपल्या सामानाच्या साइजप्रमाणे लॉकर निवडून त्यात सामान ठेवायचे. किती तासांचे किती भाडे हे त्यावर लिहिलेले असते. सामान ठेवून लॉकरला असलेली किल्ली लावून ती किल्ली आपल्याजवळच ठेवायची. मात्र सामान परत घेताना योग्य ते भाडे त्या लॉकरला असलेल्या होलमधून टाकल्याशिवाय लॉकर उघडत नाही. तिथल्या एका लॉकरमध्ये सामान ठेवून आम्ही फुजियामाला जाण्यासाठी निघालो. तीन-चार गाड्या बदलून, अनेकांना विचारत शेवटी माथेरानसारख्या छोट्या गाडीने कावागुचिकोला पोहोचलो.फुजियामा  इथे असलेल्या पाच लेक्सपैकी हा एक लेक आहे. तिथून फुजियामाचे सुंदर दर्शन होत होते. हळूहळू थंडी, बोचरे वारे वाढू लागले. तेव्हा परतीचा तसाच प्रवास करून टोक्यो स्टेशनवर आलो.

जगातले सर्वात वर्दळीचे स्टेशन म्हणून टोक्यो ओळखले जाते. जमिनीखाली आणि जमिनीवर  पाच-सहा मजले अवाढव्य रेल्वे स्टेशन्सचे जाळे पसरले आहे. दररोज लक्षावधी लोक या स्टेशन मधून जा- ये करत असतात. त्या प्रचंड वाहत्या गर्दीत आम्ही हरवल्यासारखे झालो. आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर उतरलो तिथून सकाळी आम्ही ज्या दिशेच्या गेटजवळ सामान ठेवले होते, तो लॉकर काही सापडेना. त्यात भाषेची मोठीच पंचाईत. सगळेजण त्या गर्दीत लॉकर शोधत बसायला नको म्हणून आम्ही तिघे- चौघे एका ठिकाणी बसून राहिलो. लॉकर शोधायला गेलेल्या दोघा जणांना लॉकर सापडून परत आम्ही सर्व एकमेकांना सापडण्यात चांगले दोन तास गेले.

ट्रीपचा शेवटचा दिवस टोक्योदर्शनचा होता. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडतच होता .आयफेलटॉवरसारख्या असणाऱ्या टोक्यो टॉवरवरून शहराचे दर्शन घडले. जपानचा पारंपारिक चहा समारंभ पाहिला. तो हिरव्या रंगाचा, भातुकलीच्या कपांमधून दिलेला कोमट चहा आपल्याला आवडत नाही पण सुंदर किमोनोमधल्या त्या बाहुल्यांसारख्या स्त्रिया, चहा बनविण्याचे हळुवार सोपस्कार वगैरे पाहायला गंमत वाटत होती. नंतर एम्परर गार्डनमध्ये थोडे फिरून जेवायला गेलो. एका मोठ्या हॉटेलात सर्वांसाठी बार्बेक्यू पद्धतीचे जेवण होते. टेबलावर प्रत्येकाजवळ छोटीशी शेगडी ठेवलेली होती. त्यावर कांदा, बटाटा, वांगी, रताळे, मशरूम, लाल भोपळा, लाल मिरची असे सारे गरम गरम भाजून दिलेले होते. जोडीला भात, हिरवा चहा, रताळ्याचा गोड पदार्थ असे आमचे शाकाहारी जेवण होते. परंतु काड्यांनी जेवायची कसरत काही जमली नाही. मग काटे- चमचेच वापरले. त्या दिवशी त्या हॉटेलात बरीच लग्नं होती. ती पाहायला मिळाली. लग्नाच्या वऱ्हाडात उंची किमोनो घालून जपानी गजगामिनी मिरवत होत्या.

आता पाऊस थांबला होता. सुमिडा नदीतून क्रूझने सहल करायची होती. बसमधून तिथे जाताना टोक्योचा आपल्या फोर्टसारखा विभाग दिसला. तेरा ब्रिजच्या खालून आमची क्रूज गेली. ब्रिजवरून कुठे रेल्वे तर कुठे रस्ते होते. इकडून तिकडे सतत वाहतूक चालू होती. बोटीतून उतरल्यावर दोन्ही बाजूंच्या खरेदीच्या दुकानांवर एक नजर टाकून नंतर पॅगोडा पाहिला. टोक्योदर्शनच्या बसमधून उतरण्यापूर्वी गाइडला “आरीगाटो गोसाईमास” म्हटले. म्हणजे जपानी भाषेत त्याचे आभार मानले.

जपानी लोक हे अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि शांत वृत्तीचे आहेत. आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा याचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. हा देश सतत भूकंपाच्या छायेत वावरत असला तरी कुठेही भीतीचा लवलेश नसतो. सर्व नवीन बांधकामे भूकंपाला तोंड देण्यास योग्य अशीच बांधलेली आहेत. नियमाप्रमाणे प्रत्येक घरामध्ये दरवाज्याजवळ पिण्याच्या पाण्याच्या दोन बाटल्या, बॅटरी, मेणबत्त्या, काड्यापेटी, एका वेळचे घरातील सर्वांचे कपडे व थोडी बिस्किट्स, चॉकलेट्स अशी जय्यत तयारी एका बॅगमध्ये करून ठेवलेली असते. जपानमधील राहणीमान खूपच खर्चिक आहे. इथे सगळीकडे झाडे, फुले आहेत पण सारी झाडे, फुले अगदी सैनिकी शिस्तीत वाढल्याप्रमाणे आहेत. नैसर्गिकरित्या वाढलेले, फळाफुलांनी डवरलेले असे एकही झाड आढळत नाही. जपानी लोक ठरवतील तसेच झाडांनी वाढायचे, फुलांनी फुलायचे, बोन्सायरुपाने  दिवाणखाने सजवायचे! तरुण पिढीवर अमेरिकन जीवनशैलीचा फार मोठा प्रभाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचं वेड व प्रचंड महागाई यामुळे लग्न, मुलंबाळं, एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कमी होत आहे. जपानमध्ये अतिवृद्धांची संख्या वाढते आहे तर लहान मुलांची संख्या कमी होत आहे. कोणी सांगावे, उद्या जपानी शास्त्रज्ञ यावरही काही उपाय शोधून काढतील.

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पहाटेच्या थोड्याशा पावसाळी धुक्यातून उगवत्या सूर्यदेवाचे लांबलचक किरणांचे हात आम्हाला निरोप देत होते. डोळ्यांपुढे दिसत होते–

  प्रशांत महासागराच्या हिंदोळ्यावर झुलणारे,

  पाचूच्या कंठ्यामधल्या रत्नासारखे शोभणारे,

   आकाराने लहान, कर्तृत्वाने महान,

   फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभे राहिलेले,

   अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गरुडझेपेने,

   आकाशाला कवेत घेणारे,

    एक स्वच्छ, सुंदर ,शालीन राष्ट्र, जपान!

भाग ३ व जपान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments