सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक- १५ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ देखणा दुर्ग ग्वाल्हेर ✈️

कार्तिकातल्या स्वच्छ निळ्या आकाशाच्या तळ्यात, अष्टमीच्या शुभ्र चंद्राची होडी विसावली होती. हवीहवीशी वाटणारी सुखद थंडी अंगावर शिरशिरी आणत होती. लांबरुंद, उतरत्या दगडी पायर्‍यांवर बसून आम्ही समोरचा, पाचशे वर्षांपूर्वीचा ग्वाल्हेरचा किल्ला निरखत होतो. तेवढ्यात दिवे मालवले गेले. त्या नीरव शांततेत सभोवतालच्या झाडीतून घोड्यांच्या टापा ऐकू येऊ लागल्या. धीर-गंभीर आवाजात, किल्ल्यावर आणि सभोवती टाकलेल्या प्रकाशझोतात इतिहासाची पाने आमच्यापुढे उलगडली जाऊ लागली.

राजा मानसिंह याने इसवीसन १४८६ ते १५१६ या काळात तांबूस घडीव दगडात या किल्ल्याचं बांधकाम केलं.( हा राजा मानसिंह, तोमर वंशातील आहे. रजपूत राजा मानसिंह, ज्याची बहीण अकबर बादशहाला दिली होती तो हा नव्हे). गुप्तकाळातील म्हणजे इसवी सन ५३० मधील शिलालेख येथे सापडला आहे. गुप्त, परमार, बुंदेले, तोमर, चौहान, लोधी, मोगल, मराठे, इंग्रज अशा अनेक राजवटी येथे होऊन गेल्या. तलवारींचे खणखणाट, सैन्याचे, हत्ती- घोड्यांचे  आवाज, राजांचे आदेश, जखमींचे विव्हळणे, शत्रूपासून शीलरक्षणासाठी राण्यांनी केलेला जोहार असा सारा इतिहास ध्वनीप्रकाशाच्या सहाय्याने जिवंत होऊन आमच्यापुढे उभा राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हा किल्ला पाहताना काल पाहिलेला इतिहास आठवत होता. रुंद, चढणीचा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जवळ- जवळ तीन किलोमीटर लांब पसरलेल्या या किल्ल्याला ३५ फूट उंचीची मजबूत तटबंदी आहे. त्यात सहा अर्धगोलाकार बुरुज बांधलेले आहेत. बुलंद प्रवेशद्वारावर केळीची झाडे, बदकांची रांग, सुसरींची तोंडे, घोडे ,हत्ती अशा शिल्पाकृती आहेत. काही ठिकाणी निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगातील मीनायुक्त रंगकाम अजून टिकून आहे. किल्ल्याच्या आतील ‘मान मंदिर’ हा राजवाडा हिंदू स्थापत्यशैलीचा अजोड नमुना आहे. राजा मानसिंह याच्या कारकिर्दीमध्ये राजाश्रयामुळे गायन, वादन, नर्तन अशा सार्‍या कलांची भरभराट झाली. अशी कथा सांगतात, की राजा एकदा शिकारीला गेलेला असताना त्याने, दोन दांडग्या म्हशींची झुंज, नुसत्या हाताने सोडविणाऱ्या देखण्या गुजरीला पाहिले.  राजा गुजरीच्या प्रेमात पडला. तिलाही राजा आवडला होता. गुजरीने विवाहासाठी तीन अटी  घातल्या. एक म्हणजे ती पडदा पाळणार नाही. सदैव म्हणजे रणांगणावरसुद्धा राजाबरोबरच राहील  आणि  तिच्या माहेरच्या राई गावातील नदीचे पाणी ग्वाल्हेरमध्ये आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. राजाने गुजरीच्या या तीनही अटी मान्य करून तिच्याशी विवाह केला व तिचे नाव मृगनयनी ठेवले. मृगनयनीला संगीतात उत्तम गती होती. राजाही संगीताचा मर्मज्ञ होता. शास्त्रीय संगीतात सुप्रसिद्ध असलेलं ‘ग्वाल्हेर घराणं’ या राजाच्या काळात उदयाला आलं. गानसम्राट तानसेनही इथलाच! मानसिंहाने त्याला अकबराकडे भेट म्हणून पाठविले. तानसेनचे गुरू, स्वामी हरिदास यांच्या स्मरणार्थ अजूनही इथे दरवर्षी संगीत महोत्सव साजरा होतो .

‘मान मंदिर’ या राजवाड्यात गतवैभवाची साक्ष मिरविणारे चाळीस लांबरुंद दिवाणखाने आहेत. गायन कक्षातील गाणे शिकण्यासाठी, ऐकण्यासाठी भोवतालच्या माडीमध्ये राणी वंशाची सोय केली आहे. दरबार हॉल, शयनकक्ष,मसलतखाना, पाहुण्यांची जागा अशा निरनिराळ्या कामांसाठी हे हॉल वापरले जात. भिंतीवर काही ठिकाणी हिरव्या, निळ्या रंगातील लाद्या अजून दिसतात.मीना रंगातील नाजूक कलाकुसरीची जाळी दगडातून कोरली आहे हे सांगितल्यावरच समजते. महालातील भुलभुलैया या ठिकाणच्या दगडी, अंधाऱ्या पायऱ्या गाईडच्या मदतीने उतरून तळघरात गेलो. इथे पूर्वी राण्यांच्या शाही स्नानासाठी, केशराने सुगंधित केलेल्या पाण्याचा लांबरुंद हौद होता. वरच्या दगडी छतात राण्यांच्या झुल्यांसाठी लोखंडी कड्या टांगलेल्या आहेत. झरोक्यातून वायूवीजनाची सोय तसेच ताज्या, वाहत्या पाण्याचा प्रवाह येण्याची व्यवस्था आहे. तिथे असलेले दोन पोकळ पाईप दाखवून हा पूर्वीचा टेलिफोन (संदेशवहनाचा मार्ग) आहे असे गाईडने सांगितले. आता त्या स्नानाच्या हौदाचा  बराचसा भाग लाद्यांनी आच्छादलेला आहे व फारच थोडा भाग जाळीच्या आवरणाखाली आहे.

कालचक्राची गती कशी फिरेल याचा नेम नाही. इसवीसन १५१६ मध्ये इब्राहीम लोदीने ग्वाल्हेरवर ताबा मिळविला. नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि या स्नानगृहाचा म्हणजे तळघराचा वापर चक्क अंधारकोठडी म्हणून करण्यात आला. झोपाळ्यांसाठी बसविलेल्या लोखंडी कड्यात राजकैद्यांसाठी बेड्या अडकविण्यात आल्या. औरंगजेबाचा भाऊ मुराद व मुलगा मोहम्मद, दाराचा मुलगा शिको अशा अनेकांसाठी हे मृत्युस्थान बनले. जहांगीर बादशहाने शिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांनाही इथे कैदेत ठेवले होते. नंतर दोन वर्षांनी त्यांची सुटका केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी स्वतःबरोबर कैदेत असलेल्या ५२ हिंदू राजांचीही सुटका करविली. गुरु हरगोविंद यांच्या स्मरणार्थ बांधलेला ‘दाता बंदी छोड’ या नावाचा एक भव्य गुरुद्वारा किल्ल्याजवळच आपल्याला बघायला मिळतो.

भाग-१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments