सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १३ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ लक्षद्वीपचा रंगोत्सव – भाग १ ✈️

अथांग अरबी सागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डुलत होती. आता आमच्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडाना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता.( लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच)

लक्षद्वीप द्वीपसमूह  हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला छत्तीस बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळमधील कोची (कोचिन /एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.

समुद्रावरील ताजा, मोकळा वारा भरभरून घेत मिनीकॉयवर उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट,  लक्षद्वीप द्वीपसमूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. (आकाराने पहिला क्रमांक ऍड्रॉथ या बेटाचा लागतो.) नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५  साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून गेल्यावर  अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं.  तिथून रिसॉर्टला पोहोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबर्‍याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालत होता. सेफ्टी जॅकेट्स चढवून डुंबण्यासाठी सज्ज झालो. (समुद्रातील पोहणं, कयाकिंग, स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट व पायात रबरी बूट, चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्समुळे जखम होण्याची शक्यता असते.) समुद्रावर अनेक प्रशिक्षित ट्रेनर्स आपल्या मदतीसाठी सज्ज असतात.

किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला. पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन फतकल मारुन बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. आजूबाजूला हात घातला की तरतऱ्हेचे कोरल्स हातात येत .काहींचा आकार झाडांचा तर कांहींचा आकार फुलांचा, पानांचा, पक्ष्यांचा. कुणाला गणपती सुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या  कोरल्सची संपत्ती ‘समुद्रार्पणमस्तु’ म्हणून समुद्रालाच परत केली.(कुठच्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून आणणं हा दंडनीय अपराध आहे.)

मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट, हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव खूप वेगळा होता. आकाशाच्या घुमटातून  परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात उतरत होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगत शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. मदतनिसाने परतण्यासाठी कयाक वळविली तेव्हा भानावर आले.

मिनीकॉयपासून  १०० किलोमीटर्सवर मालदीव बेट आहे. अर्थातच मालदीवला जाण्याची सोय किंवा परवानगी नाही. जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. ११००० लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी छोटी ११ गावे आहेत.मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा ठेवलेली असते. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे.चहा, समोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या.दर डिसेंबरमध्ये तिथे नॅशनल मिनिकॉय फेस्ट साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हव़त असतात. या बेटावर ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. इतर साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम् असली तरी या बेटावर ‘महल'(Mahl) नावाची भाषा बोलली जाते.

भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments