डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – ८ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

आपल्या प्रतिसादाने मला खरंच खूप काही दिलंय! मित्रांनो, आम्ही जे थोडके मेघालय बघितले त्याची महती मागील सात भागात गायली, मात्र आमचा प्रवास ११ दिवसांचा होता, त्यामुळे आम्ही परत मेघालय बघणार हे निश्चित आहेच! हा मेघालायच्या नयनरम्य आठवणी जपत लिहिलेला आठवा आणि पुढील भाग मी खास करून षोडश वर्षीय, नवयौवनेसम तारुण्याने सळसळत्या अशा शिलॉन्ग या मेघालयच्या राजधानी करता राखून ठेवले होते. आम्ही मुंबई ते आसामची राजधानी गुवाहाटी येथील प्रवास विमानाने केला. उज्ज्वलने (माझा जावई) मेघालयच्या संपूर्ण प्रवासासाठी कॅब बुक केली होती. विमानतळावर आसामचा एका ड्रायव्हर अजय आमच्या स्वागताला हजर होता. त्याच्या सोबत आम्ही नंतरचे १० दिवस अतिशय आनंदाने प्रवास केला. कधी धो धो पावसाचे आक्रमण, कधी धुक्याची रजई, कधी अरुंद गल्ल्या, कधी वेडीवाकडी घाटाची वळणे, तर कधी आमची दिरंगाई, हे सर्व अत्यंत धीराने सहन करत अजय अविरत गाडी चालवत होता, वाहतुकीचे सर्व नियम कडकपणे पाळीत! आमच्याशी प्रेमाने संवाद साधत कुठे काय बघण्यासाखे आहे, या बाबत तो सूचना आणि मार्गदर्शन देखील करीत होता. मला तर तो कुठलेही प्रेक्षणीय स्थळ आले की “नानी आप ये कर सकता है/ नहीं कर सकता” अशी प्रेमळ ताकीदच द्यायचा. संपूर्ण प्रवासात आम्ही नादमधुर अशी गाणी (बंगाली आणि आसामी) ऐकत गेलो. त्यातीलच एक गाणे होते भूपेन हजारिका यांचे अत्यंत गोड आणि श्रवणीय असे “ओ गंगा”! आम्हा सर्वांना आवडलेल्या या गाण्याची ध्वनिफीत शेवटी दिलेली आहे. आम्ही गुवाहाटी ते शिलॉन्गला जाता जाता भूपेन हजारिका यांचे सुंदर स्मारक बघितले. 

 शिलॉन्ग ही भारताच्या मेघालय राज्याची राजधानी आणि तेथील सर्वात मोठे शहर आहे. याशिवाय शिलॉन्ग पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १९६९ पर्यंत हे शहर संयुक्त आसाम प्रांताची राजधानी होते. १९७२ साली मेघालय हे स्वतंत्र राज्य म्हणून प्रस्थापित झाल्यावर हेच शहर मेघालयच्या राजधानीचे शहर बनले व आसामची राजधानी गुवाहाटीमधील एक उपनगर दिसपूर येथे हलवण्यात आली. आज शिलॉन्ग मेघालयची आर्थिक, सांस्कृतिक व वाणिज्य राजधानी आहे. २०२४ मध्ये या शहराची लोकसंख्या आहे सुमारे ५०८०००. हीच लोकसंख्या २०११ साली सुमारे १४३००० इतकी होती. येथील सुमारे ४७ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय तर ४२ टक्के लोक हिंदू आहेत. इंग्लिश ही येथील अधिकृत भाषा असून खासी, जैंतिया व गारो ह्या स्थानिक भाषांना राजकीय दर्जा देण्यात आला आहे. खासी व जैंतिया हिल्स हा भूभाग पारंपारिक काळापासून चेरापुंजी येथे राजधानी असलेल्या खासी जमातीच्या अखत्यारीखाली होता, परंतु सिल्हेट ते आसाम दरम्यान रस्ता बांधण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला येथील जमिनीची आवश्यकता भासू लागली. ह्यावरून झालेल्या युद्धात ब्रिटिशांची सरशी झाली व १८३३ साली हा भूभाग ब्रिटिशांनी जिंकला. परंतु चेरापुंजी हे ठिकाण सोयीचे नसल्यामुळे ब्रिटिशांनी १८६० च्या दशकात शिलॉन्ग शहराची स्थापना केली. १८७४ मध्ये ब्रिटिश राजवटीने नवनिर्वाचित आसाम प्रांताची स्थापना केली व शिलॉन्ग आसामची राजधानीचे शहर बनले.

या भागाला निसर्गाचा बहुमोल वारसा लाभलेला आहे. येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे ब्रिटीशांना हे शहर पूर्वेकडील स्कॉटलँडसारखे निसर्गसंपन्न आणि सुंदर वाटायचे. मात्र एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून देखील येथे रस्ते व रेल्वेमार्गांचा विकास होऊ शकला नाही, म्हणून शिलॉन्गची प्रगती संथ गतीने होत राहिली. १८ व्या शतकामध्ये येथे आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला व मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. ब्रिटीश वसाहतवादाचा वारसा सांगणारी घरांची रचना, हॉटेल व कॅफे मध्ये वाजवले जाणारे संगीत ही या शहराची वेगळी वैशिष्टये आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ठायी ठायी निसर्गाची लयलूट असलेला अत्यंत संपन्न असा हा प्रदूषणमुक्त प्रदेश आहे. शिलॉन्ग हे डोंगर उतारावर वसलेले आहे. येथील शिलॉन्ग व्यू पॉइंट वरून आपण संपूर्ण शिलॉन्ग शहर पाहू शकतो. आकाशात पसरलेले प्रचंड धुके आणि त्या धुक्यात हरवलेले शिलॉन्ग हे शहर वेगळीच अनुभूती देऊन जाते. (आम्ही हा पॉईंट बघू शकलो नाही कारण तेव्हां तो बंद करण्यात आला होता) 

शिलॉन्ग विमानतळ शहराच्या ३० किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. येथून दिल्ली, कोलकाता तसेच ईशान्येकडील दिमापूर, गुवाहाटी, सिलचर, इम्फाल, आगरताळा इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ शिलॉन्गला गुवाहाटी तसेच इतर महत्वाच्या शहरांसोबत जोडतो. दुर्दैवाने आजही शिलॉन्ग भारतीय रेल्वेच्या नकाशावर नाही. मात्र भविष्यात गुवाहाटी ते मेघालय रेल्वेमार्ग बांधला जाईल अशी आशा आहे. आजच्या घडीला गुवाहाटी रेल्वे स्टेशन शिलॉन्ग पासून १०५ किलोमीटर दूर आहे. 

मित्रांनो, आता आपण शिल्लोन्ग येथील (अर्थातच आम्ही बघितलेली) प्रेक्षणीय स्थळे बघू या!

उमियम सरोवर (Umiam lake)

आम्ही शिलॉन्गच्या वाटेवर असतांना एक अतीव लावण्यमय, जणू काही चित्रप्रतिमेप्रमाणे निगुतीने घडवलेले असे उमियम सरोवर बघितले. मानवनिर्मित असूनही त्याचे नैसर्गिक सरोवरासारखेच भासमान होणारे सौंदर्य अगदी विनासायास सिनेमास्कोपिक अन फोटोजेनिक असे! कुठंही कॅमेरा फिक्स करा अन क्लिक करा, त्या चित्राची मोहिनी मन मोहणारच! या वेड लावणाऱ्या सरोवराला वेढलंय हिरव्यागार वनश्री अन विशाल पूर्व खासी पर्वतशृंखलांनी! शिलॉन्गच्या मध्यबिंदू पासून हे स्थळ १६ किलोमीटर अंतरावर आहे. उमियम नदीला बांध घालून हे विशाल आणि विलक्षण मानवनिर्मित आरस्पानी सरोवर बघताच आम्ही त्यावर लुब्ध झालो. स्थानिक लोक याला “बडापानी” म्हणतात. सहलीसाठी गावाबाहेर जायचंय ना, मग त्यासाठी हे ठिकाण एकदम सही! म्हणूनच इथे पर्यटकांची धो धो गर्दी असते, खास करून सुट्टीच्या दिवशी! इथला सूर्यास्त नयनाभिराम नारिंगी, गुलाबी अन लाल रंगांची उधळण करीत रंगावली रेखितच रात्रीच्या कुशीत विराम पावतो! पावसानंतरचे विहंगम इंद्रधनुषी रंग बघावे ते इथेच, कारण हे सर्व रंग या सरोवरात स्वतःचे राजस रुपडे न्याहाळत असतात!

 

आम्ही जेव्हा इथे पोचलो तेव्हा बघितले की, हिरव्याकंच पाचूंच्या माळेत नीलम गुंफला जावा तसे हिरव्यागार वनश्रीत हे सरोवर चमकत होते. आकाशाचे बदलते रंग या जलाशयाच्या जलाचे रंग देखील बदलत होते. कधी धवल, कधी नीलकांती, तर कधी मेघवर्णम शुभांगम! हरखून गेले मी या परिसरात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असेच हरवून जाल इथे! इथले नौकानयन म्हणजे या जलाच्या निळाईचे सौंदर्य जवळून पाहण्याची सुवर्णसंधी, अर्थातच हे अपरिहार्य! नौकानयन करतांना आमची नौका(मोटरबोट) इवलाल्या शंकूच्या आकाराच्या पाचूंच्या बेटांना वेढा घालीत विहार करीत होती. आमचे नशीब जोरावर होते, कारण आम्हाला नेणाऱ्या नौकेचे इंधन मधेच संपले आणि ते येईपर्यंत बोनस मिळावा तसे आम्ही भोवतालचे सृष्टी सौंदर्य न्याहाळीत बसलो. ते येऊ नये असे वाटत असतांनाच आले! या सरोवरात वॉटर स्पोर्ट्सची सुविधा देखील आहे (kayaking, boating, water cycling, scooting, canoeing इत्यादी). अर्थात यासाठी आभाळ व सरोवर शांत अन सौम्य असणे आवश्यक! आपल्याला यापैकी काहीच करायचे नसेल तर मजेत फेरफटका मारत या रम्य परिसराचं नुसतंच आनंददायी निरीक्षण करीत राहा! आपणास शक्य असल्यास या सरोवराजवळील हॉटेलमध्येच मुक्काम करा, अन निसर्ग शोभेचा मनसोक्त अनुभव घ्या.

पुढील भागात शिलॉन्गमध्ये आणि त्याच्या आसपास फेरफटका मारू या!

तोवर जरा दम धरा मंडळी! आत्तापुरते आवरते!

खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप – *लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो व्यक्तिगत आहेत

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments