सौ. दीपा नारायण पुजारी
मी प्रवासीनी
☆ सुखद सफर अंदमानची… मड व्होल्कॅनो – भाग – ४ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
मड व्होल्कॅनो
व्होल्कॅनो अर्थातच ज्वालामुखी हा तसा परिचित शब्द. पण मड व्होल्कॅनो हा काहीसा वेगळा शब्द. आमचं कुतूहल चांगलंच चाळवलं गेलं होतं. आज अंदमानच्या मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. रामनं, (आमचा टूर लिडर) रात्री झोपताना निक्षून सांगितलं होतं की भल्या पहाटे तीन वाजता आपण हॉटेल मधून बाहेर पडणार आहोत. जो बरोबर तीन वाजता बस मध्ये नसेल त्याला न घेता बस निघेल.पावणेतीन वाजताच आम्ही सगळे हॉटेल लाऊंजमध्ये हजर होतो.
वीर सावरकरांना मानवंदना करून, बाप्पाच्या जयजयकारात प्रवास सुरू झाला. आमच्या हॉटेलपासून साधारण अडीच तास प्रवास करुन आम्ही मध्य अंदमानला आलो. इथं जलडमरु बॉर्डरवर बाराटांगला जाण्यासाठी गेट आहे. हे गेट सकाळी सहा वाजता व नऊ वाजता उघडते. दुपारी तीन वाजता ते बंद होते. बारटांगला जाणारा रस्ता जंगलाच्या अशा भागातून जातो जेथे आदिवासी लोकांचा भाग आहे. जारवा जातीच्या या आदिवासींच्या सुरक्षिततेकरता हा भाग प्रतिबंधित आहे. गेटवर आधारकार्ड (परदेशी प्रवाशांना पासपोर्ट ) दाखवावे लागते. मगच प्रवेश करता येतो.
आपण फार लवकर आपली झोप सोडून आलोय. गेटवर आपलीच बस पहिली असेल हा भ्रमाचा भोपळा तिथं पोचतात फुटला. आमच्या पुढे एकशे छत्तीस गाड्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे स्टॉल्स होते. गरमागरम मेदूवडे आणि डाळवडे तयार होते. पट्टीचे खाणारे मात्र हवेत.
आदिवासी पाड्यातील जारवा लोक रस्त्यात दिसण्याची शक्यता होती. ते लुटारू आहेत असं ऐकलं होतं. या रस्त्यावर बसच्या वेगाला मर्यादा आहे. कारण क्वचित एखादा प्राणी रस्त्यावर आलेला असू शकतो. जारवांना बघून उत्साहित होऊन काही करायचं नाही. हात हलवायचा नाही. थांबायचं नाही. फोटो काढायचा नाही. त्यांना काही खाऊ द्यायचा नाही. अशा सूचनांचे फलक रस्त्यावर लावलेले आहेत. आम्हाला कोणताच वाईट अनुभव आला नाही. परतीच्या प्रवासात आम्हाला जारवांचे बच्चू दिसले. एक दोन नाही तर सहा बच्चू. काळीकुळकुळीत, उघडबंब, कोरीव शिल्पासमान ती सहा कोकरं रस्त्याच्या कडेला ओळीनं उभी होती. हसरे चेहरे, काळेभोर टप्पोरे डोळे बसकडे मोठ्या आशेनं बघतायत का?
खूप कडक सूचना दिल्या गेल्या होत्या. आम्ही सर्वांनी त्या पाळल्या.
जारवा ही आदिवासी भागात राहणारी जमात. दक्षिण आणि मध्य अंदमानच्या पश्चिम किनारपट्टीवरील जंगलात यांची वस्ती आहे. बांबू, नारळाच्या झावळ्या, काठ्या यापासून घरं बांधून राहतात. घर नव्हे खरंतर झोपडीवजा आडोसा म्हणावा. हे निसर्गाशी एकरूप होऊन गेले आहेत. निसर्गाचे नियम त्यांना मान्य आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात. त्सुनामी मध्ये हे लोक मृत्युमुखी पडले नाहीत. या संकटाची कल्पना त्यांना आधीच आली असावी. फळं कंदमुळं मासे हे त्याचं प्रमुख अन्न. न शिजवता कोणतीही प्रक्रिया न करता हे लोक अन्न खातात. मीठ मसाला तेल यांचा वापर न करता आपण ज्याला ब्लाण्ड म्हणतो तसं अन्न ते घेतात. आपल्या जगातील आधुनिक तंत्रज्ञानापासून कोसो दूर आहेत हे लोक. त्यांना त्याची काही गरजही नाही. पण भारत सरकार त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलिकडेच एकोणीस जारवांना त्यांचे ओळख पत्र दिले गेले आहे.
जेटीवर पोचतात आम्ही बसमधून उतरलो आणि एका मोठ्या क्रूझ मध्ये चढलो. आमची बस आणि काही गाडय़ा या क्रूझमध्ये चढवल्या गेल्या. चारशे पाचशे माणसं बसू शकतील अशी क्रूझ अर्धा पाऊण तास प्रवास करुन बारतांग बेटाला लागली. तिथून पुढे आम्ही छोट्या छोट्या जीपनं बॅरन बेटावर गेलो. जाताना वाटेत आदिवासी आणि त्यांची वस्ती दिसत होती. आता साधारण पंधरावीस मिनिटांचा ट्रेक होता. टेकडीवजा रस्त्यानं चढ चढून आम्ही माथ्यावर पोचलो. आजूबाजूला चढताना थोडी झाडी होती. पण दाट जंगल नव्हते. माथ्यावर पोहोचल्यावर मात्र स्तंभित झालो आम्ही. कारण समोर ठिकठिकाणी चिखलाचे ज्वालामुखी दिसत होते. हे ज्वालामुखी सक्रिय नव्हते. तरी त्यातून हळुहळू बुडबुडे येताना दिसत होते. काही लहान काही मोठे. चिखलाचे लहान मोठे डोंगर किंवा ढीग म्हणावेत . आणि प्रत्येक डोंगराच्या टोकावरून हलकेच येणारे बुडबुडे. निसर्गातला हा चमत्कार बघताना मन थक्क होतं. निसर्ग पोटात काही ठेवून घेत नाही. काही सजीवांचे निर्जीव घटकांचे पृथ्वीच्या पोटात खोल कुठेतरी विघटन होत आहे. त्या विघटनात उत्सर्जित होणारे काही वायू बाहेर पडताना स्वतःबरोबरच तिथला थंड झालेला चिखलाचा ज्वालामुखी घेऊन बाहेर पडतात. विश्वंभरानं किती विचार करून हा खेळ मांडला आहे. किती जटील आणि गुंतागुंतीची रचना केली आहे. आणि ती जटीलता सोपी करण्याचे मार्ग देखील तयार केले आहेत. गुंतागुंतीची कोडी तितक्याच हलक्या हातानं नाजूक बोटांनी कुशलतेने सोडवली आहेत. म्हणूनच तर आपण सुरक्षित आनंदी जीवन जगत आहोत. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची…
– क्रमशः भाग चौथा
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈