प्रा. भरत खैरकर

🌸 मी प्रवासी 🌸

☆ भूनंदनवन काश्मीर – भाग – २ ☆ प्रा. भरत खैरकर 

(आमच्या नचिकेतची मात्र अजून बर्फाचा पर्वत न दिसल्याने काश्मिरात येऊन तीन दिवस झाले तरी “पप्पा काश्मीर कधी येणार?” म्हणून विचारणा होत होती.) – इथून पुढे 

मात्र तोही दिवस आला, त्या दिवशी आम्ही गुलमर्गला गेलो साधारण पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर श्रीनगर पासून गुलमर्ग आहे. गुलमर्गकडे जाताना मंत्रालय, सचिवालय, प्रावेट बस स्टॉप, हज हाऊस, इत्यादी गाईडने दाखविले. वाटेमध्ये सफरचंदाच्या बागा, अक्रोडच्या बागा भरपूर प्रमाणात होत्या. हळूहळू बस टंगमर्ग ह्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचली. अन् तिथून सुरू झाला घाट रस्ता. दोन्ही बाजूला पाईन वृक्षाची गर्दी. पुढे गेल्यावर उंच उंच देवदार!! गाईडने सांगितलं की आठशे ते चौदाशे मीटर उंचीवर पाईन वृक्ष व त्या पुढील उंचीवर देवदार असतात म्हणून!! इतक्यात बसमधील कोणीतरी ओरडलं, “अरे, नचिकेत तो बघ बर्फ!!” आणि बघतो तर काय त्या पर्वताचा अर्धाअधिक भाग बर्फाच्छादित होता. चला पैसे वसूल झाले! हेच तर पाहायला आपण एवढ्या दूर आलो म्हणून सर्वांनी आनंद व्यक्त केला. “गणपती बाप्पा मोरया” जोरात झालं. गाईड म्हणाला आपल्याला तिथेच जायचं आहे. मग तर विचारूच नका. थंडीचे कपडे घ्यायसाठी बस एका दुकानावर थांबली. सर्वांना पहिलाच अनुभव असल्याने सगळे ड्रेस पटापट निवडल्या गेले. पुन्हा बस सुरू झाली.

वाटेत सगळीकडे सीआरपीएफचे जवान सशस्त्र तैनात होते. नचिकेत त्यांना बस मधून शालूट करायचा, मग तेही हात हलवून दाद द्यायचे. तो रम्य प्रवास बस एका हॉटेलसमोर थांबल्यावर संपला. आणि जोरात पाऊस सुरु झाला. आम्ही थोड्यावेळापूर्वी भाड्याने घेतलेले कपडे चमकवले! हळूहळू ते भिजून एवढे जड झाले की पेलवता पेलवेना!! तिथून काहीजण घोड्यावरुन तर काही चालत चालत ” गंडोला राइट “कडे निघाले. पावसामुळे तिकीट विक्री बंद होती आणि रोप कार सुद्धा बंद ठेवल्या होत्या. वाटलं आजसुद्धा बर्फावर खेळायला मिळणार नाही. पणक्षणभरच!.. तिकीटविक्री परत सुरू झाली आणि फर्स्ट स्टेजला रोप कारचा प्रवास सुरू झाला. वेगळा आनंद! वेगळा अनुभव!! दहा ते पंधरा मिनिटात आम्ही उंच पर्वतावर येऊन पोहोचलो. इथून पुढे दुसरी स्टेज होती ‘खिलनमर्ग’ करीता वर जाते. तिथे धबधबा, स्केटिंग, वगैरे ची सोय आहे. बरेच जण घोड्यांनी तिथे गेले.

गुलमर्ग गाव असं नाहीच! आजूबाजूच्या खेड्यातून येणारे घोडेवाले, फेरीवाले, असणारे पर्यटक, हॉटेल व्यवसायिक, यामुळे येथे गजबजाट झाला आहे. गोल्फ ग्राउंड खूप छान आहे. एखाद्या कॅलेंडरवर शोभेल असे नयनरम्य दृश्य या ठिकाणी दिसतं ! अप्रतिम शिवाय दुसरा शब्द या ठिकाणी योग्य बसणार नाही.

पुढच्या दिवशी जायचं होतं सोनमर्गला !ग्लेशियर पॉईंटवर! तिथे भरपूर बर्फावर खेळायला मिळेल व राईड करायला मिळेल असं आम्हांला सांगितलं गेलं.. साधारणतः 102 किलोमीटरचा प्रवास सुरू झाला.. बस श्रीनगर चा प्रसिद्ध लाल चौक, फारूक अब्दुल्लाच्या वडिलांची समाधी, हजरतबल मस्जिद मार्गे निघाली. मोहम्मद पैगंबर म्हणजेच हजरत! त्यांच्या दाढीचा पवित्र केस(बाल) ह्या ठिकाणी ठेवलेला आहे, असं म्हणतात. म्हणून “हजरतबाल दर्गा! ” एकदम कडक सिक्युरिटी तुन पुढे गेल्यावर दर्गा बघितला. माझा मित्र फिरोज व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दुवा मागितली प्रवास पुढे सुरू झाला.

सिंधू नदीच्या काठावरून जाणाऱ्या रोडवर बस धावत होती. बस जशी पुढे जात होती तसतसा पाण्याचा खळाळ ऐकायला यायचा. एका ठिकाणी गाईडने बस थांबविली. ” चलायचं का पोहायला ?”म्हणून त्यानं आवाज दिला, तर सगळे “हो “म्हणाले. भराभर खाली उतरले. पाण्यात पाय टाकला तर काय ?एवढं थंड पाणी की विचारायलाच नको! अर्ध्या मिनिटाच्या वर पाण्यात पाय सोडून बसणं मुश्कील ! कारण ते पाणी नुकतंच बर्फ वितळून नदी प्रवाहात आलं होतं‌. हिमनदी म्हणतात ती हीच! सगळ्यांनी पाण्यात ‘वरवर’ खेळण्याचा आनंद घेतला… आणि प्रवास पुन्हा पुढे सुरू झाला.

वाटेत गाईडने “सफेदा ” म्हणून एक झाड दाखवील. त्याचा काय उपयोग म्हटल्यावर जुन्याकाळी हीच पाने लिखाणासाठी वापरत अशी त्याने माहिती पुरविली. हीच ती भूर्जापत्र! मेंढपाळाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावात मेंढ्यांचे भरपूर कळप आम्ही पाहिले. ” राम तेरी गंगा मैली” चे शूटिंग झालेला स्पॉट गाईडने दाखविला. पाणी व देखावा नक्की तो होता, फक्त मंदाकिनी नव्हती! 

थोडं पुढे गेल्यावर सीआरपीएफचा मोठा कॅम्प दिसला. मिलिटरीच्या गाड्यांचा ताफा.. वाटलं धन्य हे जवान… ह्या इथे एवढ्या वर पहारा देतात आपल्यासाठी !

“वेलकम टू सोनमर्ग” असा बोर्ड दिसला. आपण पोहचलो निसर्गाच्या कुशीत! ही जाणीव झाली. पाच दिवसात अमरनाथ यात्रा सुरू होणार होती. त्यामुळे सगळे घोडेवाले आपापले घोडे घेऊन ” बिल्ला” मिळवायला व परवानगी काढायला गेल्याचं कळलं. फक्त ग्लेशियर जवळच घोडे आहेत तिथवर “सुमो”ने जावं लागेल असं कळलं. गुलमर्गचा जड कपड्यांचा अनुभव असल्याने सर्वांनीच ऊनी कपडे नको म्हटलं.. जवळचेच जर्किन, स्वेटर वापरायचे ठरविले. दोन-तीन सिक्युरिटी चेक नंतर आम्ही पोहोचलो ग्लेशियरवर!! खरंच लोक का बरं वेडे होतात काश्मीरच्या सौंदर्यानं! हे इथे कळलं. ” जन्नत” म्हणतात ती हीच !! 

दोन्ही बाजूने बर्फाच्छादित हिमालय आणि आपण घोड्यावरून चालत -चालत वितळलेल्या बर्फाच्या नदीकाठाने चालणं म्हणजे स्वर्गीय आनंद! हा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही तो अनुभव प्रत्यक्ष घ्यावाच लागतो… जगावा लागतो. आम्ही तो जगलो. जन्म धन्य झाला !असं वाटलं.

पांढरा शुभ्र बर्फ बघून नचिकेतचा जोश वाढला. एवढसं पोर पण निसर्गात आल्यावर तहानभूक विसरून आम्हा सर्वांच्या पुढे निघालं.. जाताना त्याला थकायला होईल म्हणून आम्ही एक काश्मिरी, ज्याला ते “पिट्टू” म्हणतात तो भाड्याने घेतला. तो नचिकेतला बर्फा पर्यंत उचलून परत आमच्या ठिकाणापर्यंत आणून देणार होता. बर्फावर मनसोक्त खेळलो, हुंदळलो.. टणक झालेला बर्फ काठीने खणून एकमेकांच्या शर्टात, कपड्यांमध्ये टाकला. खूपसा आमच्या टोप्या मध्ये जमा करून आणला. आज खऱ्या अर्थाने आम्हांला काश्मीर घडलं होतं ! ते क्षण.. त्या आठवणी.. डोळ्यात साठवत मग परतीचा श्रीनगरचा प्रवास सुरू झाला. इथून अमरनाथ फक्त चौदा ते पंधरा किलोमीटरवर आहे. अशी माहिती मिळाली. मागच्या आठवड्यातील अमरनाथ ट्रस्टने मागितलेली जागा येथे सोनमर्गला आहे. हाच बेस कॅम्प! असं कळलं. नऊ महिने येथे बर्फ असतो. मिल्ट्री सह सारे जण खाली म्हणजे श्रीनगरकडे जातात. अशी माहिती मिळाली. एवढ्या उन्हाळ्यात इतका बर्फ म्हटल्यावर हिवाळ्यात किती बर्फ असेल !ही कल्पनाच न केलेली बरी… !

आज सहलीचा शेवटचा व महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे पहेलगाम ! बस जम्मू मार्गावर निघत असताना वाटेत केशर खरेदी, पंपोरचे केशर मळे, बॅटचा कारखाना व अवंतीपुरा हे उत्खननात मिळालेले विष्णू मंदिर बघितलं.

चिनार वृक्षाला कापण्यास किंवा फर्निचर साठी वापरण्यास काश्मिर सरकारने बंदी घातल्याच समजलं! तिथून बस काश्मिरी पंडितांनी जी गावे सोडली किंवा त्यांना सोडायला भाग पाडलं, अशा” मटणमार्तंड” या धार्मिक स्थळी आली.

भगवान शंकराच्या दर्शनानंतर प्रवास पुढे सुरू झाला. दरम्यान सीआरपीएफचे जवान लीडर नदीमध्ये राफ्टिंग करताना दिसले. झेलमच्या काठी बसलेले पहेलगाम आलंय एकदाच! 

दुपारची जेवण आटपून सुमो आणि सफारी गाड्यांनी आम्ही चंदनवाडी हा 18 किलोमीटरवर असलेला व अमरनाथ मार्गावरचा स्पॉट बघायला जायचं ठरवलं.. काय रस्ता आहे.. ! धबधबे,.. नद्या.. डोंगर… फेसाळणारे पाणी… नागमोडी वळण.. सगळ्या मधून जाणारी आमची सुमो‌. ! व्वा अप्रतिम!! 

मध्यंतरी ” बेताबवाडी” म्हणून एक गाव लागलं. “बेताब” सिनेमाचं शूटिंग येथे झाल्यापासून ह्या गावात सारंच बेताबमय आहे. हॉटेल बेताब.. गाडीवर बेताब.. घरावर बेताब.. सगळीकडे बेताब बेताब… चंदनवाडी पासून पुढे वाहनं जात नाही. तिथून पुढे अमरनाथला चालत जावं लागतं असं समजलं. तिथेही आम्ही नचिकेत साठी पिट्टू केला. बर्फावर शेवटच खेळून घ्या.. म्हणून खूप हुंदळलो.. सुंदर बर्फाचा पूल तयार झाला होता व खालून नदी वाहत होती.. भीती वाटली.. पण सगळेच लोक पूल ओलांडून खेळत होते. शिवाय आमचा पिट्टूही म्हटला “बहुत मजबूत है साब” पूल पार केला.. मनसोक्त खेळलो..

सायंकाळी चार पाचच्या दरम्यान आम्ही परतलो पहेलगामला. मार्केटमध्ये भटकलो.. थोडीबहुत खरेदी केली. बस स्टॉपच्या पुढे असलेल्या दोन नद्यांच्या संगमावर एक छोटं गार्डन आहे. तिथे आम्ही मनसोक्त खेळलो.. मी हिरवळीवर पहुडलो.. वर आकाशात बघितले.. भगवंताला तुझ्या या नंदनवनात येण्याचं भाग्य आमच्या नशिबी लिहिल्याबद्दल धन्यवाद दिले आणि तुझाही स्वर्ग कदाचित हाच असेल असा विचार करून पुनश्च डोळे मिटून घेतले….

– समाप्त –

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments