सौ. दीपा नारायण पुजारी
मी प्रवासीनी
☆ सुखद सफर अंदमानची… द्वीपसखी – भाग – ५ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
आपल्या आजूबाजूला आपण काही निसर्गप्रेमी बघतो. हे लोक तसे आपल्या सारखे व्यस्त असतात. तरीही त्यांच्या व्यस्ततेतून सवड काढून ते झाडांची, पशुपक्ष्यांची काळजी घेताना दिसतात. अगदी स्वतःच्या जीवावर उदार होऊन हे काम ते करत असतात. खिशाला खार लावून निसर्ग संवर्धन करताना आढळतात. यातील काहींना तर त्यांची भाषाही कळते असं वाटतं. आपण त्यांचं हे सौहार्द बघून स्तिमित होतो. माझ्यासाठी म्हणाल तर हे निसर्गमित्र वंदनीय आहेत.
एका कुत्र्याच्या किंवा मांजराच्या विषयी माया वाटणं हे तसं थोडंसं सोपं आहे. परंतु एखाद्या अधिवासात राहणाऱ्या सर्वच प्राणीमात्रांविषयी, तिथल्या वनस्पतींविषयी, प्रेम वाटणं थक्कं करणारं आहे, हो ना? मला अशी एक व्यक्ती माहिती आहे, जिला शेकडो प्राणी ओळखतात. जिला त्यांची भाषाही कळते. आपण जशी रोज संध्याकाळी घरी परतणाऱ्या आपल्या आप्तेष्टांची वाट पाहतो ना, अगदी तशीच वाट हे सगळे या ताईची पाहतात. अगदी आतुरतेनं. तिची चाहूल लागताच हरणांचे कळपच्या कळप तिच्या भोवती जमा होतात. सुंदर पिवळ्या सोनेरी रंगाचे, ठिपक्या ठिपक्यांची वस्त्रं चमचम करत तिच्या भोवती जमा होतात. थुईथुई करणाऱ्या मोरांची नाचरी चाल तिच्याकडं धाव घेते. सोनेरी रंगांमध्ये निळ्या मोरपिशी रंगांचे थवे डोलत उभे राहतात. निळे हिरवे पिसारे, वेड लावेल अशी गर्द निळ्या रंगाच्या ऐटदार मानेला अधिकच तोऱ्यात उभी करत ते शेकडो मोरोपंत दाटीवाटी करतात. मागं दिसणारा समुद्र अधिक निळाशार की समोरचा मोहक मयुरसंच अधिक निळा? आकाशाचा निळा रंग बघू, सागराची निळी गहराई शोधू कि या मयुरपंखांची निळीहिरवी जादू डोळ्यात साठवू. त्यातच तो निळाई छेदून आरपार जाणारा पिवळा सोनेरी रंग घायाळ करता होतो. तितक्यात एक इटुकली, धिटुकली खारुताई तिच्या खिशातून बाहेर येते आणि घाईघाईने, तुरुतुरु कुठंतरी जाते.
मी अचंबित होऊन बघत होते. जेमतेम साडेचार पाच फुटांची ती ताई, या सगळ्यांची जणू आई होती. आईच म्हणायला हवं. ही आहे एक आदिवासी महिला, अनुराधा, अनुराधा ताई, दिदी, माई कोणतीही हाक मारा. रॉस आयलंड, म्हणजेच सध्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर तुम्ही गेलात तर हे दृश्य तुम्हाला नक्की दिसेल. त्सुनामी नंतर हे बेट विराण खंडहर झालंय. पूर्वी इथं सेल्युलर जेल मध्ये काम करणारे इंग्रज अधिकारी रहात होते. त्यांचे बंगले होते. आता फक्त अवशेष दिसतात. तो सगळा इतिहास अम्मा सांगतातच, पण या सगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या गोष्टी त्या सांगतात. वादळानंतर या बेटावर फक्त तीन प्राणी उरले होते. आता त्यांची संख्या हजारोत आहे. या प्राण्यांना त्यांच्याच अधिवासात तिनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीत आणलंय. प्रसंगी वेडी अनुराधा हा शिक्का मारुन घेऊन. कधी वेडीला मारलेले दगड झेलून, तिनं या विराण खंडहर झालेल्या मातीत पुन्हा नंदनवन उभं केलं आहे. तिनं तिचे आईवडील, भावंड या सर्वांना गमावलंय. पण मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची वडिलांनी दिलेली शिकवण ती विसरली नाहीय. इथल्या आदिवासी जमातीची अनुराधा या निसर्गावर भरभरून प्रेम करते. या मातीचं क्षण फेडण्यासाठी अविरत धडपडते. आज तिची दखल भारतीय नौदलानं घेतली आहे. तिला मानाचा किताब दिला आहे. पण पुरस्कार मिळाला तरी तिचं काम सुरू आहे.
अम्माला या सजीवांचं बोलणं समजतं, त्यांच्या डोळ्यातले भाव ओळखता येतात. तिच्याशी बोलायला सगळे प्राणी उत्सुक असतात. एक आंधळं हरीण तिच्या सगळ्या आज्ञा पाळतं. (अर्थात बाकीचे सगळे तिला देवासमान मानतात हे तर आहेच.) ताई सांगत होती, ती आमच्याशी बोलतेय हे त्या हरणाला आवडलं नाहीय. म्हणून ते रुसून बसलंय. बघा बघा, ते चाललंय निघून. तिनं त्याला सांगितलं की बघ बरं आपल्या कडं पाहुणे आले आहेत. त्यांच्याशी बोलते. मग भेटते तुला. त्याला पटलं असावं. लांब जाऊ लागलेलं ते थांबलं. बेटावरचे सर्व रहिवासी, (माणसं तिथं रहात नाहीत आता) तिला मनातलं सांगतात, तिला आपल्या भावविश्वात घेऊन जातात. त्यांना तिची भाषा समजते यापेक्षा, तिला त्यांची, त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या मनात काय आहे हे कळतं. केवढं मोठं वरदान लाभलंय तिला. आपल्याशी बोलता बोलता ती स्वातंत्र्याच्या इतिहासाची पानं उलटते. आपल्याला स्वातंत्र्यवीरांच्या कथा सांगते, अंदमानच्या तुरुंगाविषयी त्वेषानं बोलते. तिच्या अंगात जणू वीरश्री संचारते. सावरकरांच्या विषयी तिला वाटणारा आदर तिच्या शब्दांत, तिच्या डोळ्यात, सहज दिसतो. सावरकरांच्या बाबतीतल्या काही गोष्टी ज्या सहजतेनं वाचायला मिळणार नाहीत, अशा कथा ऐकायला, आपल्या देशाविषयी, आपल्या वीर सैनिकांना खरीखुरी आदरांजली द्यायला, नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपाला भेट द्यायलाच हवी. जाज्वल्य अभिमान कसा असतो हे अम्माच सांगू शकते. बाकी कुणी नाही.
मोबाईल संस्कृती, मोबाईल पर्वात वावरणारे आपण. आपली छटाकभर बुद्धी चंगळवादी राहणीमानाला दान करून टाकणारे आपण, तिच्या समोर खूप खुजे ठरतो. कृत्रिम जगात वावरताना आपण संवाद विसरलोय. आपल्या आईवडिलांशी, घरातल्या लोकांशी, आपण बोलायला कचरतो. शेजारपाजाऱ्यांशी तर आपण ओळख ठेवायला तयार नसतो. त्यांची नावंच काय पण चेहरे ही माहित नसतात आपल्याला. मग भावबंध कुठले? पण ही ताई लौकिक दृष्ट्या एकटी असून एकटी नाही. एकटेपणा तिच्या वाऱ्याला उभा रहातच नाही. तिला अगणित नाती आहेत. अस़ंख्य भावबंधांनी ती निसर्गाशी जोडली गेलीय. तिचा तसा साधाच पण आनंदी चेहरा मनात घर करून राहतो. अम्माचं साधंसुधं मोठेपण सोबत बांधून घेण्याचा प्रयत्न करत आपण परतीचा प्रवास सुरु करतो.
– क्रमशः भाग पाचवा
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈