सौ. पुष्पा चिंतामण जोशी
✈️ मी प्रवासीनी ✈️
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १४ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️भूतान – सौंदर्याची सुरेल तान – भाग ३ ✈️
एअरपोर्ट व्ह्यू पॉइंटवरून आमच्या गाड्या वळणावळणाच्या सुरेख गुळगुळीत रस्त्यावरून चेले-ला पास या १३ हजार फूट उंचीवरील खिंडीकडे निघाल्या. या ठिकाणाहून पूर्व हिमालयीन पर्वतरांगा व भूतानमधील झोमोलहरी हे नंबर दोनचे उंच शिखर यांचे दर्शन घ्यायचे होते.रस्त्यापलीकडील सफरचंदाच्या बागा पांढऱ्या स्वच्छ फुलांनी बहरलेल्या होत्या. देवदार, पाईन, स्प्रुस ,फर,ओक अशी घनदाट वृक्षराजी होती.होडोडेंड्रान वृक्षांवर गडद लाल, पिवळी, पांढरी फुले फुलली होती. भूतानचे वैशिष्ट्य असलेल्या रंगीबेरंगी आणि पांढऱ्या पताका इतक्या उंचीवरही लहरत होत्या. रानटी गुलाबाची रक्तवर्णी फुले झुपक्यांनी होती. जमिनीसरशी व्हायोलेट, पिवळे, पांढरे जांभळे फुलांचे ताटवे माना उंचावून बघत होते. खालच्या दरीत पोपटी- हिरवी भातशेती डोलत होती. अकस्मात दोन्ही बाजूंना बर्फाचा सडा पडलेला दिसला. आम्ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तिथे गेलो होतो. ड्रायव्हर म्हणाला,’ हा कालच्या पावसाचा परिणाम! खरं म्हणजे इथे ऑगस्ट सप्टेंबर पासून डिसेंबर जानेवारीपर्यंत बर्फ पडते. त्यावेळी हा रस्ता बंदच असतो.’
आम्ही जसजसे उंचावर जात होतो तसतसे बर्फाचे प्रमाण वाढत गेले. दुतर्फा झाडांच्या फांद्या, रस्त्याकडेचे उंची दर्शविणारे खुणेचे बांध सारे बर्फाने माखुन गेले. इतका ताजा, शुभ्र हलका बर्फ पहिल्यांदाच पाहिला. काश्मीर, स्वित्झर्लंड, अमेरिका सगळीकडला अनुभव जमेस होता. पण ही पांढऱ्या पिसांसारखी बर्फवृष्टी न्यारीच होती. दोन्ही बाजूच्या हिरव्या वृक्षांच्या फांद्यांचे हात गोऱ्या- गोऱ्या बर्फाने झाकले जात होते. जणू पांढरे फ्रीलचे फ्रॉक घालून हिमपऱ्या अवतरल्या होत्या. त्यांच्या टोप्यांवर लाल- गुलाबी, निळे- जांभळे फुलांचे तुरे होते. आणि पायात रंगीबेरंगी फुलांचे बूट होते. फांद्यांच्या हातांवरून ओघळणारी बर्फफुले आम्हाला दोन्ही हातांनी बोलावीत होती. त्यांचे आमंत्रण सहर्ष स्वीकारून बर्फात खेळायला उतरलो. इतके हलके, स्वच्छ पांढरे बर्फ होते की त्यावर रंगीत सरबत न घालताच बर्फाचा छोटा गोळा तोंडात सरकवला.१३००० फुटांवरील चेलेला पास पर्यंत पोहोचलो पण दरीतून वर येणारे धुक्याचे पांढरे ढग आणि बर्फवृष्टी यामुळे समोरील पर्वतरांगा अस्पष्ट झाल्या होत्या. एकमेकांवर बर्फ उडविण्यात, बर्फाशी खेळण्यात वेळेचे भान राहिले नव्हते पण ड्रायव्हर्सनी परतण्याची सूचना केली .त्यांची सूचना किती योग्य होती ते परतीच्या वाटेवर लक्षात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे बर्फ भराभर वाढत चालले होते. येताना दिसलेले उतरत्या छपराचे घर अर्धेअधिक बर्फात बुडाले होते. बर्फाच्या रांगोळीमुळे रस्ता झाकून गेला होता. थोड्यावेळाने बर्फ कडक होऊन गाडीचे टायर फसण्याची शक्यता होती. पण अगदी ‘जी भरके जीवनभरका बर्फीला माहोल लूट लिया.’
आनंदाने ओंजळी भरून गेल्या होत्या. सकाळी निसर्ग आणि मानव यांच्यातील चित्तथरारक जुगलबंदी अनुभवली. आता निसर्गाच्या हिमकांती सौंदर्याचा साक्षात्कार अनुभवला. आणि रात्री जेवणानंतर रसिल्या संगीताने मन तृप्त झाले. आमच्या ग्रुपमध्ये पुण्याच्या ‘छंद’ संस्थेचे कलाकार होते. त्यांनी जेवणानंतर शांताबाई शेळके आणि मंगेश पडगावकर यांच्या सकस काव्याची मैफल जमवली. गझला सादर केल्या. साथीला डायनिंग टेबलाच्या तबल्याचा ठेका होता. त्याला तोंडी पार्श्वसंगीताची, उत्कृष्ट निवेदनाची जोड होती. भू-तानमधील रात्र सुरेल तानांनी नादमयी झाली.
टकसंग मॉनेस्ट्रीला ‘टायगर्स नेस्ट’ असे म्हटले जाते. पारो व्हॅलीतली ही मॉनेस्ट्री साधारण तीन हजार फूट उंचीवर एका अवघड कड्यावर बांधलेली आहे. भूतानमधील एका दैत्याचा नाश करण्यासाठी आठव्या शतकात गुरू रिंपोचे वाघाच्या पाठीवर बसून उड्डाण करून इथे आले. दैत्य विनाशानंतर त्यांनी इथल्या गुहेत तीन महिने ध्यानधारणा केली अशी दंतकथा आहे. इसवी सन १६९२ मध्ये इथे मॉनेस्ट्री बांधण्यात आली. बुद्धाची विविध भावदर्शी शिल्पे येथे आहेत. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाचे दर्शन घेण्याची प्रत्येक भूतानी व्यक्तीची आकांक्षा असते. अनेक परदेशी प्रवासीही काठीच्या सहाय्याने हा अवघड ट्रेक पूर्ण करतात. टायगर नेस्टच्या पायथ्याशी उभे राहून, जाऊन- येऊन सहा तासांचा असलेला हा प्रवास आम्ही माना उंचावून पाहिला.
पारोच्या नॅशनल म्युझियममध्ये भूतानी संस्कृती, परंपरा, रीतीरिवाज, समूहनृत्यासाठीचे विविध वेश यांचे जतन केले आहे. रेशमी कापडावरील थांका चित्रकला, वेगळ्या प्रकारच्या कागदावरील पेंटिंग्जचे स्क्रोल पहिले. धनुष्यबाण, शिरस्त्राण, पतंग याचबरोबर घोड्याचे शिंग व घोड्याचे अंडे अशा कधीही न ऐकलेल्या वस्तूही तिथे आहेत.
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈